एका गावात एक राक्षस राहत होता. आता तुम्हाला वाटेल, ‘राक्षस आणि गावात?’ ‘कसा काय बरं?’ तीच तर गंमत आहे! फार पूर्वी हा राक्षस जंगलात राहायचा आणि येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना, त्यांच्या गायी-म्हशींना खायचा. एकदा त्याच्यावर वाघानं हल्ला केला आणि तो स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जो पळत सुटला, तो थेट गावातच येऊन पोहोचला. पण या धडपडीत त्याचा एक हात मात्र तुटला. इकडे गावात राक्षसाला पाहून लोकांची घाबरगुंडीच उडाली. ते आपापल्या घरात जाऊन लपून बसले. पण असं किती दिवस लपून बसणार? कामधंद्याला तर जायलाच हवं! आता काय करावं तेच त्यांना समजेना. लोक बाहेर येईनात, त्यामुळे राक्षसाचीही उपासमार होऊ लागली. शेवटी गावातल्या लोकांनी एकत्र येऊन राक्षसाला विनंती केली की, त्याने जंगलात परत जावं. खरं तर राक्षसाला वाघाची खूप भीती वाटत होती, म्हणून त्याला जंगलात जायचं नव्हतं. पण लोकांना खरं कारण कसं सांगणार? म्हणून तो म्हणाला, ‘‘हे पाहा गावकऱ्यांनो, मी आता इथेच राहणार आहे. मला जंगलात एकटं राहण्याचा कंटाळा आला म्हणून मी गावात आलोय. आता जर तुम्ही मला इथून घालवायचा प्रयत्न कराल, तर मी तुम्हाला खाऊन टाकीन. त्यामुळे मला गावात मुकाटय़ानं राहू द्या.’’
लोकांना राक्षसाची खूप भीती वाटत होतीच; त्याच्या धमकीनं ते अजूनच घाबरले. पण त्यांना कामाला तर जायलाच लागणार होतं. राक्षसाच्या भीतीनं घरात बसले तर सगळेच जण उपासमारीने मरतील. यावर काय उपाय काढावा, याचा विचार सगळ्या गावकऱ्यांनी मिळून केला आणि ते परत राक्षसाकडे आले. त्यांच्यापकी एक तरुण मुलगा मोठय़ा धाडसाने राक्षसासमोर गेला आणि म्हणाला, ‘‘हे बघ राक्षसा, आजपासून तुझ्या जेवणाखाणाची व्यवस्था आम्ही गावकरी मिळून करू. रोज तुझं पोट भरेल इतकं अन्न तुला मिळेल. मात्र, तू आम्हाला त्रास देऊ नकोस. आम्हाला आमचं पूर्वीसारखं आयुष्य जगू दे.’’
राक्षसाला तरी दुसरं काय हवं होतं? त्याच्या पोटापाण्याची सोय होत होती, त्यामुळे तोही या गोष्टीला लगेच तयार झाला. आणि गावकरी नेहमीसारखे कामधंद्याला जाऊ लागले. पण आता काय झालं, की राक्षसाला काहीच काम उरलं नाही, त्यामुळे तो रस्त्याच्या मधोमध बसून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या डोक्यात टपल्या मारू लागला आणि स्वत:चा वेळ घालवू लागला. त्यामुळे लोक अगदी त्रासून गेले. हैराण झाले. पण राक्षसाविषयीच्या भीतीपोटी ते हा त्रास मुकाट सहन करत होते. गावातल्या तरुण मंडळींनी मात्र राक्षसाचा बंदोबस्त करायचा असं ठरवलं. त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र केले आणि हातात कुदळ, फावडी, काठय़ा, सळया अशी मिळतील ती शस्त्रं घेऊन ते राक्षसावर चालून गेले. त्यांना तसं बघून राक्षस फार म्हणजे फारच घाबरला. त्याने गावाबाहेर धूम ठोकावी असा विचार केला. पण मोडक्या हातानं कुठे जाणार, असा त्याने विचार केला. त्यापेक्षा गावातल्या लोकांशीच गोडीगुलाबीने घेतलं तर आपली जेवणाखाणाची सोय होईल आणि जंगलातल्या प्राण्यांपासून, इतर राक्षसांपासून आपण सुरक्षितही राहू, असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने गावकऱ्यांसमोर सरळ लोटांगणच घातलं आणि म्हणाला, ‘‘मला माफ करा. मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. मला इथेच राहू द्या. मी कोणालाही टपली मारणार नाही. अगदी तुम्ही सांगाल तसाच राहीन. तसंच वागेन,’’ अशी गयावयाच करू लागला.
गावकऱ्यांना त्याची दया आली. त्यांना वाटलं, बिचारा राक्षस! राहू द्यावं त्याला इथं. पण त्याचा आपल्याला त्रास होता कामा नये असं काहीतरी केलं पाहिजे. कारण एका हाताने तो काम तरी किती वेळ करू शकेल? तो रिकामा राहिला तर परत आपल्याला त्रासच देईल.
 तेव्हा एक तरुण गावकरी पुढे झाला आणि म्हणाला, ‘‘मी सांगतो काय ते राक्षसाला. तुम्ही काळजीच करू नका.’’
तो तरुण राक्षसाला म्हणाला, ‘‘ठीक आहे, राहा तू आमच्या गावात. पण तुला आमच्यासारखं जितकं जमेल तितकं काम करावं लागेल. आम्ही खातो तेच खावं लागेल आणि मुख्य म्हणजे जेव्हा जेव्हा मोकळा वेळ असेल तुझ्याकडे- तेव्हा स्वत:च्याच डोक्यात टपल्या मारत बसावं लागेल, बोल आहे का मंजूर?’’ ‘हो, हो. आहे मंजूर!’ असं म्हणत राक्षस लगेचच तयार झाला आणि गावकऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला. आजही सातासमुद्रापल्याडच्या त्या जंगलापलीकडच्या गावात हा राक्षस मजेत राहतो आणि लोक त्याला ‘टपली राक्षस’ म्हणतात. त्यालाही त्याचं हे नवं नाव आणि हे गाव खूप आवडतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story tapli demon
First published on: 30-11-2014 at 06:47 IST