पाऊसदादा, पाऊसदादा
सांग ना माझ्या आईला
येता तुझी सर पहिली
भिजू दे ना मला..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिजलो मी तर आई
म्हणे.. पडेन मी आजारी
होतं का रे असं कधी!
सांग ना रे तू तरी..

पावसात भिजण्याची
गंमत असे न्यारी
मग तूच सांग.. कसं
कुणी पडेल रे आजारी..

पावसात पाण्यामध्ये
सोडीन मी होडय़ा
मनसोक्त भिजेन अन्
मारीन मी उडय़ा..

सांग ना रे आईला
समजावून तू जरा
देईन तुला एक पैसा
अगदी खरा खरा..
– भाऊ शिगवण
पावसाच्या धारा
पावसाच्या पहिल्या धारा
घेऊन आला वारा
ओल्या मृद्गंधाने भरला
धरतीचा गाभारा
मृदुंगावर धरणीच्या
तड तड वाजे ताशा
जलधारा वेचून घेती
भूदेवीच्या कळशा
जन्म घेती बीजांकुरे
भूमातेच्या कुक्षी
चहुकडे हरित तृणांची
दिसू लागली नक्षी
आनंदाने उंच भरारी
घेऊ लागले पक्षी
नभांगणी दिसू लागली
बक थव्यांची नक्षी
सुगरणीची होती पिल्ले
खोप्यामध्ये बसली
वाऱ्यासंगे झोका झुलता
खुदू खुदू हसली
नांगर घेऊन खांद्यावर
गेला शेतकरी शेतात
झर झर फिरता नांगर
सरी शिरल्या मातीत
वर्षांसरींना झेलून
तृप्त झाली धरा
अंगावर लेवून सजली
पाचूचा घागरा
– जयश्री चुरी

पाऊसगाणे
कुठूनी हा आला, गार गार वारा
सोबतीस आल्या, पावसाच्या धारा

थेंब टपोरे, झेलून घेऊ
पावसाचे गाणे, नाचत गाऊ

कडाडली वीज, नभ हे फुटले
मेघमल्हार ते, गातच सुटले
मोर नाचले, वनी अंगणी
थेंबाचे नूपुर, पायी पैंजणी

मातीला मिळाला, स्वत:चा गंध
पाने फुले देती, वाऱ्याला सुगंध

वारा हा ओला, धरतीही ओली
पावसात पाखरं, चिंबही झाली
पाऊस पिऊन, झाडे ही नटली
हुशार होऊन, बहरत सुटली

चैतन्य सारे, दिसून आले
दान पावसाचे, धरतीस पावले
– एकनाथ आव्हाड

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain poem for kids
First published on: 10-07-2016 at 00:45 IST