मी डॉ. अलका सुरेश गुडधे, निवृत्त प्राध्यापक (गणित) आणि विभाग प्रमुख शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती. ३१ मार्च २०१८ ला ६३ वर्षे पूर्ण केली. निरोप समारंभाच्या पाचही कार्यक्रमांत डोळे पाणवल्याशिवाय राहिले नाहीत. कारणही तसंच होतं. ते माझ्यावर भरभरून प्रेम करणारे विद्यार्थी, इतर प्राध्यापक, मित्रमैत्रिणी सगळे समोर दिसत होते आणि उद्यापासून या स्नेहाला कुठे तरी बांध लागणार होता, हे नक्की होतं. नंतर दोन-तीन दिवसांनीच अमेरिकेत गेले. नातवांसोबत चांगली पाच महिने राहिले. आजीपण मस्त अनुभवलं आणि परतले.

पण इथे आल्यावर पुढे काय? हा प्रश्न होताच. ईश्वराच्या कृपेने प्रकृतीची काही तक्रार नव्हती. आत्तापर्यंत गेलेल्या आयुष्यासारखंच आनंदाने आणि व्यस्त घालवयाची इच्छा होती. मी विज्ञानाची विद्यार्थिनी असले तरी संगीत, चित्रकला, आदी सगळ्याच कलांमध्ये मला रुची आहे. प्रत्येक मोठय़ा सुट्टीत मी काही तरी विणकाम, अगदी – दोन सुयांचे विणकाम, क्रोशाकाम, शटलचं काम, मणिकाम इत्यादी अनेक कला प्रकार करायचे. आजपर्यंत अनेक स्वेटर वगैरे केले असतील. ते करताना इंटरनेटचा वापर करून नवीन नवीन डिझाइन केले. मग मी या सर्व छंदांचा उपयोग करायचा ठरवला आहे. माझी मुलगी आणि सून (दोघीही अमेरिकेत) मला नेहमी म्हणायच्या, की मी एक ब्लॉग सुरू करावा. मुलीने अमेरिकेतून परत यायच्या आदल्या दिवशी पोस्ट कशी लिहायची, फोटो कसे टाकायचे, पोस्ट पब्लिश कशी करायची वगैरे बेसिक मुद्दे सांगितले आणि ४ सप्टेंबर २०१७ ला मी एक ब्लॉग सुरू केला. ब्लॉगवर मी केलेले नमुने वर्णनासहित लिहिणे, त्याचे वेगवेगळ्या स्थितींतले फोटो काढणे अशी सुरुवात केली. आता हळूहळू स्वत:च व्हिडीओ कसा बनवायचा, शिवाय त्या व्हिडीओत लिहिलेलं मॅटर कसं टाकायचं वगैरे शिकतेय. या सगळ्यात खूप छान आनंदात वेळ जातो.

या ब्लॉगमधून मी जगाशी जोडले गेले. जे करायला नोकरीपायी वेळ मिळत नसे ते मनातलं काम करता येणार आहे. विणकाम, भरतकाम यांसारख्या विविध कलांमध्ये नवीन पिढी कमी रस घेते असं मला वाटतं. त्यांना नवीन माध्यमांद्वारे कदाचित इंटरेस्ट निर्माण करता येईल. मला मराठीत यूटय़ूब तयार करून या बाबीकडे लक्ष वेधायचं आहे. इंग्रजीत अशा खूप यूटय़ूब आहेत, पण मराठीत असतील तर सगळेच त्याचा फायदा घेऊ शकतील. आपल्याकडे पाश्चात्त्यांसारखे पुरुष या कलांमध्ये रस घेताना दिसत नाहीत. त्यांनीही या कलांमध्ये लक्ष द्यायला हरकत नाही. तेही व्हावं, ही अपेक्षा आहे. त्यामुळे कला वृद्धिंगत व्हायला मदतच होईल. यासारख्या काही उद्देशांनी मी ब्लॉग सुरू केला आहे.

हा माझा निवृत्तीनंतरचा प्रवास सुरू केल्यावर गुलजार यांच्या कवितेची ही ओळ ठळकपणे जाणवायला लागली आणि मी त्याची सत्यता अनुभवायला लागले की, ‘‘आकाश के उस पार भी आकाश है.’’ निवृत्तीच्या आधीचं शिक्षणाचं, गणिताचं संशोधनाचं जग जितकं विशाल होतं आणि जितकी तिथे विकासाची व्याप्ती होती, तितकंच निवृत्तीनंतरच हे विश्वही विस्तीर्ण आहे आणि त्याची व्याप्तीसुद्धा खूप मोठी आहे. मी या विशाल क्षेत्रात आता कुठे पदार्पण करते आहे..

– डॉ. अलका गुडधे

‘इदम् न मम’

मी ८२ वर्षांची ज्येष्ठ नागरिक आहे. १९९६ मध्ये कृष्णाकाठच्या सुपीक प्रदेशातून स्थलांतरित झाले. मी सांगलीची रहिवासी. माझा मुलगा आणि सून दोघे डॉक्टर आहेत. त्यांनी प्रॅक्टिससाठी डोंबिवली शहर निवडले. स्थलांतरित होताना जरा नाराज होते. पण येथे आले आणि केव्हा डोंबिवलीकर झाले ते कळलेच नाही. तेव्हा मी ६० वर्षांची होते. इथे मला माझे व्यक्तिमत्त्व खुलविण्यास वाव मिळाला, तो ज्येष्ठ नागरिक मंडळ एमआयडीसी पूर्व आणि स्वरूपिणी भ. मंडळ पूर्व यांच्यामुळे. दोन्ही मंडळाचे अध्यक्षस्थान मी भूषविले

आहे. त्या काळात मंडळांचा उत्कर्ष कसा होईल याचा ध्यास घेतला. विविध कार्यक्रम, उपक्रम राबवले. सध्या मी ज्येष्ठ नागरिक मंडळाची विश्वस्त म्हणून कार्यरत आहे. या मंडळात १० वर्षांत अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले. २०१६ जूनमध्ये ‘गीतारहस्य शताब्दी महोत्सव’ यांची सांगता केली. प्रसिद्ध वक्ते बोलावले होते. त्यांचे विचार आणि लोकमान्यांचे पणतु दीपक टिळक यांचे विचार कार्यक्रमात ऐकले.

मला भजन अणि सुगम संगीत आवडते. वेळप्रसंगी दोन्ही कार्यक्रमात भाग घेते. थोडेफार लेखनही करते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेते. नाटकातून भूमिका करते. माझे आणि सुनेचे नाते जिव्हाळ्याच्या मैत्रिणीसारखे आहे. दोन्ही मुली विद्याविभूषित असून आपल्या घरी सुखी आहेत. अधूनमधून जीवनात उन्हाळा पावसाळा येतो, पण मी मनावर न घेता चालायचेच म्हणून सोडून देते. सकाळी उजाडले की, ऑल वेल! मला चार नातवंडे आणि दोन पणतू आहेत. सहचर सोडून गेल्यावर जरा सैरभैर झाले होते. पण मुलांनी सावरले. ३७ वर्षांपूर्वी झालेल्या असाध्य रोगातून मी बरी झाले. नियमित व्यायाम, प्राणायाम, मिताहार यावर माझी भिस्त असते. ‘इदम् न मम’ असे म्हणून आजही स्वयंपाक, बाजारहाट, इतर व्यवहार सांभाळते. माझ्या नित्य व्यवहारात जरा जरी बदल झाला तरी मुलांच्या लगेच लक्षात येते. आपुलकीने चौकशी करतात आणि इलाजही करतात. मुले तर माझीच पण सूनही माझीच म्हणण्याचे नाते निर्माण झाले आहे. आणखी काय हवे?

– मालती खाडिलकर

भजनी मंडळामुळे वेळ सत्कारणी

मे २००९ मध्ये मी गारगोटीच्या श्री शाहू कुमार भवन प्रशालेतून सेवानिवृत्त झाले. गारगोटीत योग वर्गाची सुरुवात २००८ मध्येच झाली होती. तेथे रोज पहाटे मी आणि माझे यजमान दोघेही नियमितपणे जात असू. त्यामुळे माझा सकाळचा वेळ चांगला जाई. मात्र, दुपारचा मोकळा वेळ सत्कारणी लावण्यासाठी काही तरी करणे आवश्यक आहे असे मला वाटू लागले. त्या सुमारास, एकदा सहज मी माझ्या बहिणीकडे- आशाकडे कोल्हापूरला गेले होते. तेव्हा तिचे भजनी मंडळ पाहिले. भजने ऐकली आणि आपणही असे भजनी मंडळ गारगोटीत चालू करावे, असा विचार माझ्या मनात आला. दुसरे दिवशी गारगोटीला आल्यावर मी राहते त्या कलानगरमधील माझ्या ओळखीच्या स्त्रियांसमोर भजनी मंडळ चालू करण्याची कल्पना मी मांडली. सर्वानाच ती कल्पना पसंत पडली. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस दुपारी ४ ते ६ भजनासाठी सर्व जणी आमच्या घरी येऊ लागल्या. आमच्यातील काही जणींना टाळ कसे वाजवायचे याची माहिती होती. त्यामुळे सर्व जणी टाळ वाजविण्याची कला सरावाने शिकल्या. माझे यजमान गाण्यातील जाणकार असल्याने आवश्यक असेल तेथे मार्गदर्शन करत. ८-१० जणींवर सुरू झालेले मंडळ २०-२२ जणींचे झाले.

आमची भजने चांगली होतात ही बातमी गावातील ‘वैभव महिला मंडळात’ पोचली. रामनवमीच्या उत्सवात एक दिवस त्यांनी आमचे भजन ठेवले. ते सर्व जणींना इतके आवडले, की पुढील वर्षीचे आमंत्रणही त्यांनी लगेच देऊन ठेवले. नंतर शेणगाव, म्हसवे अशा गारगोटीच्या आसपासच्या गावांतील आमंत्रणेही आम्हाला येऊ लागली. आमचाही आत्मविश्वास मग वाढीस लागला. आता, नवरात्रीच्या उत्सवात नऊ दिवस रोज कुठे ना कुठे आम्हाला भजनाचे आमंत्रण असतेच.

रोज सकाळी ५.३० ते ६.४५ मी योग वर्गाला जाते. तेथे आवश्यकतेनुसार मी योगशिक्षक म्हणूनही काम करते. परिसरातील काही शाळांमधूनही मी ८/१० दिवसांची योग शिबिरे आयोजित केली आहेत. योगशिक्षक म्हणून मी करीत असलेले काम तसेच आमचे भजनी मंडळ याची दखल गारगोटीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी घेतली आणि ‘स्वच्छ सुंदर गारगोटी’ या अभियानांतर्गत माझा आणि भजनी मंडळाचा सत्कार केला. तेव्हा मी करत असलेल्या कामाचे चीज झाले असे मला वाटले आणि खूप आनंद झाला. गेल्या चार वर्षांत आमच्या मंडळाचे सुमारे ६० कार्यक्रम झाले. अधूनमधून एक दिवसाच्या सहलीला आम्ही जात असतो. गेल्या वर्षीपासून आम्ही भिशीही चालू केली आहे. जिला भिशी लागेल त्या महिलेच्या घरी भजन असते.

भजनातून काही लोकशिक्षणही व्हावे असे मी पाहते. म्हणून आमच्या कार्यक्रमाच्या निवेदिका भाग्यश्री भुर्के  मध्यंतरात एखादी छोटीशी बोधकथाही सांगत असतात. कलानगर भजनी मंडळातील बहुतेक सर्व स्त्रिया माझ्याप्रमाणेच ‘ज्येष्ठ नागरिक’ या संज्ञेत बसणाऱ्या आहेत. त्यामुळे सर्वाचे आचारविचार चांगलेच जुळतात. भजनी मंडळ नसते तर आम्ही आमचा वेळ काही तरी करत वाया दवडला असता; पण मंडळात आल्यामुळे आमचा वेळ सत्कारणी लागला असे वाटते. अशीच सर्व जणींची प्रामाणिक भावना आहे.

– सुनीता जोशी, गारगोटी

लोकसहभागातून विधायक कार्य

२० व्या शतकाच्या अखेरच्या दिवशी, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) म्हणून निवृत्त झालो. ‘महाराष्ट्रातील ग्रामीण पाणीपुरवठय़ाची सद्य:स्थिती’ या अभ्यासासाठी एका ब्रिटिश अभियंत्यांनी बोलावले. वर्षभर काम चालले. कालांतराने, ‘ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची देखभाल’ या संदर्भात शासनाने माझ्या नेतृत्वाखाली एक अभ्यासगट नेमला. वर्षभराच्या अभ्यासानंतर, शासनाने देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतींना अर्थसहाय्य करण्याचे सूत्र ठरवले.

दरम्यान, सामाजिक अंगाने काम करण्याची संधी मिळाली. लोकसहभागातून ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीच्या ‘सेक्टर रिफॉमर्स’ या केंद्र सरकारच्या कार्यक्रमासाठी कर्वे समाजविज्ञान संस्थेच्या सहभागासह धुळे आणि अमरावती जिल्ह्य़ात काम केले. खेडोपाडी हिंडून, ग्रामसभा भरवून पाणीपुरवठा समित्या स्थापून, समाजविज्ञान पदवीधारकांना प्रशिक्षण दिले. योजना तयार करतानाच ग्रामस्थांनी लक्ष घालावे, कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे आणि योजना व्यवस्थित चालवाव्या, असे प्रशिक्षणाचे स्वरूप होते.

पाठोपाठ जागतिक बँकेसाठी ‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ या पथदर्शी प्रकल्पासाठी काम केले. इथेही ग्रामसभांच्या माध्यमातून, गावांत पडणारा पाऊस, घेतली जाणारी पिके त्यासाठी उपसले जाणारे भूजल या संदर्भात अन्य सहकाऱ्यांसह ‘जल अर्थसंकल्प’ ही कल्पना राबवली. पाणी पुरवणे आणि भूजल वापर मर्यादित ठेवण्यासाठी सर्वाचा मिळून  हा प्रयोग होता.

दरम्यान, आमच्या निवृत्तांच्या संघटनेचे अध्यक्ष होऊन सभासदांचे प्रश्न सोडवत, निवृत्तिवेतनाचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे शासनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका लढवली.

२००६ मध्ये जागतिक बँक अर्थसहाय्यित ‘जलस्वराज्य -१’ या ग्रामीण पाणीपुरवठा प्रकल्पात, पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या नेतृत्वाखाली, अभियंता आणि समाजसेवा करू पाहणाऱ्या हिंगोली-वाशिम जिल्ह्य़ातील युवक-युवतींना प्रशिक्षण दिले. योजना शाश्वतरीत्या चालवणे हा गाभा होता. २०१५ मध्ये ‘जलस्वराज्य -२’ प्रकल्पात  पुणे जिल्ह्य़ातील योजना आखणीसाठी एका संस्थेने गटप्रमुख म्हणून आमंत्रण दिले. गावागावातील पाणीटंचाई अनुभवण्यासाठी एप्रिल – मे च्या उन्हाळ्यात ५० हून अधिक खेडेगावांत पायपीट केली. योजनांच्या स्वरूपास ग्रामसभांची मान्यता मिळवली. त्याआधी ‘गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक जलसंपदा विकास आणि व्यवस्थापन’ प्रकल्पात सहभागी होऊन अडीच वर्षे काम केले. या अहवालावर आधारित गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक जल आराखडा आता शासनाने मंजूर केला असून, सध्या मी त्याचे (तीन खंड – पृष्ठे १०००) इंग्रजीतून मराठीत भाषांतर करीत आहे. अनेक लेखही प्रसिद्ध झाले आहेत.

सामाजिक जाणीव विसरलेलो नाही. आनंदवनासह अन्य संस्था, गुणवान पण गरिबीमुळे शिक्षण घेणे कठीण असे विद्यार्थी, अडचणीतल्या व्यक्ती यांना यथाशक्ती अर्थसहाय्य करून आनंद मिळवतोय.

आयुष्यभरात एकवेळी मराठी (नाटय़गीते-भक्तिगीते-भावगीते) आणि हिंदी सिनेमांच्या गाण्यांची यादी केली. ३००० वर आकडा गेला. एकूण काय, निवृत्तीनंतरचे आजवरचे दिवस मस्त जात आहेत.

– अशोक अळवणी