scorecardresearch

Premium

एकीचे बळ!

शेवटी कुठलंही काम एकत्रपणे केलं की यशस्वीच होतं.. जेव्हा आपले मित्र अडचणीत असतात तेव्हा त्यांना मदत केली की त्याचा आनंद वेगळाच असतो.

Story for kids fish turtle frog Unity is strength Balmaifalya
एकीचे बळ! (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

अंकिता कार्ले

एका गावात एक मोठं तळं होतं. त्यात खूप मासे होते. छोटे मासे, मोठे मासे. मस्त रंगीत होते ते. त्या तळय़ाचं पाणी खूप स्वच्छ होतं. त्या जलाशयात ते मासे छान खेळत असत एकमेकांशी. मधूनच त्यातील काही मासे, जे मोठे होते- म्हणजे दादा मासे बरं का!- ते पाण्यातून वर उडी मारत व झुपकन् परत पाण्यात शिरत. ते पाहून लहान माशांना खूप मज्जा वाटे. त्याच तळय़ात एक कासव आणि एक बेडूकसुद्धा होतं; पण ते उभयचर असल्यामुळे ते कधी तळय़ात राहत किंवा तळय़ाच्या बाहेर राहत. पण ते मासे, ते कासव आणि तो बेडूक यांची खूप घट्ट मैत्री होती. ते एकत्र खेळत, दंगा करत, गप्पा मारत आणि प्रसंगी एकमेकांना मदतही करत.

inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
study or protest Examination malpractice Unemployed youth Competitive Exam Prerequisites
अभ्यास करायचा की आंदोलनेच?
Dont be too quick to interpret childrens behavior
समुपदेशन : ‘मुलांच्या वागण्याचा घाईने अर्थ लावू नका’
girl murder case in Kalamboli
कळंबोलीतील तरुणी हत्या प्रकरणाच्या तपासास विलंब का?

एक दिवस काय झालं, तिथे एक मासे पकडणारा आला. ते तळं, त्यातील मासे पाहून त्यानं ठरवलं की, आपण मासे पकडायचे. त्यानं जाळं पाण्यात टाकलं आणि मासे त्यात अडकावेत म्हणून त्यानं काय युक्ती केली माहिती आहे का? त्या जाळय़ाशी त्यानं खाऊ ठेवला व ते पाण्यात टाकून निवांत बसला पाण्यात पाय सोडून. थोडय़ा वेळानं काही मासे त्यात अडकले. कारण त्या माशांना वाटलं, हा आपल्यासाठीच आहे खाऊ व तो घेण्यासाठी ते तिथे आले आणि त्या जाळय़ात अडकले. त्या दिवशी मासे पकडणारा खूप खूश झाला. त्यानं ठरवलं की, आता रोज इथे यायचं आणि हे छान छान मासे पकडायचे आणि नंतर ते मस्त खाऊन टाकायचे.

ठरल्याप्रमाणे तो तेथे येऊ लागला. मासे पकडू लागला. हळूहळू माशांची संख्या कमी होऊ लागली. उरलेल्या माशांना आता त्याची भीती वाटू लागली. त्यांचे किती तरी मित्र त्यानं खाऊन टाकले होते. तेव्हा त्यांनी ठरवलं की, आता त्या माणसाला आपण फसायचं नाही. एकत्र मिळून काही तरी युक्ती करू आणि त्यावर मार्ग काढू. त्यांच्या या योजनेत कासव आणि बेडूक त्यांना मदत करणार होते.

एके दिवशी एका माशाला एक युक्ती सुचली, त्यानं इतर माशांना, कासवाला आणि बेडकाला बोलावलं. तो म्हणाला, ‘‘जेव्हा शिकारी माणूस जाळं सोडेल तेव्हा त्याच्या त्या जाळय़ाजवळ चुकूनही जायचं नाही. आपण सावध राहायचं. आपल्याला माहिती आहे की, तो सकाळी कधी येतो ते, तेव्हा सगळय़ांनी सावध राहायचं. त्यानंतर त्याच्या जाळय़ात एक मोठा दगड ठेवून द्यायचा; पण तो दगड ठेवायला इतर मासे, कासव आणि बेडूक तुम्ही मदत करायची म्हणजे आपण सुरक्षित राहू. तो शिकारी माणूस जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा आपण हेच करायचं. म्हणजे तळय़ातील मासे संपले असं त्याला वाटेल आणि तो कायमचा निघून जाईल.. परत इकडे येणारही नाही.’’ अर्थातच सगळय़ांना ही योजना पटली आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी ती पार पडली.

थोडय़ा दिवसांनी खरंच त्या शिकारी माणसाचं येणं बंद झालं. रोज रोज दगड जाळय़ात सापडल्यानं त्याला खरंच वाटलं की, आता इथले मासे संपले आहेत असं. आणि तो पुढे दुसऱ्या गावी निघून गेला. त्या दिवशी सगळे मासे, कासव, बेडूक खूप खूश झाले. त्यांच्या एकजुटीचा विजय झाला होता. आता परत ते पहिल्यासारखे मुक्त झाले होते- बागडायला, खेळायला. शेवटी कुठलंही काम एकत्रपणे केलं की यशस्वीच होतं.. जेव्हा आपले मित्र अडचणीत असतात तेव्हा त्यांना मदत केली की त्याचा आनंद वेगळाच असतो- जो कासव आणि बेडकाने अनुभवला. अशा प्रकारे त्या साऱ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या अडचणीवर मात केली आणि आनंदाने राहू लागले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Story for kids fish turtle frog unity is strength any work is successful if done together dvr

First published on: 10-12-2023 at 01:02 IST

संबंधित बातम्या

×