25 November 2020

News Flash

BLOG : दमलेल्या धोनीची ही कहाणी…

नव्याने संघबांधणीचा विचार करण्याची CSK वर वेळ

फोटो सौजन्य - CSK

– प्रथमेश दीक्षित

आपल्याला ना काही गोष्टींची सवय झालेली असते. आता थेट मुद्द्यालाच हात घालू, उगाच नमनाला घडाभर तेल कशाला?? आयपीएल म्हटलं की चेन्नई सुपरकिंग्जसोबत अंतिम फेरीत कोण खेळणार यासाठी सातही संघांमध्ये असलेली चूरस असं काहीसं अलिखीत समिकरण गेल्या १२ वर्षांमध्ये तयार झालं होतं. आपल्या संघाचं हे चित्र तयार करण्यात महेंद्रसिंह धोनीचा खूप महत्वाचा वाटा होता. खरं पहायला गेलं तर आयपीएलमध्ये सर्वाधिक विजेतेपदं ही मुंबईच्या नावावर आहेत, परंतू प्रत्येक आयपीएलचा हंगाम म्हटला की चाहत्यांना पहिली उत्सुकता असते ती म्हणजे चेन्नई आणि धोनीची. कॅप्टन कूल, आपल्या खेळाडूंना संकटकाळातही भक्कम पाठींबा देणारा धोनी हा गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील अनेक क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. परंतू असं म्हटलं जातं, घरं फिरलं की घराचे वासेही फिरतात. २०१९ विश्वचषकात भारताचा पराभव, धोनीचा संथ खेळ, पूर्वीसारखी न होणारी फटकेबाजी…अशी अनेक कारणं एकत्र आली आणि निवड समितीने धोनीला संघाबाहेर केलं.

आता परत जुने मुद्दे उकरुन काढण्यात काही अर्थ नाही. धोनी हा खेळाडू म्हणून नेहमी ग्रेट होता, आहे आणि राहिल यात काही वादच नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर धोनी आयपीएलमध्ये आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करेल अशी सर्वांना आशा होती. गतविजेत्या मुंबईवर मात करत चेन्नईने धडाकेबाज सुरुवात केली. अंबाती रायुडूच्या अर्धशतकामुळे धोनीचं उशीरा फलंदाजीसाठी येणं फारसं कोणाच्याही डोळ्यात खूपलं नाही. परंतू यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात धोनीने फलंदाजीला उशीरा येणं चाहत्यांना चांगलंच खटकलं. त्यातच शुक्रवारी दुबईत हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनी फलंदाजीसाठी लवकर आला. त्याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. परंतू धावा घेताना होणारी दमछाक, त्यानंतर वैद्यकीय मदत या सर्व गोष्टी पाहिल्यावर एका गोष्टीची प्रामुख्याने जाणीव झाली…की चेन्नईला नव्याने संघबांधणीचा विचार आता करणं भाग आहे. वय वर्ष ३९, दुबईत उष्ण वातावरणात २० षटकं यष्टीरक्षण करायचं आणि परत फलंदाजीतली धावपळ यामुळे कोणालाही त्रास होणार हे साहजिकच आहे. परंतू थकत चाललेल्या शरीराचाही विचार व्हायला हवा ना?? धोनी हा माणूस आहे तो सूपरमॅन नाही हे ज्या दिवशी लोकांना समजेल त्यादिवशी अनेक प्रश्न सुटतील असं वाटतं.

सर्वोत्तम फिनीशर अशी ओळख असेलल्या धोनीचं असं रुप पाहणं कोणालाही आवडणार नाही. अगदी त्याच्या विरोधकांनाही नाही. अनेकांनी धोनी फलंदाजीसाठी उशीरा का येतो म्हणून त्याच्यावर टीका केली. परंतू एक फलंदाज म्हणून आपल्यातल्या उणीवा इतरांना दिसत नसल्या तरी धोनीला त्या नक्कीच माहिती आहेत. राजस्थानविरुद्धचा सामना गमावल्यानंतर धोनीने याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. “वर्षभर मी क्रिकेटचा फारसा सराव केला नाहीये. युएईत आल्यानंतरही १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीचा फारसा उपयोग झाला नाही.” अशा परिस्थिीतीत धोनीने स्वतःला प्रमोट करणं हे योग्य ठरणारच नाही. आपण पुढे जाण्यापेक्षा नवीन खेळाडूंना संधी दिली, आणि त्यातून एखादा खेळाडू चमकला तर ते धोनीसाठी आणि चेन्नईसाठी चांगलंच असणार आहे. परंतू तेराव्या हंगामात सलग तिसरा पराभव…आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी आणि धोनीचं वाढतं वय या सर्व गोष्टी हेच सांगत आहेत की नवा विचार व्हायला हवा.

हैदराबादविरुद्ध सामन्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आघाडीचे ४ फलंदाज स्वस्तात माघारी परतले आणि धोनी-जाडेजा जोडी मैदानावर आली. हे दोन्ही फलंदाज मैदानावर असताना चेन्नईला १०.५४ च्या रनरेटने धावा काढणं गरजेचं होतं. १४ व्या षटकाच्या अखेरीस हेच दोन फलंदाज मैदानात असताना चेन्नईसाठी हा रनरेट वाढून १५.६६ वर पोहचला होता. आता इथे अनेक जणं असं म्हणू शकतात की त्यावेळी डाव सावरणं ही चेन्नईची गरज होती. फटकेबाजीचा प्रयत्न झाला असता तर विकेट गेली असती आणि संघ अधिक संकटात सापडला असता. एका क्षणासाठी हा युक्तीवाद आपण मान्य करुया…पण टी-२० क्रिकेटमध्ये डाव सावरण्याच्या नावाखाली किती षटकं वाया घालवणार?? कधी ना कधी तुम्हाला फटकेबाजीचा प्रयत्न करावा लागणारच ना?? मग १६-२० षटकांमध्ये फटकेबाजी करुन आटापीटा करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एका फलंदाजाने मैदानात स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करायची आणि एकाने दुसरी बाजू सांभाळून ठेवायची ही रणनिती चेन्नईच्या खिजगणतीतही दिसत नाही.

२०१४ नंतर पहिल्यांदाच चेन्नईचा संघ सलग ३ सामने हरला आहे. इथे प्रश्न पराभवाचा नाही, स्पर्धा म्हटलं की पराभव हे होतातच. अनेक दादा संघ स्पर्धेत वाईट पद्धतीने हरतात. अनेक दिग्गज खेळाडू अपयशी होतात. परंतू १२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईचा संघ हतबल दिसतो आहे. Daddy’s Army हे बिरुद ज्या संघाने आतापर्यंत मिरवलं…ते Daddy मंडळी आता थकल्यासारखे वाटत आहेत. शेन वॉटसन, ब्राव्हो, इम्रान ताहीर यांच्या दुखापती आणि मैदानात त्यांचा पुरेपूर वापर न होणं हे आतापासूनच चेन्नईचा त्रासदायक ठरतंय. त्यातच रैना आणि हरभजनची अनुपस्थितीत संघाला चांगलीच महागात पडली आहे. अनेक खेळाडूंमध्ये ताळमेळ दिसत नाही. केदार जाधवसारख्या खेळाडूचा गोलंदाजीत वापर न होणं हे अतर्क्य वाटतं. यंदाचा हंगाम चेन्नईचा संघ सामना जिंकण्यापेक्षा नेट रनरेट घसरणार नाही ना या काळजीत खेळताना दिसतंय. CSK मधली जुनी तडफ, जोष, उत्साह दिसत नाहीये. एककाळ गाजवणाऱ्या संघाचं असं चित्र हे त्या संघाच्या समर्थकांसाठी आणि विरोधकांसाठीही चांगलं चित्र नाही.

धोनी हा चॅम्पिअन खेळाडू आहे. भलेही फलंदाजीतला जोर ओसरला असला तरीही कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून तो तितकाच तल्लख आहे. फलंदाजीला लवकर येत नाही, धोनी आता संपला अशी टीका होत असतानाही त्याला आपल्या प्रोसेसवर विश्वास आहे. स्वतःला प्रमोट करण्यापेक्षा इतरांना संधी देऊन नवीन खेळाडू तयार करण्याचं काम तो करतोय. फक्त हे काम लवकर होवो आणि CSK ला जुने दिवस याच हंगामात येवोत एवढीच इच्छा… कारण धापा टाकणारा धोनी पाहवत नाही.

  • आपल्या प्रतिक्रिया prathmesh.dixit@indianexpress.com वर जरुर पाठवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 12:14 pm

Web Title: ipl 2020 dhoni tired face during match vs srh creates lots of questions for csk psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : चेन्नई तळाशी, मुंबई अव्वल
2 IPL 2020 : कोहलीच्या कामगिरीची बेंगळूरुला चिंता
3 रोहित, पोलार्डला सूर गवसणे मोलाचे -झहीर
Just Now!
X