सारे रंग एकदा

खांब-खांबोळ्या खेळले

स्पर्श करीत तेथे

रंग उमटत गेले।

हिरव्या रंगाने

झाडाला लावला हात

हिरवी छान पालवी

फुटली क्षणात।

निळा निळा रंग

आभाळात उतरला

क्षणात तोच रंग

समुद्रात उमटला।

पिवळा रंग पाहा

चाफ्यावर उतरला

खूपसा उन्हात

सांडून गेला

लाल लाल रंग

टोमॅटोत उतरला

मिरचीच्या अंगावर थोडासा सांडला

नारिंगी रंग पाहा

संत्र्यावर उतरला

संक्रांत वेलीला

बहर कसा आला।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फुलपाखराच्या अंगावर

रंगरंग गळे

जांभळीच्या झाडावर

जांभूळ फळे

सारे रंग म्हणाले

जरा गाणी म्हणू

फेर धरताच झाले

सुंदर इंद्रधनु।

डॉ. लीला दीक्षित