12 July 2020

News Flash

महात्मा गांधींचं ‘हिंद स्वराज’ : दोन पुठ्ठ्यांच्या आतलं वाचणार केंव्हा ?

प्रश्न हा आहे कि, ही पुस्तिका बुद्धीचा चष्मा लावून खरंच कोणी वाचतं का? अन् वाचल्यावर त्यातील मजकूर पटतो का?

– डॉ. नीरज देव

महात्मा गांधी म्हणजे गेल्या शतकातील सर्वात प्रभावी व्यक्तित्व होय. दिडशे वर्षानंतरही महात्माजींचे आकर्षण अजून सुद्धा जनमानसात आहे. त्यांच्या विचारांना समजून घेण्याची गुरुकिल्ली म्हणून ओळखल्या जाणा-या ‘हिंद स्वराज’ या पुस्तिकेलाही सुमारे ११२ वर्षे होत आलीत. गांधीवादी अभ्यासकांना आजही ती मोलाची वाटते. २००९ साली त्या पुस्तिकेची शताब्दी मोठ्या धूमधडाक्यात साजरी झाली. या पुस्तिकेत काय आहे या जिज्ञासेतून डॉ. नीरज देव या मनोचिकित्सकानं ती पुस्तिका वाचली व त्यांना जो अर्थ लागला तो या लेखात वाचा…

असं म्हणतात कि, जगात कोण बोलतेय त्याला किंमत असते; काय बोललं जातं त्याला कोणी किंमत देत नाही. खरेच ही एक व्यथाच आहे, मानवी मनाची धाटणीच आहे. त्यामुळे कित्येक वेळा मांडलेली तथ्ये ही समाजासमोर येतच नाहीत व जी कूचकामाची आहेत त्यांनाच तथ्य म्हणून कवटाळले जाते. हे सर्व आठवायचे कारण महात्मा गांधींचे ‘हिंद स्वराज’ होय. ‘हिंद स्वराज’ ही छोटेखानी पुस्तिका गांधीजींनी १९०८ च्या सुमारास लिहिली ती १९१० साली गुजरातीत प्रकाशित झाली. सन १९३८ साली म्हणजे सुमारे तीस वर्षांनंतर ही तीत काही फेरफार करावा असे महात्माजींना वाटत नाही, उलट ती मतं अधिक पक्की झालीत अशीच त्यांची साक्ष आहे. हि पुस्तिका ‘अनेक दृष्टींनी अनोखी’ व ‘गांधीजींच्या विचारांना समजून घेण्याची चावी’ असल्याचा निर्वाळा पुस्तिकेच्या (२००९ साली ) शताब्दी वर्षात प्रकाशकाने दिलेला आहे. गांधीजींचे सुपुत्र स्व. रामदास गांधींनी इ. स. १९७९ साली हा अमूल्य ग्रंथ सामान्य व डिलक्स स्वरुपात प्रकाशित केलेल्या आवृत्तीचे मूल्य अनुक्रमे रु १।७५ व रु २।५० ठेवण्यात आले होते त्यातून अनुक्रमे पंचवीस व पन्नास पैसे टिळक स्वराज्य फंडाला देण्यात येणार होते. यावर भाष्य करताना ते लिहितात, ‘’गांधींजी के प्रियकार्य के लिए हमें इतना कर वसूल करने का अधिकार सहज ही प्राप्त हो गया ‘’(पृ ix) याचाच अर्थ ज्यावर कर वसूल करता येईल एवढा हा ग्रंथ त्यांना मोलाचा वाटला.

त्यामुळेच सन २००९ मध्ये प्रस्तुत पुस्तिकेची गांधीजींच्या मूळ हस्ताक्षरासहित गुजराती, इंग्रजी व हिंदी अशा तीन भाषांत हार्ड बाउंड मोठ्या ग्रंथ स्वरुपातील डिलक्स संस्करण नवजीवन ट्रस्ट अहमदाबादने प्रकाशित केलेला आहे. हा सर्व इतिहास देण्याचे कारण म्हणजे गांधीवादी प्रकाशकाला हा ग्रंथ आजही मान्य आहे व तो विकलाही जातोय. मला प्रश्न हा आहे कि, ही पुस्तिका बुद्धीचा चष्मा लावून खरंच कोणी वाचतं का? अन् वाचल्यावर त्यातील मजकूर पटतो का? जर पटत नसेल तर केवळ व्यक्तीपूजेस्तव असे ग्रंथ आपण जमवायचे कशाला?

प्रस्तुत लेखाची मर्यादा ‘हिंद स्वराज’ हे म. गांधींचे पुस्तक एवढीच मर्यादित असून संदर्भही केवळ ‘हिंद स्वराज’च्या उपरोक्त आवृत्तीतून घेतलेले आहेत. या त्रैभाषिक ग्रंथातील मूळ गुजराती लेखन प्रमाण मानून प्रस्तुत लेख लिहिलेला आहे. जिज्ञासू वाचकांना संदर्भ शोधता येणे सोपे जावे म्हणून संदर्भ हिंदीतून पृष्ठांकसह दिलेले आहेत

पार्लमेंट ही वांझ व वेश्या आहे

आज सारे जग संसदीय प्रणाली, लोकतंत्र उत्तम राज्यपद्धती आहे असे मानते. लोकसत्ताक राज्य पद्धती अस्तिवात येण्यासाठी मानव जातीला प्रचंड प्रयास करावे लागले, शतकानुशतकांच्या प्रयत्नातून ती अस्तित्वात आली तीत काही त्रूटी व दोष असतील ही पण अराजकता, निरंकुश हुकुमशाही, अनियंत्रित वा नियंत्रित राजेशाही इ. च्या तुलनेत ते दोष नी त्रुटी नगण्य आहेत. शिवाय दीर्घकालीन परंपरा राहिली तर ही लोकतंत्र पद्धती अधिकाधिक परिपक्व होत जाते हे अमेरिका, युरोप मध्ये स्पष्टपणे दिसते अन् भारतात सुद्धा ती विकसित होताना दिसते. १९५० साली लोक जितके जागृत होते त्यापेक्षा ते १९७७ साली अधिक जागृत झालेले दिसले, उत्तरोत्तर अधिकाधिक जागृत होताना दिसताहेत. या संसदीय प्रणाली विषयी महात्माजींच्या भावना ‘हिंद स्वराज’च्या पाचव्या प्रकरणात स्पष्टपणे बाहेर येतात –
‘’जिसे आप पार्लमेंटोंकी माता कहते हैं, वह पार्लमेंट तो बांझ और बेसवा है ।’’ (पृ ४२) आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ गांधी जी लिहितात, ‘’अब तक उस पार्लमेंटने अपने आप एक भी काम अच्छा नहीं किया । अगर उस पर जोर दबाव डालनेवाला कोई न हो तो वह कुछ भी न करे, ऐसी उसकी कुदरती हालत हैं ।’’(पृ ४३)
लोकसत्ताक शासन पद्धतीत लोकांचा दबाव असल्याशिवाय शासन एखादा लोकोपयोगी निर्णय घेत नाही असे म्हणणे हा कुठाराघात आहे. लोकच लोकसत्ताक पद्धतीचे खरे शासक असतात त्यांनी दबाव टाकणे व शासनाला निर्णय घ्यायला भाग पाडणे लोकसत्ताक पद्धतित अपेक्षित असते. हुकुमशाहीत लोकदबावाला काडीचे ही मूल्य नसते पण हे लक्षात न घेता महात्माजी संसदीय प्रणालीसाठी चक्क ‘वांझ’ शब्दाचा उपयोग करतात पुढे ते लिहितात, ‘’ और वह बेसवा है क्योंकी जो मंत्रिमंडल उसे रखे उसके पास वह रहती है… उसका कोई मालिक नही है । …जैसे बुरे हाल बेसवाके होते हैं, वैसे ही सदा पार्लमेंटके होते हैं । ‘’ (पृ४३- ४९)
यात संसदेतील सदस्य धर्मनिष्ठ नसतात असा आरोप करत, ते संसदेच्या कामकाजाच्या वेळी कसे बेपर्वा वर्तन करतात इ. लोकांना झोंबणा-या व पटणा-या बाबीचे वर्णन करीत गांधीजी विषय पुन्हा आपल्या आरोपाशी जोडून मोकळे होतात व अशा संसदेची दुर्गती नेहमी वेश्ये सारखीच होते असा निर्वाळा द्यायला चूकत नाहीत.
संसदेचे जे हाल व्हायचे ते होवो; पण प्रस्तुत लिखाणातून गांधींसारख्या महात्म्याच्या मनांत असलेल्या स्त्रीच्या ‘वांझ’ व ‘वेश्या’ या दोन प्रतिमा दिसतात. ‘वांझ राहणे’ ही त्या स्त्रीच्या दृष्टिने पाहता पीडादायी वेदना आहे. तिचा गांधीजींकडून शिवी म्हणून वारंवार होणारा उपयोग निश्चितच दुःखदायी आहे, त्याचप्रमाणे ‘वेश्या’ हा शरीर विक्रयाचा व्यवसाय कोणत्याही स्त्री कडून नाईलाजानेच स्वीकारला जातो. त्यातील व्यथा ती स्त्रीच जाणू शकते. हे विवेकानंद, बुद्धादि वीतराग योग्यानाही कळते, पण गांधींसारखा महात्मा वारंवार शिवी म्हणून ‘वेश्या’ शब्दाचा वापर करीत असेल तर ते नक्कीच क्लेशदायी आहे. हे लिखाण महात्माजींव्यतिरीक्त अन्य कोणीही केले असते तर उदारमतवादी व परिपक्व गांधीवाद्यांनी सुद्धा त्या लिखाणाचा धिक्कारच केला असता. मागे माजी सरसंघचालक सुदर्शन यांनी ही असेच राजकारणी व वेश्या अशी तुलना केली होती. तेंव्हा त्यांच्यावर कडाडून झालेली टिका सुज्ञांना आठवतच असेल. डोळे उघडे ठेवून वाचणा-या कुणालाही गांधीजींच्या मनात स्त्री विषयक खदखदत असलेली भावनाच बाहेर पडत नाही ना? असे वाटल्यास तो दोष पूर्णपणे वाचकाचा मानता येणार नाही.

रेल्वे – दुष्काळ, महामारी व दुष्टतेचे कारण

रेल्वे ही भारताची शान आहे जगातील दुस-या क्रमांकाचे रेल्वेचे जाळे भारतात आहे असे आपण अभिमानाने सांगतो. पण महात्म्याच्या नजरेला ही रेल्वे दुष्काळ, महामारी, दुष्टता इतकेच नव्हे तर हिंदू-मुस्लिम विद्वेषाचे कारण वाटते. त्याविषयी ते लिहितात, ‘’रेलसे महामारी फैली है । अगर रेलगाडी न हो तो कुछ ही लोग एक जगहसे दूसरी जगह जायेंगे और इस कारण संक्रामक रोग सारे देश में नहीं पहुंच पायेंगे ।’’ (पृ ९३) गांधीजींना दिसलेले महामारीचे हे महत्तम कारण कळताच बसलेल्या धक्क्यातून वाचक सावरतो न् सावरतो तोच ते रेल्वे पुराणात (हा ही महात्माजींचाच शब्द) पुढे सांगतात,
‘’रेलसे अकाल बढे हैं, क्योंकी रेलगाडी की सुविधाके कारण लोग अपना अनाज बेच डालते हैं। जहाँ मंहगाई हो वहाँ अनाज खिंच जाता है, लोग लापरवाह बनते हैं और उससे अकालका दुख बढता है । ‘’ (पृ ९४)
हा ग्रंथ वाचण्यापूर्वी माझ्यासारख्या सामान्य माणसाचा असा समज असतो कि रेल्वेच्या किफायतशीर वाहतूक सुविधांमुळे शेतक-यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळू शकतो, जिथे दुष्काळ पडला असेल तेथे रेल्वेचा फायदा दुष्काळग्रस्तांना पाणी व धान्य पुरविण्यासाठी होत असतो. पण महात्माजींच्या या ग्रंथाच्या प्रकाशात तो सपेशल निवळतो. तितक्यात महात्माजी सांगतात, ‘’ रेलसे दुष्टता बढती है । बुरे लोग अपनी बुराई तेजीसे फैला सकते हैं । हिंदुस्थान में जो पवित्र स्थान थें, वें (रेल के कारण) अपवित्र बन गयें है ।“ (पृ ९४) इतके वर्णन पूरेसे न वाटून ते ठामपणे प्रतिपादन करतात कि, ‘’उससे (रेलसे) अकाल फैलेगा या नहीं, इस बारे में कोई शास्त्रकार मेरे मनमें घडीभर शंका पैदा कर सकता हैं; लेकिन रेलसे दुष्टता बढती है यह बात मेरे मनमें जम गयी है वह मिटनेवाली नहीं है । ‘’ (पृ ९५)
जेव्हा वाचक त्यांना विचारतो कि रेल्वेने जसे वाईट लोक दूरदूरुन तीर्थस्थळावर जातात तसेच चांगले लोक ही जातातच की, त्यावर महात्माजींचे उत्तर असते कि ते तर तसेही जातातच. पण वाईट लोक रेल्वे मुळेच जातात व दुष्टता फैलावतात. दुष्काळ, महामारी, दुष्टता फैलावणा-या या रेल्वेचा सर्वाधिक उपयोग घेणारा स्वातंत्र्यपूर्व काळातील नेता म्हणजे महात्माजीच होत असा इतिहासाचा दाखला आहे. महात्माजींच्या या दिव्य विचारांपासून दूर राहिल्यानेच असेल कदाचित भारताचे पंतप्रधान व गृहमंत्री बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहताहेत. खरे तर ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच या महान ग्रंथाची शताब्दी गुजरात सरकार तर्फे साजरी करण्यात आली होती पण वाचण्याचा कंटाळा असल्याने त्यांनी प्रस्तुत ग्रंथ बहुधा वाचला नसावा.

हिंदू मुस्लिम झगड्याचे मूळ

हिंदू मुस्लिम प्रश्नाचा तिढा कसा सोडवावा असा प्रश्न भारतातील अनेक विचारवंताना व नेत्यांना पडत आलेला आहे. पण हा प्रश्नाचे रामबाण उत्तर महात्माजींनी ‘हिंद स्वराज’च्या दहाव्या प्रकरणात दिले आहे, ते लिहितात, ‘’ आपका आखरी सवाल बडा गंभीर मालूम होता है । लेकिन सोचने पर वह सरल मालूम होगा । यह सवाल (हिंदू मुसलमान) उठा है, उसका कारण भी रेल, वकील और डाक्टर हैं ।’’ (पृ ९९)
रेल्वेचा विचार आपण मागे केलाच आहे असे सांगून वकील व डॉक्टरांविषयी पुढे बोलूत असे सांगत ते प्रतिपादन करतात कि ‘देवाने माणसाला ज्याप्रमाणे पैदा केले आहे, त्या हातपायाने शक्य असेल तेवढीच हालचाल त्याने करावी. पण आपली बुद्धी (गांधीजी अकल म्हणतात) ती वापरु नये. ती फक्त देवाच्या शोधात करावी. पण रेल्वेमुळे माणूस ईश्वराला विसरुन गेला आहे’ मथितार्थ असा मानायचा का की रेल्वे, वकील व डॉक्टर नव्हते तेंव्हा हिंदू मुस्लिमातील प्रेम उतू जात होते. त्यांच्यात तिळमात्र द्वेष नव्हता व रेल्वे, वकील व डाक्टर आल्यानेच तो वाढला?

वकील – वेश्येपेक्षा नीच व्यवसाय

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणा-या नेत्यात सर्वाधिक नेते वकील होते, याची कितीतरी उदाहरणे देता येतील. दस्तुरखुद्द गांधीजीच बॅरिस्टर होते. तरीही त्यांच्या मते , ‘’मेरी राय में वकीलोंने हिंदुस्तान को गुलाम बनाया है, हिंदू-मुसलमानोंके झगडे बढायें हैं और तो और अंग्रेजी हुकूमत को यहां मजबूत किया है ।‘’(पृ ११९-१२०)
या त्यांच्या वक्तव्यावर जेंव्हा विचारले जाते कि, अमुक अमुक वकीलाने तर चांगले काम केलेले आहे त्यावर उत्तर देताना महात्माजी सांगतात, ‘’ वकीलोंकी भलमनसी के जो बहुतसे किस्से देखनेमें आतें हैं, वे तभी हुए जब वें अपने को वकील समझना भूल गये । ‘’ (पृ १२२) याचा अर्थ कोणताही वकील ‘वकील’ म्हणून चांगला असूच शकत नाही असाच घ्यावा लागतो. पुढे वकीलांचे वर्णन करताना ते वकीलांना ‘निठल्ले’, ‘आलसी’ ही विशेषणे देत, कोणतेही उदाहरण न देता स्पष्ट आरोप करतात कि, ‘’ वकीलोंके कारण हिंदू मुसलमानों के कुछ दंगे हुए हैं, यह तो जिन्हें अनुभव हैं वे जानते होगें’’ (पृ १२६) यापुढे जाऊन ते लिहितात कि,‘’ अगर वकील वकालत करना छोड दे और वह पेशा वेश्याके पेशे जैसा नीच माना जाय, तो अंग्रेजी राज एक दिन में टूट जाय।’’ (पृ १३०)
हे वाचणा-याला वाटावे कि इंग्रजांनी जणू हायकोर्टातूनच भारताची सत्ता मिळविली होती व ती ही भारतीय वकीलांच्या सहाय्याने. येथे पुन्हा आवश्यकता नसताना गांधीजी ‘वेश्येचा व्यवसाय नीच’ ठरवितात व एकप्रकारे पुन्हा एकदा दुर्दैवाने या व्यवसायात सापडलेल्या स्रियांवर लांच्छन उडवितात. जाता जाता पुन्हा एकदा वकीलांना सल्ला देतात कि त्यांनी त्यांची वकीली सोडावी व घरात बसून चरखा चालवावा (पृ २५२) येथे नम्रपणे नमूद करावेसे वाटते कि या महान ग्रंथातील केवळ एवढीच बाब गांधीजींनी तंतोतंत पाळली.

डॉक्टर धर्मभ्रष्ट व रुग्णालय पापाचे मूळ

सामान्याप्रमाणे डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी असे महात्माजींना पूर्वी वाटत होते (पृ १३३) पण पुस्तकाचे लेखन करताना डॉक्टरी धंदा ‘निकम्मा’, ‘अनीतिचा’ व ‘धर्मभ्रष्ट ‘ (पृ १३२ व १३७) आहे असे लक्षात आल्यावर ते मावळले. डॉक्टर लोकांमुळे लोकांचे आजार बरे होतात व ते न घाबरता पुन्हा तशाच बाबी करतात. परिणामी त्यांच्यात धर्मभ्रष्टता वाढते यामुळेच रुग्णालय पापाचे मूळ होय असे त्यांचे प्रतिपादन आहे. ते म्हणतात ‘’ मैंने विलास किया, मैं बीमार पडा; डॉक्टरने दवा दी मैं चंगा हुआ । क्या मैं फिरसे विलास नहीं करुंगा ? ‘’ (पृ १३६) आधुनिक वैद्यकाचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांपेक्षा वैद्य व हकीम बरेत असे त्यांना वाटते. रुग्णाने आधुनिक डॉक्टरची औषधी घेऊन जीव वाचविण्यापेक्षा मेलेले बरे असे त्यांचे स्पष्ट मत आहे. पण दुर्दैव बघा ज्यावेळी त्यांना स्वतःला अपेंडीक्स झाला त्यावेळी त्यांना कोणीच वैद्य हकीम मिळाला नाही तेव्हा केवळ निरुपायाने आधुनिक डॉक्टराकडून शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागली.

चोराचे हृदय परिवर्तन

प्रस्तुत पुस्तकातील ‘गोला बारुद’ या प्रकरणात इंग्रजांना शस्त्राचाराने घालविण्याचा विचार चूकीचा असून त्यासाठी नवा मार्ग शोधायला हवा असे प्रतिपादन करताना ते चोराचे उदाहरण देतात त्यावेळी ते सांगतात मूलतः चोराला ‘अज्ञानी’ व ‘रोगी’ समजायला हवे व प्रसंग मिळताच त्याचे मनःपरिवर्तन करायला हवे.
हे काम किती सुलभ आहे याचे वर्णन करताना ते लिहितात, ‘’…वें भाईसाहब (चोर) फिरसे चोरी करने आते है । आप नाराज नहीं होते । आपको उसपर दया आती है । आप सोचते हैं यह आदमी रोगी है । आप खिडकी दरवाजे खुले कर देते हैं । आप अपनी सोने की जगह बदल देते हैं । आप अपनी चीजें झट ले जा सकें इस तरह रख देतें हैं । चोर आता है । वह घबराता है । यह सब उसे नया ही मालूम होता है । माल तो वह ले जाता है, लेकिन उसका मन चक्कर में पड जाता है । वह गाँव में जाकर जाँच पडताल करता है । आपकी दयाके बारेमें उसको मालूम होता है । वह पछताता है और आपसे माफी मांगता है । आपकी चीजें वापस ले आता है । वह चोरीका धंदा छोड देता है । आपका सेवक बन जाता है । ‘’ (पृ १७७-१७८) महात्माजींचा हा प्रयोग कुणाला करायचा असेल तर सोपे जावे म्हणून इत्थंभूत वर्णन त्यांच्याच शब्दात दिले आहे. या पद्धतीने पाहता इंग्रज पण अज्ञानीच आहेत असा त्यांचा दावा आहे (पृ १८१)

या शिवाय प्रस्तुत पुस्तकात लग्न करुन संतान उत्पत्ति न करता ब्रह्मचर्य पाळण्याचा मार्ग (पृ २०५-२०६), यंत्र म्हणजे सापाचे बिळ (पृ २४३-४४) असून यंत्र महापाप (पृ २३५) असल्याचा निर्वाळा देत त्यावर यंत्रांच्या अवगुणांवर एक पुस्तक लिहिता येईल (पृ २४५) असा दावा ही महात्माजींनी केलेला पाहायला मिळतो येथे चरखा हे ही एक यंत्रच आहे याचा विचार वाचकाने करायचा नसतो. वृत्तपत्रे अप्रामाणिक (पृ ५२-५३) व अक्षरज्ञान नुकसानकारक (पृ २१२) आहे इ अनेक बाबींनी प्रस्तुत ग्रंथ संपन्न आहे.
महादेवभाई देसाईंनी १९३८ साली लिहिलेल्या प्रस्तावनेत गौरवपूर्ण शब्दात लिहिले आहे कि ‘’नामदार गोखलेजी १९१२ में जब दक्षिण आफ्रिका गये तब उन्होंने वह अनुवाद देखा। उन्हें उसका मजमून इतना अनगढ लगा और उसके विचार जल्दबाजीमें बने हुए लगे कि उन्होंने भविष्यवाणी की कि गांधीजी एक साल भारतमें रहनेके बाद खुद ही उस पुस्तकका नाश कर देंगे। गोखलेजी की वह भविष्यवाणी सच नहीं निकली ।’’ (पृ ३०१) गाँधीजी ज्यांना गुरु मानत त्या नामदार गोखलेंना बुद्धीचे डोळे लावून वाचताच जे दिसले ते इतरांना दिसू नये यातच गोखलेंचे ‘गुरुत्व’ सामावले होते की काय? असे निरुपायाने विचारावे लागते.

(लेखक मनोचिकित्सक आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2020 5:45 pm

Web Title: blog what is written in mahatma gandhi hind swaraj book
Next Stories
1 BLOG : एनर्जेटिक अमृता खानविलकर……
2 BLOG : अरुण सावंत – ड्यूक्स नोजचा शिलेदार
3 BLOG : ओशो नावाचा अवलिया!
Just Now!
X