28 November 2020

News Flash

पवित्र उगम-प्रदेशांच्या गोष्टी..

‘चारधाम महामार्ग’सारखा विनाशकारी प्रकल्प रोखून नद्यांच्या उगम-प्रदेशांचे पावित्र्य राखण्याचे काम भाविक करतील का?

चारधाम परियोजनेसाठी गंगेत टाकलेला राडारोडा    मल्लिका भनोत

 

परिणीता दांडेकर

नदीच्या उगमाचा प्रदेश नैसर्गिकदृष्टय़ाही पवित्रच. याचे पावित्र्य राखणे मात्र आपल्या हातात. ‘चारधाम महामार्ग’सारखा विनाशकारी प्रकल्प रोखून नद्यांच्या उगम-प्रदेशांचे पावित्र्य राखण्याचे काम भाविक करतील का?

काही दिवसांपूर्वी एक आनंददायी बातमी आपण ऐकली असेल. हिरण्यकेशी नदीच्या उगम-कुंडात नव्या माशाच्या प्रजातीची नोंद झाली. या सोनेरी माशाला आपल्या नदीचे नाव देण्यात आले: शिस्तुरा हिरण्यकेशी! पश्चिम घाटातील अनेक नद्यांच्या उगम-प्रदेशात गेल्या काही वर्षांत ३०च्या वर नव्या माशांच्या प्रजाती नोंदल्या गेल्या आहेत.

कुठल्याही भारतीय व्यक्तीला उगम-प्रदेशांचे महत्त्व वेगळे सांगायची गरज नाही. आपल्याकडे  जवळपास प्रत्येक नदीचा उगम कोणत्या न कोणत्या धर्मात किंवा समूहात पवित्र आहे. उगमाच्या अनेक कथा आहेत, अनेक ठिकाणे आहेत, जसे ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावणारी गोदावरी, कांचनझोन्गा पर्वतातून उगम पावणारी तिस्ता, कृष्णामाई मंदिरात भूजलातून उगम पावणारी कृष्णा, गंगोत्री हिमनदीतून उगम पावणारी गंगा, बर्फाळ मानसतालच्या आसपास उगम पावणाऱ्या सतलज किंवा ब्रह्मपुत्र, पाणथळ कुरणातून उगम पावणारी सिंधू, मोह- झाडाच्या मुळांतून उगम पावणारी इंद्रावती.. अनेक नद्यांच्या अनेक तऱ्हा.

या प्रत्येक उगमातून एक नदीच नाही तर कैक लोककथा, माहात्म्य, गीते उगम पावतात. शिव मंदिरांचे, देवरायांचे आणि उगम-प्रदेशांचे नाते देशभर दिसते. महाराष्ट्रात कित्येक देवरायांमध्ये छोटय़ा नद्यांच्या, ओढय़ांच्या उगमाजवळ लोकदैवते नांदती आहेत. अगदी अफगाणिस्तान, ताजिकिस्तानमध्येदेखील ‘चश्मे’ म्हणजे छोटे झरे आणि काबूलसारख्या नद्यांचे उगम पवित्र मानले जातात. तिस्ता, रंगित, अरुण, कोसी नद्यांचे उगमस्थळ कांचनझोन्गा पर्वत सिक्किममधील लेपचा या बौद्ध समूहासाठी अतीव पवित्र. अनेक पिढय़ांनी हा डोंगर आणि त्यांचा ‘झोन्गु’ परिसर प्राणपणाने जपला आहे, राखला आहे. काश्मीरमधील झेलम/ वितस्ता नदीच्या उगमाचा ‘वेरीनाग’चा उल्लेख नीलमाता पुराणात आहे आणि नंतर त्याला हिऱ्याच्या कोंदणासारखे बांधकाम मुघलांनी केलेले आहे. गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी, नर्मदा, तापी या प्रत्येक नदीचे उगमस्थळ हे तीर्थक्षेत्र. गंगा-यमुनेबद्दल बोलायलाच नको. तिथे सगळेच पवित्र.

मग या पावित्र्याचा, कथांचा, माहात्म्याचा, धारणांचा परिणाम नक्की काय झाला?

सध्या उत्तराखंडात ‘चारधाम महामार्ग परियोजने’चे काम जोरदार सुरू आहे. साधारण ९०० किमी लांबीचा हा महामार्ग गंगोत्री, यमुनोत्री, बद्रिनाथ आणि केदारनाथ या तीर्थक्षेत्रांना गुळगुळीत डबल लेन हायवे करून जोडणार. आपल्या पंतप्रधानांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ २०१६ मध्ये केली, जेव्हा याला कोणत्याच परवानग्या नव्हत्या. त्यानंतर दोन वर्षे यावर हरित लवादात केस चालली. ही ठिकाणे म्हणजे फक्त मंदिरे नव्हेत, तर गंगा, यमुना, अलकनंदा आणि मंदाकिनी या चार महत्त्वाच्या नद्यांची उगमस्थाने. नैसर्गिकदृष्टय़ा अत्यंत नाजूक ठिकाणी वसलेल्या जागा. या रस्त्यासाठी ३५,००० झाडांची कत्तल होत आहे. हिमालयातील संवेदनशील क्षेत्रात इतका मोठा प्रकल्प म्हणजे त्याचा पर्यावरणीय अभ्यास कसून होणे अनिवार्य. २०१३ मधील उत्तराखंड पुरानंतर याचे महत्त्व सांगायची गरज नाही; पण परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाला याची गरज वाटत नाही. जसे भुरटे लोक ‘टॅक्स वाचवण्यासाठी’ शंभर क्ऌप्त्या करतात, तसेच मंत्रालयाने या परियोजनेचे ५३ तुकडे केले, जेणेकरून प्रत्येक तुकडा पर्यावरण मान्यतेच्या निकषांमधून सटकेल. हे आपल्या मंत्रालयाचे काम : एका अत्यंत नाजूक, अपघातप्रवण, भूकंपाची मोठी शक्यता असलेल्या आणि तथाकथित ‘पवित्र’ प्रदेशात. आज या रस्त्यांसाठी खूपशा ‘ग्लेशियाल मोरेन’ म्हणजे हिमनद्यांनी जमवलेल्या मोकळ्या दगडांच्या पर्वतांत अनियंत्रित ब्लास्टिंग सुरू आहे, काटकोनात- ९० अंशात – पर्वतांना कापणे सुरू आहे, जमलेला सगळा राडारोडा नि:संकोचपणे याच नद्यांमध्ये टाकला जात आहे. यामुळे मंदाकिनी नदीचा प्रवाह काही काळ थांबला. अलकनंदा नदीतदेखील हेच झाले आणि उत्तरकाशीजवळ गंगेतही. गंगेचे उगमस्थळ गंगोत्री ते उत्तरकाशी या टापूला ‘संवेदनशील क्षेत्र’ असे आरक्षण मिळावे यासाठी अनेकांनी कष्ट केले. स्वर्गीय जी. डी. अगरवाल यांनी आमरण उपोषण करून प्राणांची किंमत मोजली; पण अगदी या क्षेत्रातही नदीत राडारोडा टाकणे सुरूच आहे. गडकरींना रस्ता लवकर करण्याची घाई आहे, तर जावडेकरांना सगळ्या मान्यता देण्याची घाई आहे.

कावेरी नदी उगम पावते त्या तळकावेरी भागात भाविकांसाठी काँक्रीट ओतले गेले. सिंधू नदीचा उगम शोधता येत नाही, कारण तिथे चीनने धरण बांधले आणि आपल्याला एक ब्रिटिश संशोधक तिथे जाऊन हे सांगेपर्यंत माहितीच नव्हते! सिक्किममधील लेपचा समूहांना आपला झोन्गू परिसर आणि पवित्र नद्यांचा उगम-प्रदेश ४४ जलविद्युत धरणांपासून वाचवण्यासाठी बेमुदत उपोषण करावे लागले.

जवळचे उदाहरण बघू. गोदावरी उगम पावते ते त्र्यंबकेश्वर. गेली अनेक वर्षे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला केंद्र सरकारकडून शेकडो कोटी रुपये कुंभमेळा आणि प्रदूषण नियंत्रणासाठी मिळतात. मागच्या वर्षी नदी पुनरुज्जीवनाच्या एका स्तुत्य कार्यक्रमासाठी तिथे गेले असता राजेश पंडित यांनी दाखवलेले उगमस्थळ वेगळेच होते. ब्रह्मगिरीपासून खाली येणाऱ्या जवळपास प्रत्येक नदीचा मार्ग आपण रोखला आहे. एक ‘नीलगंगा’ नावाची नदी आहे- ती जेमतेम किलोमीटरभरच आकाश बघते, नंतर गटारात अदृश्य होते. कुशावर्तातून उगम पावलेली गोदावरीदेखील यातून सुटली नाही. ज्या नदीसाठी भाविक भारतभरातून येतात, तिला रस्त्याखाली टाकण्यात आले आहे. इथे जवळपास सगळ्या छोटय़ा नद्यांच्या संगमावर लहान-सुबक मंदिरे होती, आज त्या नद्या दिसत नाहीत आणि मंदिरे अर्धी रस्त्याखाली गाडली गेली आहेत. त्र्यंबकेश्वर गाव ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी वसलेले. नद्या गाडल्या तरी पाणी आपली वाट विसरत नाही आणि नदीचे अस्तित्व संपत नाही. छोटय़ा पावसातदेखील इथे मोठे पूर येतात; रस्त्यात, घरात पाणी शिरते.

उगम-प्रदेशांची काळजी घेणे आपल्या शहरांच्या, गावांच्या, शेतांच्या हिताचे. उगम-प्रदेश बहुतेकदा प्रथम आणि द्वितीय श्रेणी प्रवाहांनी बनलेले असतात. दोन ‘प्रथम श्रेणी प्रवाहां’च्या संगमाने द्वितीय श्रेणी प्रवाह बनतो, दोन द्वितीय श्रेणीने तृतीय. मोठय़ा नद्या या पंचम श्रेणी प्रवाह असू शकतात. उगम-क्षेत्रे महत्त्वाची; कारण इथून नदीला प्राथमिक स्वच्छ पाण्याचा, पोषक द्रव्यांचा आणि गाळ-द्रव्यांचा (सेडिमेंट्स) पुरवठा होत राहतो. अनेक प्रजातींना आश्रयस्थान मिळते. ते या सोयी फुकट उपभोगत नाहीत, तर नदीकिनारचे झाड असो, नदीतला मासा असो की शेवाळ, हे नदीचे आरोग्य राखायला मदत करतात. इथली जंगले आणि पाणथळ प्रदेश पुराचा आवेग कमी करतात आणि मुख्य नदीची पातळी राखायला उपयुक्त ठरतात. जर उगम-प्रदेश अबाधित आणि स्वस्थ राहिले तर नदीचे आरोग्य स्वस्थ राहणे सोपे आणि नदीचे आरोग्य म्हणजे समाजाचे आरोग्य.

नदी अभ्यासक एलेन वोह्ल म्हणतात, उगम-प्रदेश म्हणजे जशी झाडाची पाने. काही पाने काढली तर झाड तगेल; पण सगळी पाने खुडून टाकली तर मात्र झाड वठणार. तसेच नदीचे. आपल्या शरीरातील रक्तपुरवठा करणाऱ्या मोठय़ा धमन्या आपल्याला ओळखू येतात, पण खरे रक्ताभिसरण बारक्या नसांमधून होत असते. तसेच

उगम-प्रदेशांचे.

अनेक ठिकाणी जिथे उगमांना धार्मिक महत्त्व शून्य आहे तिथे डोळस अभ्यासाने त्यांना समोचित संरक्षण लाभले आहे. ही काही चैनीची बाब नव्हे. ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यार्रा नदीचे उगमाजवळचे एक लाख हेक्टर क्षेत्र सुरक्षित आहे : लोकांना हाकलून आणि बेकायदा रहिवासी ठरवून नव्हे, तर त्यांना शहराच्या नफ्याचा भागीदार बनवून. अमेरिकेत ट्रम्प सरकारने जे अविचारी निर्णय घेतले आहेत त्यात ऐतिहासिक ‘क्लीन वॉटर अ‍ॅक्ट’मध्ये ढवळाढवळ करून उगम-प्रदेश आणि मोसमी नद्यांचे संरक्षण काढून घेण्याचा घाट घातला आहे. इथले शास्त्रज्ञ आणि सामान्य नागरिक त्याविरुद्ध अभ्यासपूर्वक लढा देत आहेत. आपल्याकडेही विविध गट उगमांचे खरे पावित्र्य राखत आहेत – जसे मुंबईतील रोशनी शाह – ज्या आपल्या गटाबरोबर मिठी नदीच्या उगमापाशी ‘पल्मिरा पाम’ झाडांची लागवड करत आहेत. या झाडाच्या राईतूनच मिठी नदीचा उगम आहे.

लाखो लोकांना, अनेक जीवांना जीवन देणारी नदी : कोणत्याही इतर अधिष्ठानाशिवायदेखील तिचा उगम पवित्र. याचे पावित्र्य राखणे मात्र आपल्या हातात. चारधाम महामार्गसारखा विनाशकारी प्रकल्प रोखून नद्यांच्या उगम-स्थळांचे पावित्र्य राखण्याचे काम भाविक जोमाने करतील, अशी आशा आहे.

महाराष्ट्राने नद्यांची उगम-स्थळे जपण्याची नीती आणि त्याची अंमलबजावणी करून दाखवली तर देशाला उत्तम उदाहरण मिळेल.

लेखिका ‘साउथ एशियन नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’ या ‘ना नफा’ संस्थेसाठी काम करतात.

ईमेल : parineeta.dandekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 12:02 am

Web Title: article on stories of the source of the holy river abn 97
Next Stories
1 पुराच्या पूर्वसूचना शोधायच्या कुठे?
2 जागतिक नदी दिन कुणामुळे ‘साजरा’?
3 ‘हवामान बदला’च्या मागे लपून..
Just Now!
X