News Flash

गा विहगांनो माझ्या संगे…

चिमणपाखरा, तुझ्या चोचीतला रिंगटोन किती मस्त आहे!

शक्करखोरा अगदी गॅलरीतच आला. अरे मित्रा. मला कळलंय की, ऋतू वसंत आला! ‘वसंत वसंत जगाला पसंत’ म्हणत गिरक्या घेणाऱ्या संगीतिकेतल्या बालमैत्रिणीसुद्धा मला आठवल्या. चिमणपाखरा, तुझ्या चोचीतला रिंगटोन किती मस्त आहे! आम्ही फोनवाले उगाच स्वत:ला स्मार्ट समजतो. तुम्ही पक्षी आमच्यापेक्षा सवाई गवाई आहात. फुलपाखराला आवाज नाही. पण त्याच्या पंखांवरची ओली सुंदरता बोलकी आहे. हा वसंतवेडा दयाळ मला कुठं बोलावतो आहे? चंदनी सुगंधाच्या नंदनवनात? आणि मग कामावर कोण जाणार रे? बुट्टी मारू? असं होत नाही राजा! अरे, आम्ही जगायला निघालेली पोटभरू माणसं! अगदी भाडेकरू म्हणून राहतानासुद्धा आम्ही पोटभाडेकरूच होतो रे बावा!

श्वसनातून शुद्ध हवेचं आश्वासन देणाऱ्या या हिरव्या, पोपटी, शेवाळी हजारो वनस्पती टवटवीत झाल्यात. चैत्रपालवी हे त्यांचं तारुण्यच आहे. वेगळाच मादक सुवासही त्यांच्यापाशी आहेच. अशा वेळी ‘गा विहगांनो माझ्या संगे’ म्हणत आमच्यासारखे दगडही किंचित पाडगांवकर होऊ शकतात. पण आयुष्य तेवढाही वेळ देत नाही.

वसंत हा खरं तर असा मोसम आहे की, म्हातारी बायसुद्धा मानेत ‘स्प्रिंग’ बसवलेल्या बहुलीगत हळू डुलू लागेल. तेव्हा पोटापाण्यासाठी पायवाटेने जाताना मीही तृणसंगीत ऐकतच जाईन. वारा आणि झराही माझ्या वाद्यवृंदात सहभागी आहे. हा वारोबा तर कधीही ‘स्टाफ आर्टिस्ट’ झाला नाही. पटावर आला नाही. मुक्तच राहिला हा कलंदर कलाकार! समुद्राची गाज काही दापोलीतून ऐकू येत नाही. लालित्यासाठी मी थापा मारत नसतो.

पक्षी मात्र माझ्या आसपास हमखास असतात. दोन चॉकलेट हिरोंमध्ये असावी तशी ऐटबाज स्पर्धा लालबुडय़ा आणि शिपाई बुलबुलामध्ये आहे. कोतवालाचा सौंदर्याशी काही संबंध नाही, पण एखाद्या पांढऱ्या धोप बगळीला हा परजातीतला जेट ब्लॅक मर्द आवडला तर त्यालाही इलाज नाही. हंगामा करावा असाच हा हंगाम आहे. फाल्गुन कधी अंगावर येईल सांगता येत नाही. आप्तपक्ष्याला ‘कांचन’ नाव कुणी ठेवलं? नर आहे तो. उगाच ‘आयडेंटिटी’चा घोळ व्हायचा. जंगलाची माहिती नसलेली कवयित्री ‘कोकिळाताई कुहुकुहु गाई’ वगैरे म्हणते त्यातला प्रकार. कोकिळाताई गात नाही. कोकीळभाई गातो!

‘श्याम’ पक्षी तसा लाजरा ‘शायर’ आहे. समोर येऊन धीटपणे नीट गाणार नाही. त्याला शोधत मीच कधी कधी सारंगच्या किंवा कोळबांद्रेच्या वनाकडे जातो. आणखी एक भीती वाटते. मी एखाद्या नाजूक पक्ष्याला मीच बांधलेली एखादी नवी चाल शिकवत असताना, एखादा शिकारी ससाणा ‘चाल’ करून आला तर? दहशत हल्ली कुठंही, कधीही खासगीपणाच्या सुशांत एकांतावर आक्रमण करते.

मध्यरात्रीनंतर रातराणी दरवळते आणि आपण आपलं स्वप्न कुरवाळतो, तेव्हाही ‘रातवा’ नावाचा मुठीत मावणारा पक्षी गाणं म्हणत जातो. दिवाणा आहे काय तो? दिवसभर हा रात्रिंचर त्या ट्रान्सजेंडर वटवाघळाच्या महागुंफेत राहतो आणि रात्रभर मात्र रहस्यमय संचार करतो. विश्वाचं गूढ पक्षी जणू जाणून आहेत. मात्र, माणसाला ते सांगणार नाहीत. आपली तशी पारदर्शक प्रामाणिक कुवतच नाही. पक्ष्यांचा आपल्यावर विश्वास नाही. हा विश्वास मला मिळवायचाय! मला सर्व पक्ष्यांची भाषा शिकायचीय!

चिमणीसुद्धा किती इमानदार आहे! सरळ सांगते ‘मला नाही बाई गाणं जमायचं. ‘स्पोकन वर्ड’ द्या. तेवढा ब्रॉडकास्ट करीन मी.’

नटवी टिटवी हा तर कळसच आहे. किती अहंकार! स्वत:च्या रंगरूपाचा, नावाचा किती गर्व! मीडिया हिला रोज प्रमोशन देतो काय?

फार उंचावरून स्थलांतर करणाऱ्या हंसांचं गाणं मला कधीच ऐकता आलं नाही. गरिबीमुळे मी कधी विमानात बसू शकलो नाही. त्यातलीच गत.

निखार पक्षी तर रंगपंचमी खेळून आल्यासारखाच वाटतो. ‘जाऊन आंघोळ कर आता. पुरे झाला खेळ असं आपल्या लेकराला म्हणावं, तसं त्या पाखराला म्हणावंसं वाटतं.

सगळे गाणं म्हणतील. जरा आढेवेढे घेतील, पण ते नखरे असतात. नंतर गाण्याच्या भेंडय़ा पक्षी खेळत आहेत असं वाटतं.पण पिंजऱ्यातला बापुडवाणा लव्हबर्ड मात्र गात नाही. त्याच्याबरोबरचा त्याचा पार्टनर पिंजऱ्याबाहेर सटकला आणि कापसाचा बोळा रक्तात भिजावा, तसा कावळ्यांकडून फाडला, पिसडला गेला. अशा दहशतीच्या ‘व्यवस्थेत’ मी आणि माझ्या सहकारी पक्ष्यांनी जीवनगाणं गायचं का? पण कुणासाठी? आमचं ऐकतंय का कुणी?…रसिकहो, तुम्ही तरी?
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:12 am

Web Title: spring season and birds
टॅग : Birds,Blogger Katta
Next Stories
1 स्वत्वाची जाणीव
2 आठवण
3 क्षितिज
Just Now!
X