सकाळचं कोवळं ऊन पाना-फुलांवर सांडलं होतं. एक प्रसन्न प्रकाश सगळीकडे पसरला होता. रविवारची सुट्टी असल्याने रेहान टेकडीवर आला होता. घरापासून थोडयाच अंतरावर असणारी टेकडी रेहानला नेहमीच खुणवायची. बोलवायची. रेहान घरातून तासन् तास तिच्याकडे पाहत राहायचा. आपण टेकडीवर जावं आणि तिथं जाऊन माऊथ ऑर्गन वाजवत बसावं असं त्याला मनापासून वाटे. पण घरातले लोक परवानगी देतील की नाही याची भीती वाटल्याने तो जात नसे. रेहान आणि त्याचं कुटुंब नुकतंच इथं राहायला आलं होतं. आसपास लहान-मोठे डोंगर आणि जवळच एक छोटं तळं. अंगणात बसून रेहान हे सर्व न्याहाळायचा. मनात अनेक बेत आखायचा. पण पुन्हा सगळे बेत विरून जायचे. ते नव्याने राहायला आले असल्याने घरातले त्याला एकटयाला बाहेर जाऊ देत नसत. घरातलं सोबत जायला कुणी नव्हतं. वयस्कर दादा आणि दादी होते. त्यांना टेकडी चढणं शक्य नव्हतं. पण रेहानच्या मनातले बेत पूर्ण होणार होते. कारण रेहानला अर्पित नावाचा मित्र भेटला होता. अर्पित जवळच्याच वस्तीत राहायचा. तो पाचवीत शिकणारा. रेहानच्याच वयाचा असल्याने त्यांची मस्त मैत्री जमली. दोघांनी मिळून टेकडीवर जाण्याचा बेत पक्का केला. ‘‘अरे तो नवीन आहे. त्याला इथलं काहीच माहीत नाही.’’ दादी म्हणाल्या. ‘‘तुम्ही नका काळजी करू. मला इथलं सगळं तोंडपाठ आहे. मी त्याला नीट नेतो आणि परत आणून सोडतो. फिकर नॉट.’’ अर्पितच्या फिकर नॉट शब्दाचं त्यांना खूप हसू आलं. त्यांनी दोघांना जायची परवानगी दिली. सोबत थोडं खायला आणि पाण्याची बाटली दिली. हेही वाचा.बालमैफल: हरवलेलं घर दोघं टेकडी चढू लागले. रेहानला वाटली होती त्यापेक्षा ही टेकडी जास्तच उंच होती. छोटासा डोंगरच. खरं तर तो डोंगरच होता, पण अर्पितला रोजची सवय असल्याने त्याला टेकडीच वाटत होती. रेहान घामेघूम झाला. दोघं वर आले आणि रेहानचा सगळा थकवा, सगळा शीण कुठच्या कुठे पळून गेला. किती सुंदर दृश्य होतं ते!! चोहीकडे पसरलेले डोंगर, हिरव्यागार शेतांचे तुकडे आणि निळं क्षितिज. रेहान पाहतच राहिला. घामेजल्या अंगाला गार वारा लागला आणि अंगावर शहारा आला. असा डोंगर वारा त्यानं कधी झेलला नव्हता. असं दृश्य फक्त सिनेमात पाहिलं होतं. हॉलीवूडच्या सिनेमात एखादं नवं अद्भुत जग अचानक डोळयांसमोर यावं तसं त्याला वाटलं. तो हरकून गेला होता. ‘‘चल पुढं, इथं पठार सुरू होतं.’’ अर्पित म्हणाला. ‘‘पठार? म्हणजे काय?’’ ‘‘डोंगरावरची सपाट जमीन.’’ ‘‘अच्छा.’’ असं म्हणत असताना दोघं पुढे झाले आणि रेहान पुन्हा जाग्यावर स्तब्ध उभा राहिला.समोर पसरलेलं ते सुंदर तळं बघून त्याचं मन जणू नाचूच लागलं. हेही वाचा.बालमैफल: सुखाचे हॅशटॅग: सुरुवात तर करा! ‘‘बापरे बाप! कसलं भारी आहे हे तळं!! हा खजिना इथं लपून बसलाय. खालून तर अजिबात दिसत नाही.’’ रेहान आनंदाने मोहरून गेला होता. चारी बाजूंनी झाडांची दाटी आणि मध्येच ते छोटं तळं. एक छोटीशी वाट आत वर नेणारी. थोडीशी उतरंड. मग एक चपटा गोलाकार दगड. त्यावर बसून पाण्यात पाय सोडून बसायचं. गार पाणी पायाला शिवताच चेहऱ्यावर आपोआप हसू फुलत होतं. ‘‘गडबड नको करू, पडशील.’’ अर्पितनं तंबी दिली. रेहान एका झाडाच्या फांदीला धरून खाली उतरला. गारवा जाणवला. भर उन्हात गारवा! रेहान खूश झाला. ‘‘असल्या उकाडयातही गारवा. हे कसं काय?’’ रेहानला रहावलं नाही. ‘‘माझी आई म्हणते, ही निसर्गाची माया आहे. आपल्यावरचं प्रेम. त्यामुळं इथं उकडत नाही.’’ दोघंही पाण्यात पाय सोडून बसले. रेहाननं माऊथ ऑर्गन काढून वाजवायला सुरुवात केली. वातावरणात संगीताचे सूर मिसळू लागले. पाखरं कुजबुजायची थांबली. फांदीवर झुलणारे खोपे शांत झाले. हेही वाचा.बालमैफल : खजिन्याचा शोध रेहान एकदम शहारला. त्याच्या पायांना कुणीतरी गुदगुल्या केल्या. ‘‘अरे, पाण्यात काहीतरी आहे.’’ रेहान घाबरून म्हणाला. ‘‘हाहाहा, एवढं काय घाबरतो? मासे आहेत ते. साप नव्हे! फिकर नॉट.’’ आणि अर्पित हसू लागला. रेहाननं खाली वाकून पाहिलं. अरे खरंच की! मासेच होते. रंगीबेरंगी मासे. छोटे छोटे. पायांना स्पर्श करून पळत होते.’’ ‘‘आपण पाय खाली सोडले की ते पायाला पहिल्यांदा कोण शिवतंय याची स्पर्धा लावतात. येतात, शिवतात आणि परत जातात.’’ अर्पित डोळे बारीक करत म्हणाला. रेहानला त्याच्या बोलण्याचं हसू आलं. मासे खरंच असा खेळ खेळत असतील? त्याला मजा वाटली. दोघांनी तळयाकाठी बसून थोडं खाऊन घेतलं. पोटभर पाणी पिऊन दोघं दगडावर जाऊन बसले. ‘‘आपण या पाण्याच्या बाटलीत मासे नेऊ या का? मी आमच्या घरातल्या काचेच्या बरणीत हे मासे भरून ठेवतो. दादा-दादींनाही खूप आनंद होईल.’’ रेहान स्वप्नात हरवल्यासारखा बोलत होता. हेही वाचा.चित्रास कारण की.. : भिंतीचित्र ‘‘मग पुढं?’’ अर्पित म्हणाला. ‘‘काहीच नाही. छान वाटेल. आनंदासाठी.’’ अर्पित काहीच बोलला नाही. त्याला आपली आयडिया आवडलेली नाही हे रेहाननं ओळखलं. ‘‘बोल की, तुझं काय म्हणणं आहे?’’ अर्पित शांतच होता. त्यानं हळूच पाण्याची बाटली आपल्या हातात घेतली. त्यातलं पाणी तळयात ओतलं आणि बाटलीत तळयाचं पाणी भरलं. त्यात काही मासेपण आले. थोडावेळ दोघांनीही ते मासे पोहताना पाहिले. थोडया वेळानं ते मासे अस्वस्थ झाले. ते इकडून तिकडे घाबरून पळू लागले. रेहानलाही ते जाणवलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. अर्पितनं मासे परत तळयात सोडून दिले. मासे सुर्रकन् पसारही झाले. अर्पितनं मोकळी झालेली बाटली रेहानच्या हाती दिली. ‘‘या बाटलीत आनंद भरलेला आहे. तो घेऊन जाऊ.’’ ‘‘हम्म.’’ ‘‘तू इथलं काय काय नेऊ शकतो?’’ अर्पितनं रेहानला विचारलं. हेही वाचा.बालमैफल: चतुर लिओ ‘‘मासे आणि इथली पानं, फुलं? दगड. बस्स.. एवढंच.’’ ‘‘हे डोंगर, ही गार हवा, या झाडांची दाट सावली, वाऱ्याचं उडया मारणं.. हे नेऊ शकतो?’’ ‘‘हं.. नाही. नाही नेता येणार.’’ ‘‘आपण फक्त आनंद भरून घेऊ शकतो. माझी आई म्हणते, आपण सगळंच घ्यायला बघतो, देत काहीच नाही. करू नये असं. आपण आनंद भरून घ्यावा. मनात. म्हणजे माणूस परत परत तो आनंद घ्यायला तिथं येतो. नाहीतर त्याची आठवण कायम मनात ठेवतो.’’ रेहान मन लावून ऐकत होता. त्याच्या डोक्यात नवीन विचार घोळत होते. ‘‘चल निघू या.’’ अर्पित म्हणाला. ‘‘हो, थांब थोडं.’’ रेहान उभा राहिला. डोळे मिटून घेतले. पाच-सहा खोल श्वास घेतले. सोडले. ‘‘हे काय केलं?’’ अर्पितनं नवलानं विचारलं. ‘‘आनंद भरून घेतला.’’ असं म्हणून रेहान गोडसं हसला. अर्पितही हसला. दोघंही परतीची वाट चालू लागले. पश्चिमेला सूर्य कलू लागला होता, लालिमा पसरली होती. दोघं गप्पा मारत सांजचा वारा झेलत खाली उतरत होते. ‘‘सांभाळून उतर.’’ अर्पित काळजीच्या सुरात ओरडला. हेही वाचा.बालमैफल: आनंद द्यावा नि घ्यावा! ‘‘हो. उतरतो. आता रस्ता पाठ झालाय. नाही पडणार, फिकर नॉट!’’ यावर दोघंही तुफान हसत सुटले. रेहान वाऱ्यावर चालत होता जणू. कधी एकदा घरी जातोय असं त्याला झालेलं. भरून घेतलेला आनंद दादा-दादींना वाटायचा जो होता. farukskazi82@gmail.com