– डॉ नीरज देव

आज परशुरामांची जयंती, परशुराम भगवान विष्णुंच्या दशावतारातील सहावे अवतार होत. ब्राह्मण समाजाने परशुरामांना ब्राह्मण जातीचे प्रतीक म्हणून उचलले. मला वाटते ती एक प्रकारची चूकच आहे. असे वाटण्यामागे काही कारणे आहेत.

जातीपातीचे लोण ईशावतारापावेतो पोहोचणार

आपण नेहमी पाहतो कि, वेगवेगळ्या जाती त्या त्या जातीत जन्मलेल्या थोर पुरुषांना आपल्या जातीचे प्रतीक म्हणून उचलतात. उदा. रामायणकार वाल्मिकी कोळी समाजाचे, संत गाडगेबाबा परीट समाजाचे तर सेना न्हावी केशकर्तनकार समाजाचे प्रतीक होत. याप्रमाणे आम्ही थोर पुरुषांची वाटणी जातीजातीत करुन मोकळे होतो. ही बाब साफ चुकीचीच आहे. पण या सर्वांवर कडी करत ब्राह्मण समाजाने विष्णु अवतार परशुरामांना ब्राह्मण समाजाचे प्रतीक म्हणून निवडून जातीपातीचे लोण एकप्रकारे थेट दशावतारापर्यंत पोहोचविले.

विष्णू अवतार श्रीराम, श्रीकृष्णाची जाती कोणी विचारते का? विचारु पण नये. मग जातीचा हा शिक्का भार्गवरामावरच मारणे कितपत उचित ठरणारे आहे? भगवान विष्णु अवतारापर्यंत जातीपातीचे धागेदोरे नेणे योग्य आहे का? ज्या दशावतारात जातीपाती तर दूरच राहिल्या पण मत्स्य, कूर्म, वराहादि मानवेतर प्राण्यातील अवतार येतात त्या दशावतारांवर हा कुठाराघात नाही का? यावर सुज्ञांनी विचार करावा असे मला वाटते.

परशुरामाचे वर्ण संक्रमणः

अग्रतः चतुरो वेद; पृष्ठेतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादऽपि शरादऽपि ।।

अशी गर्जना करणारे भार्गवराम एकाच वेळी ब्रह्मविद्या जाणणारे वेदविद् ब्राह्मण होते अन् त्याच वेळी शस्त्रविद्येत अग्रणी क्षत्रियसुद्धा होते. एकाच वेळी दोन वर्णांना त्यांनी धारण केले होते. अधिकच स्पष्ट सांगायचे तर परशुरामाचा अवतार अनीतिवान राजांच्या संहारासाठीच होता, त्यांना पृथ्वी निःक्षत्रिय करणारे म्हणून पाहिले जाते ते योग्य वाटत नाही कारण त्यांच्या सोबत युद्धावर असणारे अवंतिकेचे यादव, कनौजचे गांधीवंशीय, सम्राट सुदास सूर्यवंशी, गांधारचा मांधाता, गांगेयचा काशिराज इ. राजे क्षत्रियच होते. परशुरामांनी शस्त्र धारण करुन पराक्रम गाजविला याचाच अर्थ त्यांनी ब्राह्मण वर्णाकडून क्षत्रिय वर्णाकडे संक्रमण केलेले होते.

चातुवर्ण्य प्रमाण मानल्या जाणा-या त्याकाळी चार वर्णातील दोन वर्ण एकाच वेळी धारण करणे हा मानवी विकासाचा टप्पाच मानला जावा. पण आजच्या चार वर्णाच्या चार हजार जाती झालेल्या काळात सर्व वर्ण जातींचा स्वीकार हा मानवी विकासाचा उत्तम टप्पा ठरु शकतो. तो टप्पा गाठण्याचा प्रयास करणे हेच परशुरामाचे खरे पूजन ठरेल.

परशुराम अखिल हिंदू जातीचे प्रतीकः

परशुरामाला ब्राह्मण जातीचे प्रतीक बनविण्याने होणारे नुकसान अधिकच आहे. श्रीराम, श्रीकृष्णाप्रमाणे ते ही या हिंदू जातीचे आराध्य आहेत. पण केवळ ब्राह्मण जातीचे प्रतीक म्हणून परशुरामांना पुढे आणण्यामुळे कळत नकळत जातीपातीनिष्ठ हिंदूतील इतर समाज त्यांच्यापासून दूर जाणार आहे. त्यामुळे परशुरामाचे प्रतीक हे तथाकथित ब्राह्मण समाजाकरिता भूषणावह वाटणारे असले तरी आधीच जातीजातीत विभागलेल्या हिंदू समाजाकरता नक्कीच घातक ठरणारे ठरेल असे मला वाटते.

(लेखक मनोचिकित्सा तज्ज्ञ आहेत)