News Flash

आठवण

आठवणी या प्रत्येकाच्या मनावर ठसलेल्या असतात.

दुपारचे १२ वाजले होते. मी रेडिओ लावला. ‘अस्मिता’ वाहिनीवर सुंदर गाणी लागली होती. असेच एक गाणे लागले होते. त्या गाण्याचे शब्द होते.. ‘आठवणी दाटतात, धुके जसे पसरावे, जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे!..’

‘आठवण’ किती सोपा शब्द आहे हा, दुसऱ्यानं काढली तर किंमत नसते, पण तीच आठवण स्वत:ला येते तेव्हा त्याचे महत्त्व कळते. आठवणी म्हणजेच ‘स्मृती’! ही अतिथीसारखी लहरी असते, ती केव्हाही मनाच्या दारात येऊन उभी राहू शकते.

खरंच! आठवणी या प्रत्येकाच्या मनावर ठसलेल्या असतात. प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी त्यांच्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीत लिहिले आहे- ‘‘कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसासारख्या असतात, तर कुणी म्हणतात त्या बकुळ फुलासारख्या असतात. आपला सुगंध मागे दरवळत ठेवणाऱ्या असतात. आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायासारख्या असतात! त्या आपला खोलवर ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागे ठेवूनच जातात!’’ वा! किती सुंदर वर्णन केले आहे!

मनुष्याचे जीवन हे आठवणींची शिदोरी घेऊनच आलेले असते. त्यांचे रम्य बालपण, सुंदर तारुण्य तसेच वार्धक्य हे आठवणींनी भरलेले असते, त्या आठवणी कधी गोड तर कधी कडू असतात. पण त्या प्रत्येकाच्या मनावर ठसलेल्या असतात, त्या कधी विसरू शकत नाही. आठवणी या निरनिराळ्या फुलांसारख्या, विविध रंगाच्या अशा असतात.

एखादी महान व्यक्ती मग ती कलाकार असो, नाटककार असो, लेखक असो, नेता, पुढारी किंवा समाजसेवक असो, त्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर आपण त्यांचा स्मृतिदिन साजरा करतो, म्हणजेच त्याने केलेल्या कार्याचा गौरव करतो, त्यांच्या आठवणींना उजाळा देतो.

माणूस केवळ सौख्याचे आणि आनंदाचे क्षण विसरू शकतो, पण दु:खाचे आणि विशेषत: अपमानाचे क्षण तर त्याला प्रयत्न करूनही विसरता येत नाही. ते क्षण आयुष्यभर त्याच्या आठवणीत राहतात. अशा अनुभवांनी माणूस शहाणा होतो व अनेक गोष्टी शिकतो.

एक आठवण अशीच- माझ्या बहिणीच्या घरी चैत्रगौरीचे हळदीकुंकू होते. मी तिच्याकडे जाण्याचीच तयारी करत होते, माझ्या घरापासून ती जवळच राहत होती. मी तयारी करत असतानाच माझे मिस्टर बाहेरून आले व मला म्हणाले, अगं! दादरहून (माझे माहेर)  जोशांचा मुलगा निरोप घेऊन आला आहे. तुझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले आहे. माझ्या बहिणीला पण ती बातमी कळली, हातातली सर्व कामे (तयारी) तशीच ठेवून आम्ही तडक दादरला पोचलो, तेव्हा दारात गर्दी बघून मी लगेच ओळखले की आमचे बाबा आम्हाला सोडून गेले. माझ्या बहिणीला तर ते दृश्य बघून चक्करच आली, कारण माझे (आमचे) वडील आजारी नव्हते; परंतु अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते गेले. तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोर येतो, दरवर्षी चैत्रगौरीचे हळदीकुंकू आले, की आम्हाला आमच्या वडिलांची आठवण येते.

प्रसिद्ध कवी भा. रा. तांबे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’! तसेच आठवणीबरोबरच परमेश्वराने विस्मरणाची देणगीसुद्धा माणसाला दिलेली आहे!
वैशाली देसाई – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:10 am

Web Title: remember
टॅग : Blogger Katta
Next Stories
1 क्षितिज
2 काळ आला होता, पण..!
3 मामा आणि त्याचं गाव
Just Now!
X