अलकनंदा पाध्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘ध्रुव, बाळा उठ. उठ पटकन् आणि आजपासून तुझं बस्तान आता हॉलमधे बरं का!’’ झोपेतल्या ध्रुवला आई काय सांगतेय खरं म्हणजे काहीच कळत नव्हतं. आई खरंच उठवतेय की आपण स्वप्न बघतोय तेच समजत नव्हतं. पण आईच्या दुसऱ्या मोठय़ा हाकेने मात्र त्याची झोप उडाली. सुट्टीतही लवकर कशाला उठायचे असा विचारही त्याच्या डोक्यात येऊन गेला, पण तोवर झोप उडालीच म्हणून डोळे चोळत तो नेहमीप्रमाणे आईच्या गळ्यात हात टाकायला गेल्यावर आई पटकन् दूर झाली तेव्हा तर त्याचा आणखीनच गोंधळ उडाला. आईने समोरच्या खुर्चीवर बसत त्याला समजावले की दोन दिवसांपूर्वी बाबाला थोडासा ताप येऊन गेल्यावरही घरात तिघांच्या करोना टेस्ट केल्या होत्या, त्यात बाबाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि आईला ताप वगैरे काही नसला तरीपण थोडय़ा दिवसांसाठी ते क्वारंटाइन की काय म्हणतात तसं राहावं लागणार होतं. ध्रुवला मात्र यातलं काहीच नव्हतं, पण थोडे दिवस आई-बाबांजवळ जाता येणार नाही असं समजल्यावर मात्र ध्रुव थोडा गडबडला. आई पुढे बरंच कायकाय सांगत होती- ज्यातलं बरचसं त्याच्या डोक्यावरून चाललं होत. कारण त्याच्या डोक्यात आता शंभर प्रश्नांची गर्दी झाली होती. आईच्या बोलण्यातून महत्त्वाचं समजलं ते इतकंच की त्याची नीरा आत्या कुठलातरी स्पेशल पास घेऊन उद्यापासून त्यांच्याकडे राहायला येणार होती. इतके दिवस करोनामुळे परीक्षा टळली.. मार्चपासूनच सुट्टी मिळाली.. आई-बाबासुद्धा ऑफिसला न जाता घरातच असतात.. या आनंदात असणाऱ्या ध्रुवला आता त्या दुष्ट करोनाचा खूप खूप राग आला. आजवर सगळी मोठी माणसं दिवसभर करोनाबद्दल सारखी वाईट बोलत असायची, पण मित्रांबरोबर एकत्र जमून खेळता येत नाही एवढय़ा एकाच कारणासाठी  त्याला करोना आवडत नव्हता. जरी सोसायटीतले मित्र एकत्र जमले नाहीत तरी सगळ्या मित्रांच्या समोरासमोरच्या गॅलरीत उभे राहून मोठय़ा आवाजात गप्पा चालायच्या. किंवा कधीतरी त्यांच्या आया त्यांना कॉन्फरन्स कॉल लावून द्यायच्या. पण आता मात्र तो दुष्ट करोना आपल्या घरात घुसून आपल्याला आईबाबांपासून दूर ठेवतोय म्हटल्यावर मात्र मोठी माणसं करोनाला वाईट का म्हणतात ते त्याला नीटच समजलं.  ध्रुवचे कपडे, खेळ, गोष्टींची पुस्तकं असं बरंच काही आईने बाहेरच्या हॉलमधे नेऊन ठेवलं आणि आजपासून.. बाबा बेडरूममध्ये, मी दुसऱ्या खोलीत आणि तू.. इथे बाहेरच्या खोलीत. हॉलमध्ये शहाण्यासारखं राहायचं हं राजा, असं म्हणताना आपली आई ओढणीने डोळे आणि नाक पुसतेय हे ध्रुवने बरोब्बर टिपलं. खरं तर ते पाहून त्यालाही मोठ्ठा सूर काढून आईला घट्ट मिठी मारावीशी वाटली, पण नाही.. आता  करोनामुळे एकमेकांपासून दूर राहायचं हा दिवसभर कानावर पडणारा संदेश त्याला आठवला. आपण आता उगाच हट्ट केला तर आपल्या आईला आणखी वाईट वाटेल म्हणून त्याने मोठय़ा माणसांसारखं वागायचं ठरवलं. तसाही तो या वर्षी तिसरीत जाणारच होता ना!

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story for kids moral story for children zws
First published on: 20-02-2021 at 01:02 IST