ब्लॉगबेंचर्स विजेत्या अर्षद अतारच्या भावना

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोंधळात मोकळेपणाने वाटते ते मांडण्याची संधी मिळणे खूप महत्त्वाचे वाटते,’ अशा भावना ‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या अर्षद अतार याने सोमवारी व्यक्त केल्या.

‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’ मध्ये ‘कारभारी बदलला, पण..’ या अग्रलेखावर अर्षद याने ब्लॉग लिहिला होता. मुळचा बारामती येथील अर्षद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागात पदविका अभ्यासक्रम करत आहे. प्राध्यापिका डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्या हस्ते त्याला पारितोषिक देण्यात आले.

या वेळी अर्षद म्हणाला, ‘मी दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये सहभागी झालो. सध्या मायबाप सरकार म्हणण्यापेक्षा मायबाप शेतकरी म्हणणे योग्य असताना, प्रत्यक्षात शेतकरीच अनेक गोष्टींमध्ये भरडला जातो आहे.   पारितोषिक मिळाल्याचा आनंद आहेच. सध्या जे वाटते ते मोकळेपणाने मांडता येण्याची संधी मिळणे फार महत्त्वाचे आहे.’

‘लोकसत्ता’ बुद्धीला चालना देणारे उपक्रम आयोजित करते. हेच त्याचे वेगळेपण आहे. माझ्या विद्यार्थ्यांला पारितोषिक मिळाल्याचा विशेष आनंद आहे,’ अशा भावना डॉ. बर्वे यांनी व्यक्त केल्या.

(((   ‘कारभारी बदलला, पण..’ या अग्रलेखावर ब्लॉग लिहिलेल्या प्रथम क्रमांक विजेत्या अर्षद अतार याला डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्या हस्ते सोमवारी पारितोषिक देण्यात आले.   ))