|| मृणाल तुळपुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फार पूर्वी आफ्रिकेतील उंदरांना गोष्टी रचण्याची कला अवगत होती. त्यामुळे सगळ्या दंतकथा, बोधकथा व सुरस कथांचे उगमस्थान उंदीर आहेत असे तिथे  मानले जाते. उंदरांचा श्रीमंतांच्या घरात, गरिबांच्या झोपडीत, जंगलात, राजाच्या महालात, धान्याच्या कोठारांत, गावातील बाजारात असा सर्वत्र वावर असल्यामुळे त्यांना सगळ्यांची  इत्थंभूत माहिती असे. आपण बघितलेल्या व ऐकलेल्या प्रसंगांवरून ते निरनिराळ्या गोष्टी रचत. त्यात राजा-राणीच्या, सुंदर राजकन्येच्या, गरीब व श्रीमंत लोकांच्या, जंगलातल्या प्राण्यांच्या व रंगीबेरंगी पक्ष्यांच्या आणि  बाजारातील लोकांच्या गोष्टी असत. या सगळ्या गोष्टी ऐकताना ऐकणाऱ्याची करमणूक तर होतेच; पण त्या गोष्टींतून काहीतरी बोध व चांगला संदेशदेखील मिळतो.

त्याकाळी उंदीर आपली गोष्ट लिहून झाली की ती इतरांना वाचून दाखवायचे आणि त्या गोष्टीच्या कागदाची गुंडाळी करून ती आपल्या म्होरक्याकडे ठेवायला द्यायचे. त्या म्होरक्याचे तळ्याच्या बाजूला मातीने बांधलेले मोठे घर  होते. त्यात तो सगळ्या उंदरांनी लिहिलेल्या गोष्टी नीट ठेवून द्यायचा.

एकदा एका झाडाखाली काही उंदीर आपल्या म्होरक्याला गोष्टी वाचून दाखवीत होते. सगळे जण त्या गोष्टी ऐकण्यात अगदी रंगून गेले होते. त्यांचे इकडेतिकडे अजिबात लक्ष नव्हते. हे दृश्य एका मांजराने पाहिले आणि आता आपल्याला खूप मोठी शिकार मिळणार, या आनंदात ते दबकत दबकत त्या उंदरांच्या दिशेने चालू लागले. तेवढ्यात उंदरांच्या म्होरक्याने त्या मांजराला बघितले व तो ‘‘पळा… पळा… मांजर आले…’’ असे जोरात ओरडला. ते ऐकून सगळे उंदीर आपल्या म्होरक्याच्या मागे पळू लागले.

उंदीर पुढे आणि त्यांच्यामागे मांजर असे पळत होते. मांजर उंदरांच्या अगदी जवळ पोहोचले, पण तेवढ्यात उंदीर पटापट म्होरक्याच्या मागोमाग त्याच्या घराशेजारी असलेल्या गवतात लपले. मांजराला वाटले, सगळे उंदीर म्होरक्याच्या घरात शिरलेत. म्हणून त्याने झडप घालण्यासाठी आपला पंजा उगारला. मांजराचा पंजा त्या मातीच्या घरावर पडला आणि ते पडले. पडलेल्या घरातून माती व असंख्य गोष्टींची भेंडोळी त्याच्या अंगावर पडली. मांजराच्या डोळ्यांत माती गेली व त्याचा फायदा घेऊन उंदीर लांब पळून गेले. जाता जाता मांजराच्या फजितीला हसायला मात्र ते विसरले नाहीत.

बाजूने जाणाऱ्या लोकांना ती भेंडोळी दिसल्यावर त्यांनी ती उघडून बघितली. त्यावर लिहिलेल्या गोष्टी त्यांना खूप आवडल्या आणि त्यांनी त्या इतरांना वाचायला दिल्या. अशा तºहेने उंदरांनी लिहिलेल्या छान छान गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या.

(आफ्रिकन गोष्टीवर आधारित)

mrinaltul@hotmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rat story akp
First published on: 23-05-2021 at 00:00 IST