– वेन्गुस्वामी रामास्वामी, ग्लोबल हेड, टीसीएस आयओएन

विद्यार्थीदशेत असताना आपण सर्वजण अशा दिवसाची कल्पना करत असायचो जेव्हा एखाद्या आंदोलन, मोर्चामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शाळा बेमुदत बंद केल्या जातील आणि विद्यार्थी, पालक, शिक्षकांना काहीच माहिती नसेल की पुढे काय होणार आहे.  आज जेव्हा आजाराच्या साथीमुळे देशात लॉकडाऊन पुकारला गेलेला असताना भारतातील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.  पण आज काळ बदलला आहे आणि आपल्याकडे डिजिटायझेशनची सुपरपॉवर आहे.  नोटबंदीच्या काळात डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात घडून आलेली क्रांती आपण सर्वानीच पाहिली, आताच्या परिस्थितीत हेच आपल्या शिक्षण व्यवस्थेत घडून येऊ शकते का?

हे साध्य करायचे असेल तर डिजिटल टेक्नॉलॉजी मोलाची भूमिका बजावू शकते आणि डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे पारंपरिक पद्धतीचे वर्ग ग्लास-रूम्समध्ये बदलले जाऊ शकतात.  आता लोक आपले नव्या पद्धतीचे सर्वसामान्य जीवन जगू पाहत आहेत आणि सुधारणेला वाव करून देण्यासाठी सध्याची परिस्थिती ही योग्य वेळ आहे. आज तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर करून अशी डिजिटल इकोसिस्टिम निर्माण करता येऊ शकेल जेणेकरून शिक्षण अखंडीत चालू राहू शकेल.  पारंपरिक वर्गांच्या विटा आणि सिमेंटने बनलेल्या भिंती मागे सोडून डिजिटल ग्लास-रूमच्या व्हर्च्युअल भिंतींना जवळ करण्याची ही अतिशय योग्य वेळ आहे.  या परिवर्तनात कोणत्या बाबी महत्त्वाच्या ठरतील? ते पाहू.

१. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार वेगाने केला जाणे – गेल्या बऱ्याच काळापासून डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची शिक्षण क्षेत्राची गती अतिशय धीमी आहे.  आज साथीच्या  संसर्गामुळे प्रत्यक्ष वर्ग  चालवणे अशक्य होऊन बसले आहे.  नवीन मॉडेल स्वीकारण्यासाठी शिक्षणतज्ञ आणि शिक्षकांकडे एक संधी उपलब्ध झाली आहे.  क्लाऊड, डेटा बँडविड्थ, स्टोरेज तंत्रज्ञान, कॉम्पूट पॉवर, अनॅलिटीक्स, डेटा मॅनेजमेंट मेथड्स इत्यादी सर्व मिळून डिजिटल जगतात एक अभूतपूर्व संधी निर्माण करण्यासाठी काम करत आहेत जी काही वर्षांपूर्वी संभव होऊ शकणार नव्हती.  या सर्व गोष्टींमध्ये काळानुरूप अनेक सुधारणा घडल्या आहेत.  आता वेळ येऊन ठेपली आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थेने त्याचा लाभ घ्यावा आणि या साथीविरोधात आपला लढा द्यावा.

२. शिक्षककेंद्री ते विद्यार्थीकेंद्री – शिक्षणाविषयीचा आपला दृष्टीकोन नेहमीच शिक्षककेंद्री (बहुतांश प्रमाणात एकमार्गी) राहिला आहे.  पण आता या शिक्षककेंद्री भौतिक वर्ग ते विद्यार्थीकेंद्री डिजिटल ग्लास-रूम्स असे परिवर्तन घडवून आणण्याची वेळ आहे.  विद्यार्थ्यांमध्ये स्वयं-शिक्षणाची सवय विकसित करून ती पुढे वाढवण्याची ही संधी आहे.  यामुळे त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावतील, जिज्ञासेला खतपाणी मिळेल आणि अनेक नवनवीन गोष्टींमध्ये नवी रुची निर्माण होईल.

३. शारीरिकदृष्ट्या दूर असलेली पण डिजिटली एकमेकांसोबत असलेला समुदाय – डिजिटल जगतामध्ये सामुदायिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांना ‘कुठेही, कधीही’ एकमेकांशी कनेक्ट होण्यात मदत करेल.  समुदाय विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त सहयोगपूर्ण जागा मिळवून देतील जिथे त्यांना गुंतवून ठेवता येईल आणि त्यांच्या क्षमता विकसित करता येईल.  सुरुवात म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी तीन डिजिटल समुदाय करू (१)  शाळा किंवा महाविद्यालय एक समुदाय (२) वर्ग एक समुदाय आणि (३)  प्रत्येक विषय एक समुदाय.  यामुळे विद्यार्थ्यांचा एकमेकांसोबत आणि शिक्षक विद्यार्थी यांच्या दरम्यान सक्रिय सहभागाला वाव  मिळेल.

४. व्हर्च्युअल असला तरी सहभाग खरा आणि वास्तविक आहे – डिजिटल जगतामध्ये विद्यार्थ्यांना रुची वाटत राहावी, त्यांचा उत्साह मावळू नये, सहभाग कायम राहावा यामध्ये काही विशिष्ट आव्हानेअसतात. यासाठीच एक मार्ग म्हणजे डिजिटल असाइन्मेंट्स, स्पर्धा, वादविवाद इत्यादी होत राहावेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा अभ्यासातील उत्साह टिकून राहील आणि विषयाचा वास्तविक वापर कसा करायचा ते त्यांना शिकून घेता येईल.

५. व्हर्च्युअल जगासाठी प्रमाणीकरण – डिजिटल परीक्षा, मूल्यांकन वेळोवेळी करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून शिक्षण प्रभावी ठरत आहे की नाही ते जोखता येऊ शकेल.  यामुळे शिक्षकांना विशिष्ट आणि गरजू विद्यार्थी  ओळखून  त्यांना योग्य अतिरिक्त मदत पुरवता येईल.  प्रत्यक्ष  वर्गाप्रमाणेच शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल ग्लास-रूममध्ये एकत्र आणू शकतील.

६. टेक्नॉलॉजी आणि कन्टेन्ट क्षमता प्रदान करतील पण अध्यापन कला ही गुरुकिल्ली आहे – तंत्रज्ञान उपलब्ध होणे हे आव्हान नाही.  शिकवण्यासाठी कन्टेन्ट देखील उपलब्ध आहे.  शिक्षक प्रत्यक्ष वर्गात शिकवत असल्यामुळे त्यांच्याकडे देखील कन्टेन्ट आहे.  अध्यापन कला या लिंकचा मात्र अभाव आहे.  प्रत्यक्ष वर्गात वापरली जाणारी अध्यापन कला डिजिटल ग्लास-रूममध्ये उपयोगी ठरणार नाही.  संपूर्णतः नव्या प्रक्रिया, पद्धती आणल्या जात आहेत.  या पद्धती, प्रक्रिया अधिक जास्त संवादात्मक आहेत, त्यामध्ये अनेक खेळ, मनोरंजन आहेत, त्या व्हिज्युअली अतिशय चांगल्या आहेत, व्यक्तिगत दृष्ट्या जवळच्या वाटतील अशा आणि सोप्या आहेत.  यामुळे शिक्षण खूप जास्त प्रभावी होऊ शकते.

७. शिक्षणाचे लोकशाहीकरण – सध्याच्या संकटकाळात आपण हे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे की डिजिटल तंत्रज्ञान फक्त एका विशिष्ट उच्च वर्गापुरते मर्यादीत राहणार नाही हे सुनिश्चित केले पाहिजे.  त्याचे लोकशाहीकरण झाले पाहिजे आणि कोणत्याही भेदभावाशिवाय ते प्रत्येक नागरिकासाठी उपलब्ध असेल.  आपल्या शिक्षण व्यवस्थेचा एक खूप मोठा भाग सरकार चालवते.  त्यांनी या प्लॅटफॉर्मचा स्वीकार केला पाहिजे, कन्टेन्ट, पद्धती प्रत्येक शाळेला उपलब्ध करवून दिल्या पाहिजेत.  संपूर्ण देशभरात डिजिटल ग्लास-रूमचा सर्व स्तरांमध्ये स्वीकार केला जावा यासाठी काही राज्य सरकारांनी पुढाकार घेतला पाहिजे.

डिजिटल ग्लास-रूम्समुळे पारदर्शकता वाढेल, त्यांच्या देखरेखीचा खर्च कमी असतो आणि ते खूपच सोयीस्कर आहेत.  हे आपल्याला शिक्षणामध्ये नवनवीन मापदंड निर्माण करण्यासाठी मदत करेल.  पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठीच्या मार्गात काही अडचणी नक्कीच येतील.  अपुरे बँडविड्थ, सर्वांना इंटरनेट उपलब्ध न होऊ शकणे, तंत्रज्ञान पुरेसे नसणे, वीज पूर्ण वेळ उपलब्ध नसणे अशा अनेक अडचणी येतील.  पण या सर्व बाबतीत वेगाने सुधारणा होत आहेत.  मानसिकतेमध्ये बदल करणे ही या अडचणी दूर करण्याची गुरुकिल्ली आहे. आम्हाला पक्की खात्री आहे की, नवीन मॉडेल स्विकारण्यामध्ये आपल्या शिक्षण संस्था पुढाकार घेतील.

शास्त्र युनिव्हर्सिटी, एनएमआयएमएस, इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, सिंघानिया स्कूल आणि इतर अनेक शिक्षण संस्थांनी सध्याच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी शिक्षण प्रक्रिया संपूर्णतः डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेण्यात पुढाकार घेतला आहे आणि त्याचवेळी ते स्वतःला भविष्यासाठी सज्ज करत आहेत.  आपणही या संधीचा लाभ घेऊ या आणि संकटकाळात काही चांगले घडवून आणून क्लासरूम ते ग्लास-रूम या शिक्षणातील परिवर्तनाला वेगवान बनवू या.  येणारा प्रत्येक दिवस आपलाच असेल.