News Flash

माझ्या हृद्य शैक्षणिक आठवणी

नाशिकच्या मुलींच्या सरकारी शाळेतून मी प्राथमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झाले.

गोष्ट आहे १९५२ ते १९६० पर्यंतची. नाशिकच्या मुलींच्या सरकारी शाळेतून मी प्राथमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झाले. ही परीक्षा इयत्ता सातवीत घेतली जात असे. ही प्रमाणपत्र परीक्षा प्रतिष्ठेची मानली जाई. माझ्या आधीच्या पिढीतही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यास प्राथमिक शाळेत नोकरी मिळत असे. हे प्रमाणपत्र माझ्याकडे आहे. या परीक्षेसंबंधी लिहिण्याचे कारण आताच्या पिढीला या परीक्षेबद्दल सांगावसे वाटले.

घरच्या परिस्थितीमुळे हायस्कूलचे शिक्षण घेण्याचे दरवाजे बंद होते. मन स्वस्थ बसू देत नव्हते. मैत्रिणींना हायस्कूलला प्रवेश घेतलेला कळले. माझ्या आईच्या मैत्रिणीचे पती एन्. इ. आय गर्लस् स्कूल (आताचे बिटको गर्लस् स्कूल) या शाळेत संगीत शिक्षक होते. दस्सकर त्याचे नाव. ते शास्त्रीय संगीताचे घरी वर्गही घेत. गाण्याचे त्यांचे कार्यक्रम होत. मी त्यांच्याकडे गेले. हायस्कूलच्या प्रवेशाबद्दल बोलले. शाळेची फी भरू शकणार नाही हेही सांगितले. त्यांनी त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकांशी (दा. दि. परांजपे) बोलून मला हायस्कूलला प्रवेश दिला. फ्रीशिपमध्ये महिना एक रुपया फी द्यावी लागे. मी ठरविले छोटय़ा मुलांच्या शिकवण्या करू. त्या पूर्ण शिक्षण होईपर्यंत करून स्वत:चा खर्च व घरालाही थोडा हातभार लावला.

१९५६ला मी ११ वी एस. एस. सी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. हेडसरांनी विचारले; पुढे काय करणार? मला तर काहीच कळत नव्हते. कॉलेजला प्रवेश घेणे तर शक्यच नाही. सरांनी मला नर्सिगला जाण्याचा सल्ला दिला. स्टायपेंड मिळेल. खर्च लागणार नाही. नंतर नोकरी पण मिळेल. वडिलांना मी नर्स होणे पसंत नव्हते. त्या काळात नर्सिगला प्रतिष्ठा नव्हती. परत सरांकडे गेले. ते म्हणाले, आपल्या शाळेत एस. टी. सी.चे वर्ग संध्याकाळी असतात. तू यायला लाग. ‘‘पण सर फी किती आहे?’’ मी विचारले सर म्हणाले ‘‘मी मागितली आहे का?’’ मी वर्गाला जाऊ लागले. एस.टी. सी म्हणजे आजचे डीएड्. सरांनी फक्त बारा रुपये फॉर्म फी घेतली. सरांनी मला ऑगस्टमध्ये आमच्याच शाळेच्या प्राथमिक शाळेत नोकरी दिली. पगार ६० रु. महिना.

एस्.टी.सी.चे वर्ग आमच्याच शाळेच्या मुलांच्या शाळेत भरत. शाळेतील शिक्षक शिकवायला येत. मानसशास्त्र शिकवायला मुलांच्या शाळेचे (न्यू हायस्कूल) मुख्याध्यापक येत. अत्यंत अभ्यासपूर्ण त्यांचे शिकवणे होते. मानसशास्त्राचा परिचय तेथे प्रथम झाला. सरांनी मानसशास्त्रावर पुस्तकेपण लिहिली आहेत. ती कॉलेजच्या आभ्यासक्रमांत होती. ग. वि. आकोलकर सर शाळेत अकरावीला मराठीही शिकवत. त्यांचा मराठीचा आदर्शपाठ पाहिल्याचे अजूनही आठवते. इ. पाचवी, सहावीच्या वर्गावर त्यांनी कवितेचा पाठ घेतला होता. कवितेत वृद्ध/भिकाऱ्याचे डोळे थिजलेले होते असे वर्णन होते. थिजलेले शब्दाचे स्पष्टीकरण त्यांनी छोटय़ा मुलांना व्यवहारातील उदाहरणाने ठसविले. थंडीत खोबरेल थिजलेले कसे स्थिर असते; तसे त्याचे डोळे होते. अशा शिक्षकांच्या मार्गदर्शनातून मी घडत गेले. त्याचा उपयोग मला शिक्षकीपेशात झाला.

एस.टी.सी. झाल्यावर माझ्या सरांनी सल्ला दिला, बी.ए. कर. आपल्या शाळेत एस.एन.डी.टी.चे वर्ग संध्याकाळी असतात. पाटणकर या सेवाभावी व्यक्तीने नोकरी करणाऱ्या, गृहिणी असणाऱ्या स्त्रियांसाठी शिक्षणाची सोय केली होती. सर्व प्राध्यापक एच, पी. टी कॉलेजचे विनावेतन शिकवायला येत. परीक्षेला नासिकमध्ये केंद्र नसल्याने पुण्याला जावे लागे.

आम्हाला काव्य शिकवायला कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) येत.  त्यांच्या कविता संग्रहाची नावे पाठय़पुस्तकातून वाचलेली होती. पाठय़पुस्तकांत त्यांच्या कविताही असत. पण आता जाणवते की त्यांच्या तोंडून कवितांचे रसग्रहण ऐकणे, तो अनुभव माझ्यासाठी केवढा मोलाचा होता. परीक्षेला थोडेच दिवस राहिले होते. काही कविता समजावून द्यायच्या राहिल्या होत्या. आम्ही पाच-सहाजणींनी धाडस करून त्यांना त्याबद्दल विचारले. त्यांनी आम्हाला एक दिवस दुपारी घरी बोलावले. ते बाहेरच्या खोलीत खुर्चीवर बसलेले, साइडच्या टेबलावर रेडिओवर वाद्यसंगीत हळू आवाजात ऐकू येत होते. ते संगीत आमचे शिकणे चालू असतानाही चालू होते; पण आम्हाला त्याचा अडथळा झाला नाही. तो अनुभव मी कधीच विसरणार नाही.

पुढे लग्न होऊन मी डोंबिवलीस आले. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले. मला खूप आनंद झाला, पण तो कसा व्यक्त करू कळे ना. मी त्यांना पत्र लिहिले. त्यांत शिक्षणाच्या काळातील अनुभवलेल्या क्षणांची नोंद केली. त्यानंतर त्यांचे स्वहस्ताक्षरांत लिहिलेले पत्र आले. इतक्या उंचीवर पोहोचलेल्या सरांनी आपली एका सामान्य मुलीची नोंद घेतली! मी भरून पावले. ते पत्र मी अजूनही जपून ठेवले आहे. नंतर कळले की ज्ञानपीठ पुरस्कारानंतर त्यांना शेकडोंनी पत्रे आली, पण त्यांची पोच त्यांनी छापील मजकुराच्या पत्रावर फक्त सही करून दिली. फारच थोडय़ांना त्यांनी स्वत:च्या हाताने लिहिलेली पत्रे पाठविली असतील. त्यामध्ये मी एक होते. शिक्षणाच्या काळात काही विशेष वाटले नाही, पण आज त्यांचे काव्यसंग्रह, नाटके वाचल्यावर आपण केवढय़ा मोठय़ा प्रतिभावंताच्या सहवासात राहिलो याचा आनंद होतो.

आम्हाला नाटकाच्या पेपराबद्दल मार्गदर्शन  करायला प्रा. वसंत कानिटकर येत.  सर वर्गात आले की प्रसन्न वातावरण निर्माण होई. आकर्षक व्यक्तिमत्त्व, उंचपुराबांधा, तारुण्याची कळा, ते अत्यंत नीटनेटक्या पोशाखात असत. कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट, पांढरी पँट, केसांचा भांग चापूनचोपून पाडलेला. शिकवायला उभे राहिले की दोन बोटांच्या चिमटीत गुडघ्याजवळच्या इस्त्रीच्या बरोबर घडीवर पँट वर सरकवत. आज जाणवते इतक्या मोठय़ा नाटककाराकडून शिक्षण घेतले खरोखरच आपण भाग्यवान आहोत. त्यांनी शिक्षणाच्या वळणा वळणावर प्रगतीची वाट दाखविली. त्यांच्यामुळे मी घडत गेले. पुढे पुढे गेले. असे देवदूत जर मला भेटले नसते, तर येथपर्यंत मी पोहोचू शकले नसते. त्यांचे उपकार तर मी फेडू शकत नाही, पण आज मी त्यांच्यापुढे नतमस्त आहे. कृतज्ञ आहे.

प्रतिभा राजूरकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 1:10 am

Web Title: blog 15
टॅग : Blog,Blogger Katta
Next Stories
1 मना घडवी संस्कार!
2 डार्विनच्या भाषेत एचआर!
3 आई
Just Now!
X