पूर्वी सगळे अरबी व्यापारी आपापल्या उंटांच्या पाठीवर मसाले, चहा, कॉफी, कापडाचे तागे अशा वस्तू टाकून दुसऱ्या गावात विकायला नेत असत. त्यांच्या तांडय़ामध्ये काही वयस्क उंट, काही माद्या तर काही अगदी लहान उंट असत. सफरीच्या वेळी व्यापारी उंटांच्या कुवतीनुसार त्यांच्या पाठीवर सामान ठेवत व सगळेजण मिळून वाळवंटातले वाळूचे डोंगर पार करून पलीकडे जात. सफरीच्या प्रथेनुसार व्यापाऱ्यांचा म्होरक्या पहिल्या उंटावर बसून सगळ्या तांडय़ाला मार्ग दाखवत असे, तर बाकी सगळे व्यापारी त्याच्या मागे आपापले उंट घेऊन चालत. सर्वात शेवटच्या उंटाच्या पाठीला मोठी घंटा बांधलेली असे. तो उंट चालताना घंटा वाजे व त्या आवाजामुळे सगळेजण एकत्र राहात. जरी एखादा उंट वाट चुकला तरी तो घंटेच्या आवाजाने तांडय़ात येऊ शकत असे. दिवसाच्या रणरणत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सगळे व्यापारी आपल्या उंटांना घेऊन रात्रीच्या वेळी वाळवंटातून प्रवास करत. असेच एक दिवस ठरल्याप्रमाणे व्यापाऱ्यांनी आपल्या उंटांच्या पाठीवर सामानाची गाठोडी बांधून नवीन सफरीला सुरुवात केली. त्या तांडय़ात फरा नावाची उंटीण होती. तिचे पिल्लू अगदी लहान असल्याने त्याच्या पाठीवर सामान टाकले नव्हते. सर्वासारखे जोरात चालता येत नसल्याने ते सारखे मागे रहायचे; पण तांडय़ातले सगळे उंट आणि व्यापारी त्याची काळजी घेत होते. सफरीच्या वेळी फराला त्याची खूप काळजी वाटत होती. ती सारखी मागे वळून ते येत आहे ना, याची खात्री करून घेत होती. थोडय़ा थोडय़ा वेळाने त्याला दूध पाजत होती.
सकाळ झाल्यावर गावाबाहेरील पाणथळ जागेजवळ सगळेजण थांबले. त्यांच्या पाठीवरचे सामान उतरवून व्यापारी ते विकायला गावात घेऊन गेले. आता सगळ्यांचा चार दिवस तिथेच मुक्काम होता. रात्रभर चालून चालून पिल्लाचे पाय दुखत होते, पण त्याने आईजवळ तक्रार केली नाही. आपल्या लहानग्या बाळाला एवढे चालायला लागले याचे फराला खूप वाईट वाटले, पण त्याचबरोबर तक्रार न करता रात्रभर तिच्या मागून चालणाऱ्या आपल्या बाळाचे कौतुकही वाटले. फराही आता दमली होती, त्यामुळे आपल्या बाळाला कुशीत घेऊन एका झाडाखाली सावलीत ती आडवी झाली. संध्याकाळी व्यापारी आपल्या उंटासाठी खाणे घेऊन आले. फराशेजारी झोपलेल्या तिच्या पिल्लाला मालकाने प्रेमभराने जवळ घेतले आणि त्याच्या गालाला आपले गाल लावले. फराच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि तिच्या कानात सांगितले की, आजपासून तुझ्या बाळाचे नाव फैझल.
फैझल इकडे तिकडे पळायचा, खेळायचा आणि दमला की फराच्या कुशीत शिरून झोपून जायचा. बघता बघता चार दिवस संपले आणि पुढच्या टप्यावर जायची वेळ आली. व्यापाऱ्यांनी खरेदी करून आणलेले नवीन सामान आपापल्या उंटाच्या पाठीवर बांधले व सगळेजण नेहमीप्रमाणे वाळवंटातून चालायला लागले. आता छोटा फैझल आपल्या आईच्या बरोबर चालत होता. त्याला माहीत होते की तो जर मागे राहिला तर वाळवंटातील कडक उन्हात दूध-पाण्याशिवाय मरून गेला असता. काही दिवसांनी उंटांचा तांडा त्यांच्या शेवटच्या टप्यावर थांबला. दमलेले उंट खजुराच्या झाडाच्या सावलीत जाऊन बसले. फैझल इतका थकला होता की तो दूध पिऊन आईच्या पोटावर मान टेकून लगेचच झोपी गेला. फराने लाडाने आपल्या बाळाकडे पाहिले आणि तिचा उर अभिमानाने भरून आला. आता काही दिवसांनी जेव्हा सगळे नवीन सफरीवर जायला निघतील तेव्हा मालक फैझलच्या पाठीवर एखादे लहानसे गाठोडे ठेवेल, या विचाराने फरा खुशीत हसली. उगवत्या सूर्याकडे आणि फैझलकडे बघून तिला खूप आनंद झाला, कारण आता या सुंदर नव्या दिवसासारखीच फैझलच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती.
(अरेबिक कथेवर आधारित)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small faizal
First published on: 17-03-2013 at 01:03 IST