संध्या ठाकूर
सुट्टय़ा लागल्या आणि वर्षभर थोपवून ठेवलेली फर्निचरची कामं सुरू झाली. आई, बाबा आणि अवंती तिघांनी मिळून अवंतीच्या अभ्यासाच्या टेबलाचा आराखडा तयार केला. सूतारकाका आपल्या सहकऱ्यांना घेऊन कामाला लागले. स्वत:चे टेबल असल्यामुळे अवंती त्यांचे काम लक्षपूर्वक निरीक्षण करीत होती. मोजमाप करण्याची पट्टी कशा प्रकारे वापरतात हे तिने बघून घेतले. नेहमीप्रमाणे आनंदिता खेळायला आली. आज त्यांना खेळायला नवीन खेळ मिळाला. काकांची टेप घेऊन दोघींनी कॉफी टेबलचे मोजमाप केले आणि २०’ ७ ४०’ ७ २०’ असे लिहून ठेवले. काकांनाही मजा वाटली. त्यांनी दोघींनाही बिनचूक माप कसे घ्यायचे ते दाखवले. मग दोघींनी सपाटाच लावला. डायनिंग टेबल, खुच्र्या, खिडक्या, वह्य, पुस्तकं, शाळेची बॅग, टीव्ही, कॉट, गाद्या.. जे मिळेल त्याचे मोजमाप करून वहीत टिपून ठेवले. सुतारकाम आणि तिची सुट्टी म्हणून आई-बाबा दोघेही रजा घेऊन घरीच होते. त्यांनाही मजा वाटली. न ठरवता, काही प्लॅनिंग न करता या नवीन ‘प्रोजेक्ट मोजमाप’मध्ये सगळे कुटुंब रंगून गेले. हॉलमधल्या वस्तूंचं मोजमाप झाल्यावर प्रत्यक्ष हॉलची लांबी, रुंदी, उंची यांची मोजणी झाली. मग मोर्चा वळला बेडरूमकडे. त्यातल्या वस्तू व बेडरूमचे मोजमाप. नंतर स्वयंपाकघर- तवा, लहान-मोठय़ा ताटल्या, वाटय़ा, पातेली यांचे त्रिज्या, व्यास.. अबबब! भरपूर वाव होता मोजमापाला.
तेवढय़ात संपदा कामाला आली. तिला विशेष काम नव्हते. लाकूडकामाच्या पसाऱ्यात तीही लागली टेप पकडून मोजायला.. मदत करायला. म्हणाली, ‘‘मीही राहूल, यतिनला घेऊन हेच करीन आज घरी गेल्यावर. मजेशीर आहे हे.’’
दिवस मोजमापात कसा सरला, कळलेच नाही. आपलेच घर नव्याने आपल्याला कळले. ‘‘अरे, हा तर अवंतीच्या शास्त्राच्या पुस्तकातला पुढच्या वर्षीचा धडा आहे- मोजमाप! तो पक्का झाला.’’ आई हळूच बाबाला म्हणाली.
sandhyajit@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2022 रोजी प्रकाशित
बालमैफल :मो ज मा प
सुट्टय़ा लागल्या आणि वर्षभर थोपवून ठेवलेली फर्निचरची कामं सुरू झाली. आई, बाबा आणि अवंती तिघांनी मिळून अवंतीच्या अभ्यासाच्या टेबलाचा आराखडा तयार केला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-05-2022 at 00:04 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Measurements furniture work study table carpenter planning project amy