– डॉ. नीरज देव

राहुल गांधी यांच्या सावरकरांसंदर्भातील वक्तव्यानंतर देशभर पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचे देशासाठी योगदान आणि एकूणच क्रांतीकारकांमध्ये विचारधारेवरुन निर्माण करण्यात येणारी फूट अधिक गडद करण्याचा प्रयत्न होतोय. खासकरुन सावरकर आणि माफी हा विषय समोर येतो तेव्हा भगत सिंहांशी त्यांची तुलना केली जाते. शिवाय भगत सिंह हे कम्युनिस्ट विचारधारेचे होते, असं सांगत सावरकर आणि अन्य क्रांतीकारींपासून त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न होतो. परंतु, प्रत्यक्षात भगत सिंहांनी देखील सावरकरांकडूनच देशभक्तीची प्रेरणा घेतली होती, भगत सिंह हे देखील सावरकर भक्तच होते, अशी मांडणी करणारा हा विशेष लेख….

What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
veer savarkar poem memory
वीर सावरकरांची ‘सागरा प्राण तळमळला’ कविता, लता मंगेशकरांनी सांगितलेली आठवण आणि शंकर वैद्यांनी उलगडलेला अर्थ
lokrang article, book review, Noaakhali manuskicha avirat ladha, novel, mahatma gandhi, last days, Ramesh Oza And Shyam Pakhare,
माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट

सावरकरांचे विरोधक भगत सिंहांच्या हौतात्म्याआडून सावरकरांना वारंवार माफीवीर म्हणत सावरकरांचा तेजोभंग करीत असतात. सावरकर व भगत सिंह परस्पर विरोधी असल्याचे दाखविण्याचा त्यांचा उद्देश असतो. वस्तुस्थिती याहून उलट आहे. हुतात्मा भगत सिंह गांधी, गांधीवाद व काँग्रेसच्या विचारांपासून कैक योजने दूर असून वीर सावरकरांचे व्यक्तीत्व, कार्य व विचार या तीनही बाबींनी प्रभावित होते. इतकेच नव्हे तर ते सावरकरांच्या शिष्य परंपरेतील होते.

सशस्त्र क्रांतिकारकांचा मंत्रदृष्टा ऋषि

सावरकर जन्मजात क्रांतिकारक होते. चापेकरांच्या हौतात्म्यातून त्यांचे क्रांतिकार्य जन्मलेले होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतिशिवाय पर्याय नाही, असे इतिहासाच्या अध्ययनातून त्यांना उमगले होते. त्यासाठी त्यांनी मित्रमेळा व अभिनव भारताची स्थापना केली होती. जोसेफ मॅझिनी व १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे दोन ग्रंथ लिहून भारतीय क्रांतिकार्याला तत्वज्ञानाची पक्की बैठक मिळवून दिली होती. या ग्रंथाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला हजारो लढवय्ये देशभक्त पुरविले अशी बाळशास्त्री हरदासांची साक्ष आहे. सशस्त्र क्रांतिकार्य भारतभर पोहोचविण्यासाठी लंडनला जावे, तेथे शिकायला आलेले भारताच्या विविध प्रांतातील हुशार तरुण सहजपणे सापडतील, त्यांना क्रांतिकार्यात ओढले तर भारतभर क्रांतिकार्य पोहोचेल असा विचार करत सावरकर लंडनला पोहोचले. १९०६ ला लंडनमध्ये त्यांचे आगमन होताच त्यांच्या व्यक्तीत्वाने नि विचाराने भारुन लाला हरदयाळ, मदनलाल धिंग्रा, व्ही व्ही एस अय्यर, भाई परमानंद, वीरेंद्रनाथ चटोपाध्याय इ सारखे एकाहून एक सरस तरुण सशस्त्र क्रांतिकार्यात ओढले गेले. याविषयी साक्ष देताना लंडनमधील सावरकरांचे सहकारी एम पी टी आचार्य लिहितात, His personal charm was such that a mere shake hand could convert to his views such obstinate men as V V S iyar and Har Dayal – not only convert but even fringe out the best out of them (मराठा २७-०५-१९३८) सावरकरांसोबत हस्तांदोलन करताच अय्यर, हरदयाळांसारखे प्रज्ञावान तरुण सशस्त्र क्रांतिकारक बनले हा त्या घटनचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या आचार्यांचा निर्वाळा सावरकरांच्या जादुई प्रभावाची जाणीव करुन देतो.

सावरकरांच्या दिव्य प्रभावळीतून बाहेर पडलेले हे तरुण विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले  स्वतःसोबत त्यांनी सावरकरांचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला. या तरुणातील दोघे, हरदयाळ व परमानंद अमेरिका – कॅनडात पोहचले. तेथे बाबा सोहन सिंह भकना व त्यांचे सहकारी विदेशातील भारतीय युवकांना व्यासपीठ हवे म्हणून मोठे संघटन उभे करीत होते. मात्र त्याला पाहिजे तशी गती व दिशा मिळत नव्हती ती मिळावी, यासाठी त्यांनी लाला हरदयाळांना आमंत्रित केले. लाला हरदयाळांनी तेथील युवकांत देशभक्तीचे चैतन्य भरले व त्यांना क्रांतिकार्याची प्रेरणा दिली. हरदयाळांनी बाबा सोहन सिंह भकना इ सोबत गदर आंदोलनाला जन्म दिला. गदरच्या मुखपत्रातून सशस्त्र क्रांतिकार्याकडे युवकांना आकर्षित करण्यासाठी लाला हरदयाळांनी सावरकर चरित्र तसेच विष्णु गणेश पिंगळेंच्या सूचनेनुसार सावरकरांचे ज्वलजहाल १८५७ चे स्वातंत्र्यसमर छापत हजारों नवयुवकांना देशस्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्यात ओढून घेतले. येथे एक बाब नमूद करणे गरजेची वाटते कि पुढे बाबा सोहन सिंह भकना डाव्या चळवळीत ओढले गेले व त्यांनी लाला हरदयाळांचे गदर मधील योगदानच नाकारले. याविषयी आपली नापसंती व्यक्त करताना गदरचे अगदी स्थापनेपासूनचे एक नेते व सोहन सिंहांचे सहकारी बाबा पृथ्वी सिंह आझाद आपल्या आत्मकथेत लिहितात, “कोणीही सुशिक्षित भारतीय, विशेषतः पंजाबी माणूस, लालाजींच्या तेजस्वी जीवनाने एकेकाळी अतिशय प्रभावित झाला होता. लोकांच्या मनातून लालाजींचे स्थान पुसून टाकण्याचं त्याचं हे कृत्य त्यांच्या हीन मनोवृत्तीचंच निदर्शक आहे. भारताच्या या सुविख्यात महापुरुषावर चिखलफेक करणं, हा नीचपणा आहे.  बाबा सोहन सिंह भकना यांनीही आपल्या लेखातून, भाषणातून व चर्चांमधून लाला हरदयाळ यांचा अवमान करण्याचाच प्रयत्न केला आहे. बाबा सोहन सिंह यांचं व्यक्तीत्व ऋषितुल्य आहे म्हणूनच त्यांच्यासारख्यांना कुणाचा असा द्वेष करणे शोभून दिसत नाही” (क्रांतिमार्गावरील प्रवासी पृ ६३). डाव्या विचारसरणीकडे ओढले गेलेले हे गदरी विचारवंत प्रत्यक्ष सहवास व मार्गदर्शन लाभलेल्या लाला हरदयाळांचे श्रेय मूळातून नाकारत असतील तर ते त्याच द्वेषभावनेतून गदर आंदोलनाच्या मुळाशी असलेली सावरकर प्रेरणा नाकारीत असतील तर यात फारसे आश्चर्य मानण्याजोगे काही नाही. लाला हरदयाळांच्या याच प्रभावात कर्तार सिंह सराभा हा १६ वर्षीय नवयुवक आला, जो पुढे गदरच्या मुख्य नेत्यात गणला गेला. कर्तार सिंहचे त्यावेळचे एक साथीदार बाबा पृथ्वी सिंह आझाद यांनीच ही साक्ष दिलेली आहे हे विसरता कामा नये.

हुतात्मा कर्तार सिंह सराभा भगतसिंहांचे गुरु

पहिल्या विश्वयुद्धाचा फायदा उठवून भारतात सशस्त्र क्रांति करण्याच्या इराद्याने कर्तार सिंह सराभा भारतात पोहोचले. भारतात उठावणीसाठी एखादा कुशल नेता हवा म्हणून ते भाई परमानंदांसोबत शोध घ्यायला निघाले. तेंव्हा त्यांच्यासमोर रासबिहारी बोस यांचे नांव आले. रासबिहारींचे सहकारी विष्णु गणेश पिंगळे नंतर कर्तार सिंहांचे महत्वाचे साथीदार बनले. स्वतः रासबिहारी स्वा सावरकरांच्या प्रभावाखाली होते. त्यांनी जपानी भाषेत सावरकरांवर चरित्रात्मक लेख लिहिले होते. साप्ताहिक फ्री हिंदुस्तान २७ जानेवारी १९४६ च्या अंकात वर्णित एका वार्तेनुसार टोकीयो आकाशवाणीवरुन बोलताना रासबिहारी सावरकरांना उद्देशून म्हणाले होते, सावरकरजी, आकाशवाणीवरुन तुम्हाला अभिवादन करण्यात मला माझ्या एका ज्येष्ठ सहकाऱ्याचा सन्मान केल्याचा आनंद लाभत आहे.  तुम्हाला वंदन म्हणजे प्रत्यक्ष त्यागमुर्तीलाच वंदन करणे होय. तुमचा सिद्धांतच स्वातंत्र्यसिद्धीचा मार्ग आहे खरे आहे.

हे सर्व इतक्या विस्ताराने देण्याचे कारण म्हणजे कर्तार सिंह सराभांनी ज्यांच्या उदबोधनातून प्रेरणा घेतली ते लाला हरदयाळ सावरकरांचे शिष्य, ज्यांच्या सोबत कर्तार सिंह पंजाबात उठावणी करण्यासाठी फिरत होते, ते भाई परमानंद सावरकरांकडून प्रतिज्ञाबद्ध झालेले, ज्यांच्या नेतृत्वात कर्तार सिंह काम करु इच्छित होते ते रासबिहारी बोस सावरकरांच्या पूर्ण प्रभावात आणि ज्यांच्या सोबत ते फासावर चढले ते विष्णु गणेश पिंगळे सावरकरांच्याच प्रभावात, असा चोहो बाजूंनी सावरकर प्रभाव असताना शिवाय गदर पत्रातून १८५७ चे स्वातंत्र्य समर या सावरकरांच्या प्रस्फोटक ग्रंथाचे ज्याने अवगाहन केलेले आहे, असे कर्तार सिंह सावरकर प्रभावातून मुक्त असण्याची संभावना फार कमी आहे. पण अतिशय लहान वयात फासावर चढल्याने व सशस्त्र क्रांतिकार्यात बाळगल्या जाणाऱ्या गुप्ततेमुळे कर्तार सिंह सराभा त्यांचा सावरकरांसोबतचा अनुबंध कदाचित् व्यक्त करु शकले नसावेत. कर्तार सिंह सराभाच्या बलिदानाने सरदार भगत सिंह अतिशय प्रभावित होते. भगत सिंहांच्या संपूर्ण दस्ताऐवजाचे संपादक लिहितात, शहीद कर्तार सिंहांचे चित्र भगत सिंह सदैव जवळ बाळगत ते म्हणत, हा माझा गुरु, बंधु व सखा आहे (भगत सिंह संपूर्ण दस्तावेज पृ १३८). आता नीट बघा, वीर सावरकर ते हरदयाळ, परमानंद ते कर्तार सिंह सराभा ते भगत सिंह ही परंपरा स्पष्टपणे दिसू लागली. पण ती एवढीच मर्यादित नव्हती तिला आणखीही बाजू होत्या.

भगत सिंहांचे सहकारी सावरकरांच्या प्रभावात

महाराष्ट्रात जन्मलेले हुतात्मा राजगुरु लहानपणापासून सावरकरांच्या गोष्टी ऐकत आलेले होते. त्यांनी सशस्त्र क्रांतिकार्याची दीक्षा बाबाराव सावरकरांकडून घेतली होती. (राजगुरु द इन्विसिबल रिव्होल्युशनरी – पृ ९४) बाबाराव सावरकर व चंद्रशेखर आझादांचे संबंध सर्वविदितच आहेत. बलिदान होण्याच्या दोन दिवस आधी आझाद बाबारावांना भेटल्याचा उल्लेख बाबारावांचे चरित्रकार गोखले करतात (पृ १०८). भगत सिंहांचे आणखी एक सहकारी यशपाल सावरकर बंधुंविषयी नितांत आदर व श्रद्धा असल्याचे लिहितात व कोणाही महापुरुषाला भेटल्यावर त्याच्या पायाला हात लावून वंदन करायची इच्छा मला होत नाही, अगदी गांधीजींना भेटल्यावर ही झाली नाही, ती बाबाराव सावरकरांना पाहून झाली असे वर्णन करतात (सिंहावलोकन ११०) भगत सिंहांचे सहकारी भगवतीचरण व्होरा व दुर्गा भाभी यांचे ही सावरकर बंधुंशी संबंध असल्याचे अनेक दाखले मिळतात. याचाच अर्थ भगत सिंह आपल्या प्रेरणास्त्रोतांकडून व सहकाऱ्यांकडून दुतर्फा सावरकरांशी जुळलेले होते.

भगत सिंह सावरकरांच्या प्रभावात

भगत सिंहांचे डाव्या विचारसरणीचे चरित्रकार भगत सिंहांना लेनिनच्या छायेत उभे करीत सावरकरांची परंपरा साफ नाकारत असतात. भगत सिंहांच्या संपूर्ण साहित्याचे निरीक्षण केले असता ध्यानात येते कि त्यांनी ‘लाईफ ऑफ बॅरिस्टर सावरकर’ हे चित्रगुप्त (सावरकरांनी त्यावेळी घेतलेले छुपे नाव) लिखित सावरकर चरित्र वाचले होते व त्यामुळे ते प्रभावित होते. (भगत सिंह दस्तावेज पृ। १७१) सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्यसमर, हिंदुपदपाद शाही त्यांनी वाचली होती. इतकेच नव्हे तर सावरकरांच्या श्रद्धानंदचे ही ते वाचक होते. कल्पना करा, एम पी टी आचार्य म्हणतात तसे केवळ सावरकरांशी हस्तांदोलन करताच लाला हरदयाळ, अय्यर, सेनापति बापट इ सारखे धुरंधर सावरकरांचे अनुयायी होत असतील तर सावरकरांचे साहित्य वाचणारा, त्यांच्या सहकारी व अनुयायांपासून प्रेरणा प्राप्त करणारा भगत सिंहांसारखा संवेदनशील तरुण सावरकर प्रभावापासून मुक्त कसा राहणार?

सावरकरी परंपरेचे वाहक बनले भगत सिंह

एखाद्या व्यक्तीने एखाद्याचे साहित्य वाचलेले असणे याचा अर्थ कदापि असा होत नाही कि त्यातील बाबी तुम्हाला मान्यच आहेत. मात्र वाहक वा प्रचारक असण्याचा अर्थ त्या बाबी तुम्हाला मान्य आहेत असाच होत असतो. सरदार भगत सिंह सावरकर साहित्याचे केवळ वाचकच नव्हते तर प्रचारक पण होते. त्याकाळी दुर्मिळ असलेल्या सावरकरांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या प्रस्फोटक ग्रंथाचे प्रकाशन त्यांनी केले होते. श्रद्धानंदमधील सावरकरांचा ‘अत्याचार शब्दाचा अर्थ ( गांधी गोंधळ पृ ३८) हा लेख भगत सिंहांनी ‘आतंक के असली अर्थ’ या नावाने मे १९२८ मध्ये भाषांतरीत करुन छापला होता (भगत सिंह दस्तावेज पृ २४३) ज्याप्रमाणे श्रद्धानंदातून सावरकरांनी क्रांतिकारकांची ओळख करुन दिली तशीच किरती मधून भगत सिंहांनी करुन दिली होती. आणखी एक बाब म्हणजे प्रसिद्ध क्रांतिकारक शचींद्रनाथ सांन्यालाच्या आईच्या निधनानंतर त्यांच्यावर ‘वीरमाता क्षीरोदवासिनी देवी’ या शीर्षकाचा लेख सावरकरांनी मे १९२८ मध्ये लिहिला त्यानंतर भगत सिंहांनी सप्टेंबर १९२८ मध्ये त्यांच्यावर ‘युगांतकारी माँ’ हा लेख लिहिला, हे अनुकरण नव्हते तर एका समान परंपरेचे वाहक असणे होते, पाईक असणे होते.

सावरकर भक्त भगत सिंह

भगत सिंहांच्या दस्तावेजाचे परिशीलन केले असता, भगत सिंहांनी गांधी, काँग्रेस, सुभाषचंद्र, नेहरु व ज्यांच्या अवमाननेसाठी त्यांनी सांडर्सला मारले त्या लाला लजपत राय यांच्यावरही या ना त्या निमित्ताने टिका केलेली आढळते. तशी टिका ते तथाकथित क्षमापत्रे धाडणाऱ्या, जातीयवादी सावरकरांवर करताना आढळत नाहीत. उलट वारंवार सावरकरांची प्रशंसाच करताना सापडतात.  सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्यसमर वाचताना भगत सिंहांची अवस्था कशी झाली होती, याचे वर्णन करताना भगत सिंहांचे सहकारी राजाराम शास्त्री लिहितात, “वीर सावरकर द्वारा लिखित ‘१८५७ का स्वातंत्र्य समर’ पुस्तक ने भगतसिंह को बहुत अधिक प्रभावित किया था । यह पुस्तक भारत सरकार द्वारा जब्त कर ली गई थी । मैने इस पुस्तक की बहुत प्रशंसा सुनी थी और इसे पढने का बहुत ही इच्छुक था । पता नहीं कहाँ से भगत सिंह को यह पुस्तक प्राप्त हो गई थी । वह एक दिन इसे मेरे पास ले आये । जिससे ली होगी उसे जल्द वापस करनी होगी, इसलिए वह मुझे बहुत कहनेपर देने को तैय्यार नहीं हो रहें थे । पर जब मैंने जल्द से जल्द पढकर उसे अवश्य लौटा देने का पक्का वायदा किया, तब उन्होंने वह मुझे केवल ३६ घंटे के लिए पढने को दी । उसको मैं कभी नहीं भुला सकता । मैंने एक वक्त खाना नही खाया और रात दिन उसे पढता ही रहा । पुस्तक ने मुझे बहुत ज्यादा प्रभावित किया. भगत सिंह के आने पर मैंने पुस्तक की बहुत प्रशंसा की” (अमर शहिदों के संस्मरण पृ. ८९,९०)

पुढे राजाराम शास्त्री भगत सिंहांनी स्वातंत्र्यसमर कसे छापले याचे वर्णन करतात. दुर्दैवाने भगत सिंहांनी प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्यसमरावरील भूमिका उपलब्ध नसली तरी त्यांना सावरकरांच्या या ग्रंथाविषयी काय म्हणायचे होते ते त्यांच्या १० मई का शुभ दिन या लेखात सापडते ते लिहितात, “जहा तक हमें पता हैं, इस आजादी की जंग का एकमात्र स्वतंत्र इतिहास लिखा गया, जो कि बैरिस्टर सावरकर ने लिखा था और जिसका नाम १८५७ की आजादी की जंग का इतिहास (The history of Indian War of Independence १९५७) था” (भगत सिंह दस्तावेज १७२) अशा प्रकारची प्रशस्ति देत सावरकरांनी १८५७ चा अर्ध शताब्दी महोत्सव लंडनमध्ये कसा साजरा केला त्याचे वर्णन भगत सिंह करतात. ‘श्री मदनलाल धिंग्रा’ या लेखात मदनलाल कसे स्वच्छंदी, ऐश आरामीच्या जीवनाला त्यागून देशभक्त बनले इ माहिती देत सावरकरांनी मदनलालच्या घेतलेल्या परीक्षेचे वर्णन करीत भगत सिंह भावविभोर होऊन लिहितात,  “हम दुनियादार क्या जानें, मौत के विचार तक से डरनेवाले हम कायर लोग क्या जाने कि देश की खातिर कौम के लिए प्राण दे देने वाले वें लोग कितने ऊंचे, कितने पवित्र और कितने पूजनीय होते हैं ” (भगत सिंह दस्तावेज पृ १६७)येथे भगत सिंह स्वतःला ‘दुनियादार’, ‘मौत से डरनेवाले’, ‘कायर’ म्हणवतात तर सावरकरांना धिंग्रांना पवित्र व पूज्य म्हणतात, हे भगत सिंहांचा दाखला देत सावरकरांना कायर म्हणणाऱ्यांनी विसरु नये. याच लेखात मदनलालच्या निषेध सभेत सावरकरांच्या वर्तनाने प्रभावित होऊन ते सावरकरांना ‘वीर’ संबोधतात, “बडे बडे प्रस्ताव पास हुए सब उनकी निंदा में, पर उस समय भी एक सावरकर वीर थे, जिन्होंने खुल्लम खुल्ला उनका (मदनलाल का) पक्ष लिया” (भगत सिंह दस्तावेज पृ १६७). सावरकरांवर पामर ने केलेला हल्ला व त्यावेळचे सावरकरांचे धीरोदात्त, निश्चल वर्तन भगत सिंहाच्या मनःपटलावर अमिट छाप पाडून जाते हे त्यांच्या लिखाणात स्पष्टपणे दिसते. ‘विश्वप्रेम’ या लेखात भगत सिंह सावरकरांचे नितांत आदराने वर्णन करतात, “विश्वप्रेमी वह वीर है जिसे भीषण विप्लववादी, कट्टर अराजकतावादी कहने में हम लोग तनिक भी लज्जा नही समझतें – वही वीर सावरकर, विश्वप्रेम की तरंग में आकर घास पर चलते चलते रुक जाते कि कोमल घास पैरों तले मसली जायेगी” (मतवाला १५ व २२ नवम्बर १९२४ भगत सिंह दस्तावेज ९३). वीर सावरकरांचे एवढे सटीक वर्णन सशस्त्र क्रांतिकारकांपैकी लंडनमध्ये सावरकरांसोबत असलेल्या निरंजन पालांच्या व्यतिरीक्त भगत सिंहांनीच केलेले दिसते. वामनराव चव्हाण आपल्या आठवणीत असे सांगतात, कि शनिवार १२ फेब्रु १९२८ रोजी महाशिवरात्रीच्या आदल्या रात्री भगत सिंह व राजगुरु वीर सावरकरांना भेटून गेले होते (रत्नागिरी पर्व बाळाराव सावरकर पृ १९०) पण या भेटीविषयी वीर सावरकर व भगत सिंह दोघेही मौन असले तरी वामनरावांच्या सांगण्यात तथ्य वाटते. भेट घडलेली असो वा नसो पण सशस्त्र क्रांतिकारक सावरकरांच्या मानवतावादी विचारांचा व संवेदनशील भावनांचा परिचय भगत सिंहांना होता याचाच प्रत्यय भगत सिंहांच्या वरील छेदकावरुन येतो.

सावरकर साहित्यात भगत सिंह

समग्र सावरकर साहित्यात भगत सिंहांचा उल्लेख चार वेळा येतो. सावरकरांना भगत सिंहाविषयी केवळ सन्मानच नाही तर ममत्व वाटत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भगत सिंहांच्या हौतात्म्यानंतर सावरकरांनी केलेली कविता. या कवितेत सावरकर गातात,

जा हुतात्म्यांनो, अहा !

साक्ष ठेवुनि शपथ घेतो आम्हि उरलो ते पहा !

शस्त्रसंगर चंड हाझुंजवुनि कीं,

जिंकुची स्वातंत्र्यविजयासी पहा !

(स सा वा खंड ७ पृ १३९)

भगत सिंहांदिंच्या हौतात्म्यावर सावरकर मौन होते, अशी ओरड करणाऱ्यांसाठी ही कविता एक सज्जड चपराक आहे. सावरकरांची काव्य प्रतिभा जागृत व्हावी, इतकी त्यांना भगत सिंहांच्या हौतात्म्याची घटना महत्वाची वाटली. येथे लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारची कविता सावरकरांनी मदनलाल, कान्हेरे, कर्वे व देशपांडे इ त्यांना अगदी जवळच्या असणाऱ्या हुतात्म्यांवर देखील केली नव्हती. अशी कविता त्यांनी याआधी केवळ चापेकरांवरच केली होती. त्या कवितेतील अन् या कवितेतील हुतात्म्यांना आश्वस्त करणारा व आपले दायित्व आपण विसरत नसल्याचा भाव ताडून पहाता सावरकरांच्या हृदयातील भगत सिंहांचे स्थान अधिकच अधोरेखित होते.

येथे मुद्दाम नमुद करण्यासारखी एक घटना म्हणजे, भगतसिंहांना फाशीची शिक्षा देण्यात आल्याचे सावरकरांना वरवंडे गावी एका शाळेच्या कार्यक्रमा दरम्यान कळाले. ते वृत्त ऐकताच वीर सावरकरांच्या चर्येवर विलक्षण दुःखाची छाया पसरली. वीर सावरकरांचे डोळे अश्रूंनी डबडबले, अशी साक्ष त्याठिकाणी उपस्थित स दी पाटील देतात ( सावरकर यांच्या आठवणी पृ ४८)थोडक्यात निपक्षपातीपणे पाहता, आपल्याला असे म्हणता येते कि वीर सावरकर व हुतात्मा भगत सिंह हे परस्पर विरोधी व्यक्तीत्व नसून भगत सिंह सावरकरांच्या परंपरेचे वाहक होते आणि सावरकरांना आपल्या या वारसावर सार्थ अभिमान होता.

(लेखक हे प्रख्यात मनोचिकित्सक असून दशग्रंथी सावरकर या पीएचडी समतुल्य सन्मानपत्राने सन्मानीत आहेत)