05 July 2020

News Flash

BLOG: मोदींचे ‘आरवणे’ अन् करोनाचे मावळणे!

लवकरच मोदी अपील करतील की लोकांनी आपल्या देशासाठी 'थोडे' नुकसान सहन करावे

मंगेश पाटणकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला टाळे लावले; कारण देशावर ओढवलेले करोनाचे संकट त्यांना अनुल्लंघनीय अरिष्ट वाटले. वस्तुतः याच मोदींकडे जनमताचे वारे वळवण्याचे सामर्थ्य होते;भारताला उत्तुंग अवस्थेला नेण्याचे सामर्थ्य होते, हाच खरा सक्षम नेता असे मीही समजत होतो… पण…
पण मोदींना राजकीय दृष्ट्या ‘त्या जिवांबद्दल ‘ बोलणे अधिक गरजेचे वाटते आहे; की जे जिवंत आहेत आणि बोलू शकतात आणि ‘मेले’ तर अधिक ओरडू शकतात.

माझे विश्लेषण करोना व्ह्यायरसचा वाईट परिणाम उष्णकटिबंधीय देशावर फारसा होत नाही यावर आधारित आहे. आता भारतासारखे उष्ण कटिबंधातील देश पहा. उदा. थायलंड, श्रीलंका, यू.ए.ई, पाकिस्तान,अफ्रिका इ. या देशांत करोनाचे थैमान नाही. कारण करोनाच्या वाढीसाठी हे प्रतिकूल हवामान आहे. हे तज्ज्ञ लोकांसाठी निराशाजनक आहे, पण खरे आहे. या देशात करोना भरमसाठ लोकांचा बळी घेत नाही. येथे फक्त करोनाबाधित रुग्ण आहेत. हे करोनाबाधित फक्त स्वतःपुरते बाधित आहेत, संपूर्ण देशावर व्हिप्ड आणणारे नाहीत. संपूर्ण देशावर व्हिप्ड (आर्थिक, सामाजिक, व्यावहारिक, नैतिक, मानसिक, शैक्षणिक, व्यावसायिक, राजकीय, इ. ) येणार असेल तर ही आहे. ही परिस्थिती देश  कुलूपबंद केल्यामुळे झाली आहे. सध्या सूर्य उत्तर गोलार्धात फिरत असल्याने रुग्णांच्या वाढीत नैसर्गिक रोध लागलाय. (बऱ्याच देशातील आकडेवारी पुराव्यासाठी पाहा.)

सद्यस्थितीत भारतातील परिस्थितीचा विचार करू. भारतात १३० कोटी लोक राहतात. त्यातील २ हजापेक्षा जास्त संक्रमित आहेत आणि ३० पेक्षा जास्त मृत. माध्यमांद्वारे अशाच प्रकारे दर दिवशी ही आकडेवारी दाखवली जाते. याचे सांख्यिकीय अनुमान असे की … एवढे एवढे लोक संक्रमित होतील… पण हे अंदाज फोल ठरत आहेत.  दुसरे असे की सरकार सांगत आहे की, आम्हालाच नक्की किती लोक बाधित आहे ते माहीत नाही. सगळ्यांची चाचणी आम्ही करू शकत नाही. मान्य. मग अपेक्षेपेक्षा कमी मृत्यूंचे स्पष्टीकरण कसे द्याल?

असेही सांगण्यात आले की, गेल्या तीन महिन्यात भारतात १५,००,००० लोक परदेशातून आले. त्यांच्यामुळे हा साथीचा रोग फैलावला. आता हा जर साथीचा रोग आहे तर याचा १५,००,०० x …x … केलेत तर किती लोकांना संसर्ग होईल? (…) आपल्याकडे (फक्त) २ हजारपेक्षा जास्तलोक  संसर्गित आहेत. आता बोला…

यावर आपले सरकार काय करते आहे? ‘खबरदारी घेत आहे’. खबरदारीचा एक मार्ग ‘टाळे लावणे’. याचा परिणाम भीती निर्माण होण्यात होतो. हजारो लोक रस्त्यावर येतील. दिल्ली, मुंबई सारख्या महानगरातील ‘दृश्ये’ पाहा. सरकारचा दुसरा टप्पा, सामान्य गोर-गरिबांसाठी ‘पॅकेज’. हे पैसे सरकारजवळ आले कुठून? अर्थातच ‘ जी. डी. पी.’ तून. ‘जी. डी. पी.’ म्हणजे काय? जी. डी. पी.त तुमचे आमचेच पैसे असतात.

सरकार टाळेबंदी करून त्वरित होणाऱ्या मृत्यूपासून आपला बचाव करेल, आपल्या आजच्या ओरडण्याकडे लक्ष देईल. पण (करोनाची) पाठ वळताच दुर्गम खेड्यातील गोंधळलेल्या लोकांच्या ‘श्वासोश्वासाची’ पर्वा करणार नाही. सध्या सरकार करोनाबाधित रुग्णांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज रुग्णालये, लाखो व्हेंटिलेटर निर्माण करण्यास परवानगी देत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, आज भारतात फारसे रुग्ण व्हेंटिलेटरवर नाहीत. संपूर्ण भारतात २ हजारपेक्षा जास्त करोनाबाधित आहेत. ते रुग्णालयात आहेत कारण रुग्णालये तयार आहेत, या लोकांना ‘गरज’ आहे म्हणून नाहीत.

हो.. पण अशा रुग्णांची संख्या वाढली तर? ती तर रोजच वाढते आहे ना! हे असं होतंय का? ‘हो’. पण किती? अपेक्षित आकडेवारीनुसार ते ११ हजारपेक्षा जास्त व्हायला हवे होते. पण आतापर्यंत २ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बाधित किंवा संशयित आहेत. म्हणजे ते आधीच दहापट कमी आहेत. तरीही व्हेंटिलेटर तयार करण्यास लोक लागले आहेत. परवानगी मिळते आहे. या एवढ्या पुरवठ्याची (उत्पादनाची) गरज असणार नाही. पण आज वाट्टेल ती भरमसाठ किंमत मिळेल या आशेने लोक बनवत आहेत  आणि सरकारही घेतंय. पण उद्या याची गरजच लागली नाही तर? तर त्यांनी निर्माण केलेले हे साहित्य तसेच धूळ खात पडून राहणार. या मालाला उठावाच मिळणार नाही. जर सरकारला उपकरणे बनवायची असतील तर त्यांनी आधी पैसे द्यावे, मगच आम्ही बनवू. पण सरकार नेहमीप्रमाणे पैसे देणार नाही. ‘त्यांनी’ आपल्याकडे असलेले सर्व पैसे आधीच वितरीत केले आहेत. लवकरच मोदी अपील करतील की लोकांनी आपल्या देशासाठी ‘थोडे’ नुकसान सहन करावे. आणि लोकही टाळ्या वाजवून स्वतःची व मोदींची पाठ थोपटतील.

थोडक्यात काय की, व्हेंटिलेटर लोकांच्या डोक्यात असलेल्या ‘भुतांना’ (भीती) घालवण्यासाठी उपयोगी नाही. मग काय करायला हवे? संपूर्ण देशाला आर्थिक खाईत लोटण्यापूर्वी सर्व माहितीचे विश्लेषण करायला हवे. आधी कोणते व काय? नंतर कोणते? अशी श्रेणी ठरवायला हवी. आवश्यकतेनुसार आधी जिथे संख्या जास्त आहे अशी स्थानं त्यानंतर  जिल्हा पातळी, विभाग, झोन नंतर राज्य, देश अशा पातळीवर जायला हवे. याच कालावधीत अधिक उत्पादन व निर्यातीला परवानगी देऊन आर्थिक गाडा चालू ठेवायला हवा. हे मी लोकांच्या दुःखाचा फायदा उठवून नफा मिळवण्यासाठी म्हणत नाहीये. तर ‘ उद्यमे वसती लक्ष्मी:’ कारण या ‘समृद्ध कल्पने मुळे’ आपण अधिक ‘गरीब’ होऊन जाऊ नये म्हणून.

खरं म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार भारताने दहा वर्षात चांगली आर्थिक प्रगती केली आहे. भारताने १० वर्षात २७०दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढले. याचा अर्थ आता २७० दशलक्ष लोकांना एका दिवसाचे ३२ रु. मिळू शकतात. जे कालपर्यंत मिळत नव्हते. गेल्या एका वर्षात ४० दशलक्ष अधिक लोक दररोज ३२रु. मिळवू लागले. याचा अर्थ दररोज एका लाखापेक्षा जास्त लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात भारत यशस्वी झाला. पण आता (३० दिवसात) एका महिन्यात ३० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेत. या दोहोंची तुलना केली तर या टाळेबंदीमुळे आपण आर्थिकदृष्ट्या (महिना, दोन महिने…) किती मागे टाकले जात आहोत? नुसतेच मागे नाही तर उपासमारीमुळे मारले ही जाऊ.

आज मी माझी कमवाली,वृत्तपत्र वितरक, किराणा पुरवठादार इ. सर्व सहाय्यक थांबवले आहेत. ते आता त्यांच्या अवलंबितांना पैसे पाठवणे थांबवतील. त्या बदल्यात त्यांना येथे साधी किरकोळ औषधेही खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतील. त्यामुळे तसेही ते मरतील. गावातले अवलंबीत असल्याने मरतील. पण गावात मरण पावलेल्यांची क्षणोक्षणी बातमी येत नाही. हे एक साधे उदाहरण झाले. हे वास्तव कल्पनेपेक्षाही भयंकर आहे. आम्ही आज हे आमच्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांशी जे केले तेच आम्हाला नोकरीवर ठेवणारेही आमच्या संदर्भात करणारच नाहीत असे नाही. या सगळ्याला जटील भाषेत ‘मंदी’ असे म्हणतात. म्हणूनच ही टाळेबंदी हजार वाचवण्यासाठी लाखो अज्ञातांना ठार मारणार आहे.

आपल्या आरोग्य धोरणाची तपासणी करण्यासाठी दुसरे एक उदाहरण घेऊ. थंड हवामानाच्या देशांचे प्रश्न वेगळे आहेत व उष्ण कटिबंधातील वेगळे आहेत. भारतात दररोज ११०० लोक क्षयरोगामुळे मृत्यू पावतात. हा सुद्धा संसर्गजन्य रोग आहे. तो ‘थेंबा’ द्वारे (थुंकी, खोकला इ. ) पसरतो. दुसऱ्या कोणत्याही देशात क्षयरोगामुळे इतके मृत्यू होत नाहीत. या साथीच्या रोगाविषयी आपण इतके पॅनिक का होत नाही? कारण हे ‘आपले संकट’ आहे, आंतरराष्ट्रीय नाही.

तसेच प्रसारमाध्यमांनीही अधिक जबाबदारीने वागून प्रत्येक मृत्यूला मोठे करून दाखवणे टाळावे. म्हणतात ना, कोंबडा आरवतो तेव्हाच सूर्य उगवतो. आता मोदींनी लॉकडाउन केले आहे. तेव्हा ‘करोना’ नियंत्रणात येईलच.

मंगेश पाटणकर

(लेखक: मंगेश पाटणकर, मुंबईस्थित आरोग्य क्षेत्रातील उद्योजक आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2020 8:45 pm

Web Title: special blog on corona virus and pm narendra modis lock down decision scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 BLOG : भाजी खाणे तुमच्या जिवापेक्षा महत्त्वाचे आहे का?
2 …अन् चंद्रावरुन आलेल्या त्या तिघांना २१ दिवस क्वारंटाइन करण्यात आलं
3 BLOG : क्लासरूम्स ते ग्लास रूम्स – शिक्षणातील सुधारणा
Just Now!
X