सुनीता कुलकर्णी
करोनाचे वाढतं संकट, त्यासाठी करावं लागलेलं लॉकडाउन, देशभरात ठिकठिकाणी अडकलेले, आपापल्या घरी जाऊ इच्छिणारे स्थलांतरित, गेले २६ दिवस आपापल्या घरात अडकून पडलेले लोक हे सगळं वास्तव रोजच वेगवेगळ्या मार्गांनी सगळ्यांच्या अंगावर येऊन आदळतं आहे. या सगळ्या प्रक्रियेतून होत असलेली घुसळण पाहता करोनानंतरचं जग निश्चितच वेगळं असणार आहे, याची जाणीव लोकसत्ताच्या ‘वेबसंवाद’ या कार्यक्रमात मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी करून दिली. आपल्या आसपास, समाजमाध्यमांवर जरा नजर टाकली तरी या उद्याच्या बदलत्या जगाची काहीशी झलक बघायला मिळते. आयुक्तांचा वेबसंवाद ही त्याचीच चुणूक होती. आयुक्त त्यांच्या कार्यालयात होते, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर त्यांच्या कार्यालयात होते आणि करोनासंदर्भात काय काम सुरू आहे, हे समजून घेण्यात रस असलेले प्रेक्षक आपापल्या घरी होते. तरीही हा वेबसंवाद उत्तम झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोन वेळा देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांशी करोनाविरोधातील लढ्यासंदर्भातील चर्चा करण्यासाठी जवळजवळ चार तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली.
हे झालं राजकीय पातळीवर. पण सर्वसामान्यांच्या पातळीवरही घरामध्ये अडकून पडावं लागल्यावर आता काय करायचं अशी हतबलता न दाखवता आपापल्या पातळीवर वाट काढत कामं मार्गी लावणं सुरू आहे. अनेक कार्यालयांमधील कर्मचारी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत कामं पुढे नेत आहेत. पुढच्या वर्षी जे विद्यार्थी दहावी बारावीची परीक्षा देणार आहेत, त्यांच्यासाठी व्हर्च्युअल वर्ग सुरू झाले आहेतच, शिवाय काही शाळा महाविद्यालयांनी इतरही विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल वर्ग सुरू केले आहेत.
या काळात आपलीही उमेद खचू द्यायची नाही, आपल्या ज्ञानाचा इतरांना उपयोग करून द्यायचा आणि त्यांचाही वेळ सत्कारणी लावायचा, या हेतूतून अनेकांनी वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. त्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप या समाजमाध्यमांचा, मोठ्या गटाला ऑनलाइन भेटता येईल अशा अॅप्सचा वापर केला जात आहे.
उदाहरणच द्यायचं तर खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण रोज फेसबुकवरून आकाशाची ओळख करून देत आहेत. लेखिका सोनाली लोहार फेसबुकवरून रोज एक लेखाचं वाचन सादर करतात. अनेकांनी समाजमाध्यमांच्या व्यासपीठावरून कथावाचन, कवितावाचनाचे उपक्रम राबवले आहेत. अभिनेत्री मुक्ता बर्वे, प्रिया बापट, उमेश कामत यांनी आपापल्या पातळीवर काही सादर केलं आहे. कुणी आपल्या गाण्याचा लाईव्ह शो करतं आहे. ‘बुक माय शो’ सारख्या व्यावसायिक व्यासपीठावरूनही वेगवेगळ्या गायकांचे खासगी तसंच वेगवेगळ्या बॅण्डचे लाइव्ह शो सादर होत आहेत. आपल्या मोबाइल वा लॅपटॉपवरून नोंदणी करून कुणीही हे कार्यक्रम घरबसल्या बघू ऐकू शकतो आहे.
आपल्या कामाशी संबंधित माणसांना प्रत्यक्ष भेटणं, कलाकारांना कला सादर करताना समोरासमोर अनुभवणं ही वेगळीच गोष्ट असली तरी करोना कहराच्या या काळात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संवाद साधणं, व्यक्त होणं, अनुभवणं यावर मार्ग काढले जात आहेत. युरोपात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रणांगणावर गेलेल्या पुरूषांची जागा घेऊन शहर चालवण्यासाठी घरोघरच्या स्त्रिया पुढे आल्या. युद्ध संपल्यावर त्या परत घरात गेल्या नाहीत, तर त्यांनी प्रगतीची नवनवी शिखरं गाठली. कुणी सांगावं, करोनामुळे आलेल्या मर्यादा ही इष्टापत्ती ठरून संवादाच्या अशा नवनव्या पद्धती तयार होतील. त्यातून वाचणारा वेळ, श्रम आणखी वेगळ्या गोष्टींसाठी वापरले जातील. ‘२१ व्या शतकातील २१ प्रश्न’ या आपल्या पुस्तकात युवाल नोह हारारी म्हणतात, “नजिकच्या भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढून जगात मोठी उलथापालथ होत जाईल आणि माणसाचं सगळं जगणंच बदलून जाईल.” करोनाच्या कहरामुळे ती वेळ आणखी जवळ तर आलेली नाही ना?