|| राजश्री राजवाडे-काळे

चौथीतल्या आरुषने शाळेच्या बसमधून टुणकन् उडी मारली ती बरोब्बर साचलेल्या पाण्यात! त्याचे मोजे भिजले. युनिफॉर्मवर चिखल उडाला. ते पाहून आई वैतागली. पण आरुषला तर असं झालं होतं, की कधी एकदा मी आईला ती पंधरा ऑगस्टची

गंमत सांगेन. मग कुठे बॅग, रेनकोट, टिफीन बॅग हे सगळं सांभाळत खड्डा चुकवत उतरायचं! हातातलं सगळं सामान आईकडे सोपवत आरुष म्हणाला, ‘‘आई, यावेळी पंधरा ऑगस्टला खूप मज्जा येणारे शाळेत. त्या दिवशी आमची फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे आणि थीम आहे- ‘भारतातील स्वातंत्र्यसैनिक’! आई, मी कोण होऊ? गांधीजी? सावरकर? लोकमान्य टिळकही होता येईल.’’ आरुषची बडबड चालूच होती. पण आई मात्र काही बोलत नव्हती. आरुषला जाणवलं, की फॅन्सी ड्रेस स्पर्धेविषयी ऐकून आईला आनंद वगैरे झाला नाहीये. पण का, ते त्याला कळेना! सगळ्या स्पर्धाबद्दल उत्साहाने बोलणारी आई आज मात्र काहीच बोलत नव्हती.

तरी आरुषने बडबड सुरूच ठेवली.. ‘‘आई.. अगं, डायलॉग म्हणायचाय.

मी टिळक होईन आणि ‘स्वराज्य हा

माझा जन्मसिद्ध हक्क आहे..’ हा डायलॉग म्हणेन.’’

‘‘आरुष, घरी गेल्यावर बोलू.’’ इतकेच बोलून आई त्याचा हात धरून झपाझप चालू लागली. दोघं घरी पोहोचल्यावरही आईने त्याला हातपाय धुऊन कपडे बदलायला लावले आणि त्याला खायला देऊन जवळ बसून म्हणाली, ‘‘आरु, तूच म्हणत होतास ना, की आपण सुट्टीत कुठेच फिरायला गेलो नाही. तुझे सगळे मित्र कुठे कुठे फिरून आले. तर आता आपण चार दिवस महाबळेश्वरला जाणार आहोत.’’ हे ऐकून आरुष भलताच खूश झाला.

‘‘वाव! कित्ती मज्जा! कोण कोण?’’

‘‘आपण तिघं आणि मावशी, काका, जीत, ईरा हे सगळे.’’

मग महाबळेश्वर ट्रिपची बडबड सुरू झाली. ‘‘आई, स्ट्रॉबेरी विथ क्रीम, चेरीज्.. बोटिंगलाही जायचं ना?’’

‘‘हो..हो. सगळीकडे जायचं. पण तुला फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग नाही घेता येणार बरं का!’’ आईचं हे वाक्य ऐकून आरुषचा सगळा उत्साह मावळला. आई सांगू लागली,

‘‘पंधरा ऑगस्टची सुट्टी बुधवारी आहे. मग गुरुवार- शुक्रवारही सुट्टी घेतली की चांगली पाच दिवस सुट्टी मिळते.’’

‘‘नाही, मला फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घ्यायचाय. ती झाली की गुरुवारी जाऊ महाबळेश्वरला.’’ आरुष वैतागून म्हणाला.

‘‘अरे, आता तर बुकिंगही झालंय सगळ्यांचं.’’ आई म्हणाली.

‘‘आम्हाला शाळेत सांगितलंय, की पंधरा ऑगस्टला कुणीही गैरहजर राहायचं नाही. हा दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. त्या दिवशी झेंडावंदन करायचं आणि जे स्वातंत्र्यलढय़ात सामील झाले त्यांना स्मरण करून वंदन करायचं. लोक जोडून सुट्टी आली की फिरायला जातात, हे चुकीचं आहे.’’ आरुषचं हे बोलणं ऐकूण आईला आश्चर्यच वाटलं. बाबांनीही ऑफिसमधून आल्यावर आरुषला समजवायचा प्रयत्न केला, पण आरुष नाराजच होता. आरुषच्या कानावर सगळ्यांचं बोलणं पडत होतं. ‘‘गेले वर्षभर कामाचा ताण होता. चार दिवस फिरून येऊन फ्रेश होऊ म्हटलं तर आरुषचा हट्ट..’’

‘‘पण आता बुकिंग तर झालंय.’’

‘‘कॅन्सल केलं तर सगळे पैसे परत नाही मिळणार.’’

‘‘पण आरुषचा मूड असा असेल तर काय मजा येणार?’’

हे सगळं बोलणं ऐकून आरुषला वाटलं, हट्ट धरून बसलो तर नुकसान होईल आणि सगळ्यांनाच वाईट वाटेल. त्यापेक्षा.. पण.. पण शाळेत खोटं सांगणार? आई म्हणाली, की ती भेटेल टीचरना. पण तरी हे चूक आहे. स्वातंत्र्यदिन पाळायला हवा. आणि स्पर्धेत सगळे मजा करतील ते वेगळंच. कुणी नेहरू, कुणी गांधीजी, तर कुणी झाशीची राणी.. आणि आपण मात्र त्यांच्याबद्दल काहीही रिस्पेक्ट नसल्यासारखे फिरायला जाणार. आरुषला एकदम ‘इच्छाशक्ती’ हा शब्द आठवला. त्याने एका गोष्टीत ऐकलं होतं, की खूप मनापासून प्रार्थना करायची रोज. मग आरुष रोज प्रार्थना करायचा- ‘‘देवा, मला पंधरा ऑगस्टला शाळेत जाता येईल असं काहीतरी कर.’’

दहा ऑगस्टचा दिवस उजाडला. त्या दिवशीही त्याने मनापासून प्रार्थना केली. संध्याकाळी बाबा ऑफिसमधून आले आणि म्हणाले, ‘‘सोळा तारखेला बेंगरूळूला जायचंय कॉन्फरन्सला.’’

झालं! सगळ्यांचा मूड गेला.. आता महाबळेश्वर ट्रिप कॅन्सल म्हणून. पण आरुषला मात्र स्पर्धेत भाग घ्यायला मिळणार होता. कोण बनायचं, डायलॉग कोणता.. सगळी ठरवाठरवी झाली.

पंधरा ऑगस्टचा दिवस उजाडला. ‘‘स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच!’’ असा खणखणीत डायलॉग म्हणत लोकमान्य टिळक झालेला आरुष शाळेत निघाला. स्पर्धेकरता बाबांना नमस्कार केला आणि त्याला रडूच फुटलं. म्हणाला,‘‘सॉरी बाबा, माझ्यामुळे ट्रिप कॅन्सल झाली. मी रोज प्रार्थना करायचो, की मला आजच्या दिवशी शाळेत जायला मिळू दे म्हणून..’’

‘‘अरे, वेडा आहेस का तू आरुष? असं काही नसतं.’’ बाबांनी त्याची समजूत काढली.

‘‘नाही, माझ्यामुळेच..’’ आरुष आणखीनच रडू लागला.

‘‘अरे, कॉन्फरन्सचा प्लॅन तू केलायस होय?’’ त्याला हसवण्याचा प्रयत्न करत बाबा म्हणाले.

‘‘नाही. पण इच्छाशक्ती म्हणतात ना, ती वापरली मी.’’ आरुष रडवेला होऊन म्हणाला.

आई त्याला जवळ घेत म्हणाली, ‘‘अरे, शेवटी जे योग्य असतं ना त्याचाच विजय होतो. तुझी इच्छा योग्य होती. आणि आमचं ट्रिपचं प्लॅनिंग चुकलं होतं.’’

‘‘आरुष, या स्पर्धेत बक्षीस मिळेल की नाही हे माहीत नाही, पण आम्हाला आमचं बक्षीस मिळालंय बरं का!’’ बाबा कौतुकानं म्हणाले.

‘‘कोणतं बाबा?’’ आश्चर्याने आरुषने विचारलं.

‘‘हेच- की आमचा आरुष योग्य तोच विचार करतोय.’’

‘‘पण ट्रिप..?’’

‘‘अरे, मी बेंगरूळूवरून आलो की जाणार आहोत आपण ट्रिपला.’ बाबांनी सांगितलं.

‘‘खरंच बाबा?’’ आरुषने आनंदाने विचारलं.

‘‘हो, खरंच. आणि पुन्हा वेडय़ासारखा विचार करायचा नाही. उलट, तूच आम्हाला काय योग्य आहे याची आठवण करून दिलीस. समजलं?’’ – आई.

बाबा त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यदिनाला जाणं हा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. चला.. लोकमान्य टिळक.’’ त्यांचे हे बोलणं ऐकून आरुष हसू लागला आणि उत्साहाने शाळेत निघाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

shriyakale@rediffmail.com