‘वाचावे नेमके’ या स्तंभातील शिफारशी ‘वाचू आनंदे’ या वाचनमालिकेशिवाय पूर्णच होऊ शकत नाही; इतके हे मराठी वाचनसंस्कृतीतले महत्त्वाचे वळण आहे. मुलांची दुसरी पिढी आता या संचाच्या आधारे वाचनसमृद्ध होते आहे. इंग्रजी शाळेत जाणारी मुले, मराठी पाठय़पुस्तकात अभिजात मराठी साहित्याचा कमी होत जाणारा समावेश या पाश्र्वभूमीवर अभिजात मराठी साहित्याकडे मुलांना आकर्षित करणे, या साहित्याची  झलक दाखवत मूळ मराठी साहित्यकृती वाचायला प्रेरणा देणे या हेतूने ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या मदतीने या संचांची निर्मिती झाली. पहिल्या दोन संचांची निर्मिती बालगटासाठी केली आहे.
या दोन संचांतले नुसते विषय बघितले तरी मुलांच्या मनात साहित्याविषयी कुतूहल निर्माण होते.
मुळात वाचायचं कशासाठी? इथपासून माधुरी पुरंदरे सुरुवात करतात आणि केवळ ‘आनंदासाठी’ इतकं सोपं उत्तर देऊनही टाकतात. ‘वाचू आनंदे’ या दोन्ही बालसंचात विविध विषयांवरच्या साहित्याचे वेचे घेतलेले आहेत. त्यात निसर्ग आहे, प्राणी-पक्ष्यांची सजीव सृष्टी, माणसांची सृष्टी, घरं, समाज, कष्टकरी माणसांचं जग असं खूप काही आहे. मराठी भाषेची विविधांगी रूपं यामध्ये वाचायला मिळतात. या पुस्तकाचं आणखी वैशिष्टय़ म्हणजे भारतीय परंपरेतील अनेक चित्रं रेखाटनं, शिल्पं, लोकचित्रंही या खंडात पानापानांवर आहेत. त्यातूनही जगण्याचे विविध पदर समजतात. त्याचबरोबर या कलाप्रकारांविषयी उत्सुकता निर्माण होते. तेव्हा एकाच वेळी लेख, कविता, अनुभवकथन, कथा, गाणी, ललित नाटक, चित्रशिल्पं कलाप्रकारांचा परिचय करून देत त्या साहित्यकृतीविषयी व जीवनाविषयी आकर्षण निर्माण करण्याचे काम ही पुस्तकमालिका करते.
पहिल्या भागात निसर्ग, प्राणिसृष्टी, बालपण व कुटुंब असे भाग करून त्याविषयीचे मराठी साहित्यातील नामदेव, तुकारामांपासून तर दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, सदानंद रेगे, जी. ए. कुलकर्णी, ग्रेस, प्र. ई. सोनकांबळे, ग. दि. माडगूळकर, आनंद यादव अशा किती तरी नामवंत साहित्यिकांच्या मूळ दर्जेदार कलाकृतींतून वेचे निवडले आहेत. प्रत्येक वेचा १ ते ३ पानांचा आहे. सुरुवातीला लेखक परिचय दिला आहे आणि कठीण शब्दांचा अर्थही दिला आहे. त्याचबरोबर चित्रशिल्पं हे त्याच आशयाशी जोडलेले- निवडले आहेत. त्याखाली चित्रशिल्पांचा प्रकार, कलावंतांची नावे आहेत.
दुसऱ्या भागात घर, गाव, प्रदेश, रस्ते, प्रवास, व्यवसाय, समाजजीवन, कला, भाषा हे विभाग निवडून संबंधित साहित्यवेचे दिले आहेत. यात माधव ज्यूलियन, राजा राजवाडे, दिलीप चित्रे, केशवसुत, व्यंकटेश माडगूळकर, बा. सी. मर्ढेकर, पु. ल. देशपांडे, खानोलकर यांसह अनेकांचे लेखन दिले आहे. विशेषत: भाषा या विभागात भाषेचे नमुने दिले आहेत. त्यात लीळाचरित्र, शिवचरित्र, ख्रिस्तपुराण, बिढार, नवभारत वाचनमाला अशा पुस्तकांमधून वेगवेगळ्या काळांतील मराठी भाषा मांडली आहे. आत्मकथन व प्रवासवर्णन या प्रकारांतील वेचे जास्त निवडले आहेत. जोडीला चित्रशिल्पं आहेतच.
पूर्वी पाठय़पुस्तकात अभिजात साहित्याचे प्रमाण जास्त असल्याने सामाजिक जाण, भावपरिपोष, संवेदनशीलता अधिक विकसित होत होती. ‘वाचू आनंदे’ ही मालिका मुलांना अभिजात मराठी साहित्याच्या संचिताशी जोडण्याचे काम करते आणि पालकांना व शाळांना, मुलांना ही मूळ पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी करते.
‘वाचू आनंदे’
बालगट भाग १ व २
संपादन : माधुरी पुरंदरे व नंदिता वागळे
ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे.
संच १ व २, पृष्ठे अनुक्रमे १५९ व १७७
दोन्ही संचाची मिळून किंमत २५० रु.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What should be read
First published on: 26-10-2014 at 12:25 IST