scorecardresearch

Premium

नसीरुद्दीन शाह – अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ की चित्रपटांवर टिप्पणी करणारे ‘हौशी’ समीक्षक?

चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ नट म्हणून आपली विचारधारा बाजूला ठेवून एखाद्या गोष्टीवर मत देणं हे नसीरुद्दीन यांच्याकडून अपेक्षित आहे

naseeruddin-shah-blog
फोटो : इंडियन एक्सप्रेस

दैव देतं अन् कर्म नेतं असा काहीसा प्रकार सध्या भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या बाबतीत घडताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. एकेकाळी समांतर चित्रपटांची दखल मुख्य प्रवाहातील लोकांना घ्यायला लावणारे, इरफान पासून नवाजूद्दीन पर्यंत कित्येकांचं प्रेरणास्थान असणारे, अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे नसीरुद्दीन शाह सध्या मात्र एक सुमार समीक्षक म्हणून लोकांसमोर येत आहेत अन् हे पाहून माझ्यासारख्या त्यांच्या कित्येक चाहत्यांना दुःख होत आहे.

यामागील कारण म्हणजे त्यांनी कोणत्याही चित्रपटावर केलेलं भाष्य नसून ते भाष्य करण्यामागची विचारधारा हे आहे. गेली अनेक वर्षं ज्या विचारधारेच्या लोकांनी या इंडस्ट्रीवर एकहाती राज्य केलं आज त्याच काही लोकांची नसीरुद्दीन शाह यांच्यासारखी अवस्था झालेली आहे. आपण तर फ्रीडम ऑफ स्पीचचा इतका पुरस्कार करतो मग एक दोन चित्रपट आपल्यापेक्षा हटके विचारसरणीचे आले तर त्यात काय बिघडतंय? पण नेमकी हीच गोष्ट नसीरुद्दीन शाह यांच्यासारख्या काही कलाकारांना खटकायला लागलेली आहे अन् ते त्यांच्या वक्तव्यातून अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

film director Kumar Shahani passed away
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
Sur Lagoo De Marathi Movie
Sur Lagu De Review : चांगल्या विषयाची मांडणी
sadhu meher passes away at mumbai residence
ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते साधू मेहर यांचे निधन

आणखी वाचा : “ते माझ्या आयुष्यातील खलनायक…” वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल नसीरुद्दीन शाह यांचा खुलासा

नसीरुद्दीन यांचे विचार नेमके काय आहेत हे साऱ्या जगाला ठाऊक आहेत अन् ते असूनही माझ्यासारखे कित्येक रसिक त्यांच्यावर आजही खूप प्रेम करतात, पण जेव्हा हाच कलाकार त्याच्या विचारधारेच्या कुबड्या घेऊन जनतेने डोक्यावर घेतलेल्या चित्रपटांविरोधात भाष्य करतो, समाजात घडणाऱ्या घटनांबद्दल भाष्य करतो तेव्हा मात्र कुठेतरी एक कलाकार म्हणून यांचं वागणं खटकायला लागतं. मध्यंतरी ‘द काश्मीर फाइल्स’ आणि तत्सम चित्रपटांवर जेव्हा नसीरुद्दीन यांनी भाष्य केलं तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देताना विवेक अग्निहोत्री यांनीदेखील एक पायरी खाली उतरून भाष्य केल्याचं आपल्याला चांगलंच आठवत असेल. त्यामुळे फ्रीडम ऑफ स्पीचचा नियम हा दोन्ही विचारधारांच्या लोकांना लागू होतो. जसं विवेक अग्निहोत्री यांना त्यांच्या चित्रपटातून भाष्य करण्याचा अधिकार आहे, तसाच नसीरुद्दीन शाह यांनादेखील त्यावर त्यांचं मत, अभिप्राय मांडायचा अधिकार आहेच.

मग नेमका प्रश्न कुठे येतो? नसीरुद्दीन यांच्यासारखा जाणकार व्यक्तीने प्रत्येक चित्रपटावर मत व्यक्त करणं ही गोष्ट बऱ्याच लोकांना खटकायला लागली आहे. अर्थात यात त्यांना प्रश्न विचारणाऱ्या मीडियाचाही तितकाच सहभाग आहे. प्रत्येक गोष्टीवर चर्चा व्हायलाच हवी या मताचा मी आहे, परंतु माझ्या मताशी सहमत नसणाऱ्या लोकांना एकदम चुकीचं आणि समाजविरोधी म्हणणं हेदेखील मूर्खपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं.

गेल्या काही महिन्यांपासून नसीरुद्दीन बहुतेक सगळ्याच सुपरहीट चित्रपटांबद्दल काही ना काही वक्तव्य करताना दिसत आहे. अगदी ‘द काश्मीर फाइल्स’, ‘गदर २’, ‘द केरला स्टोरी’पासून ‘पुष्पा’, ‘आरआरआर’सारख्या चित्रपटांबद्दल नसीरुद्दीन यांनी केलेली वक्तव्य ही तुम्ही ऐकली असतील, सोशल मीडियावर वाचली असतील. त्यातल्या त्यात ‘द काश्मीर फाइल्स’, किंवा ‘द केरला स्टोरी’ यासारख्या चित्रपटांना त्यांनी केलेला विरोध हा मी समजू शकतो कारण नसीरुद्दीन यांच्या विचारधारेच्या एकदम विपरीत हे चित्रपट आहेत. शिवाय या विषयांवरील त्यांची राजकीय भूमिकाही वेगळी असल्याचं आपण सगळेच जाणतो, पण ‘गदर २’, किंवा ‘आरआरआर’ व ‘पुष्पा’सारख्या तद्दन कमर्शियल चित्रपटांबद्दल नसीरुद्दीन यांनी भाष्य केलं ते मला काहीसं न रुचणारं होतं.

“पुरुषांची असुरक्षितता वाढत आहे. म्हणूनच ‘आरआरआर’, ‘पुष्पा’सारख्या चित्रपटांमधून पुरुषत्वावर अधिक जोर दिला जात आहे.” असं काहीसं वक्तव्य नसीरुद्दीन यांनी केलं आहे, इतकंच नव्हे तर या चित्रपटांची तुलना त्यांनी त्यांचा ‘ए वेन्सडे’सारख्या चित्रपटांशी केली आहे. “मी ‘आरआरआर’ पाहण्याचा प्रयत्न केला, पण मला तो पाहायला जमलं नाही. मी ‘पुष्पा’ पाहण्याचा प्रयत्न केला, पण मला जमलं नाही. पण मी मणिरत्नमचा चित्रपट पूर्ण पाहिला, कारण तो एक अतिशय सक्षम चित्रपट निर्माता आहे आणि त्याच्याकडे अजेंडा नाही.” असंही काहीसं नसीरुद्दीन म्हणाले आहेत.

नसीरुद्दीन यांना कोणता चित्रपट आवडतो किंवा कोणत्या चित्रपटावर त्यांनी भाष्य करावं? हा त्यांचा सर्वस्वी वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांच्या या स्वातंत्र्याचा आपण आदर करायलाच हवा. पण त्यांच्या ह्याच व्यक्तव्याचा तर्क लावून पाहायला गेलं तर नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या करकीर्दीत असे बरेच चित्रपट केले आहेत ज्यात ना धड मनमोहन देसाई स्टाइल मसाला होता अन् ना धड सत्यजित रे किंवा मणीरत्नम स्टाईल सक्षम कथा आणि पटकथा, तरीही त्यावेळी त्यांचे काही चित्रपट केवळ लोकांनी हीट करून दाखवले. ‘पुष्पा’ किंवा ‘आरआरआर’सारखे चित्रपट लोकांनी मोठे केले, याबरोबरच न भूतो न भविष्यती ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घातला.

यातील एकही चित्रपट तांत्रिक बाजूच्या बाबतीत कमकुवत नव्हता. सामान्यांना जे मनोरंजन अपेक्षित आहे ते या तीनही चित्रपटात अगदी ठासून भरलं होतं. यापैकी एखाद्या गोष्टीवर नसीरुद्दीन यांनी विस्तृतपणे भाष्य केलं असतं तर कदाचित प्रेक्षकांनीही ते तितक्याच गांभीर्याने ऐकलं असतं. पण नसीरुद्दीन यांनी त्यांच्या सोयीने याचा संबंध आपल्या विचारधारेशी जोडून ‘हायपरमस्क्युलिन’ आणि ‘जिंगोइजम’सारखे दोन गोंडस शब्द वापरुन या चित्रपटांचा अगदी पंचनामाच केला.

आणखी वाचा : “हा मूर्खपणा…” नसीरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ‘द केरला स्टोरी’च्या अभिनेत्री व दिग्दर्शकाचं वक्तव्य

आपण सतत पौष्टिक अन्न खाऊनसुद्धा पोट बिघडतं, त्यामुळे आपणही अधून मधून अरबट चरबट, जिभेचे चोचले पुरवणारं जंक फूड खातच असतो ना, मनोरंजनाच्या बाबतीतही तसंच आहे. सतत एकाच विचारधारेचे, सक्षम कथा-पटकथा असलेल्या आशयघन चित्रपटांचा ओव्हरडोस झाला की लोक काहीतरी हटके, वेगळे, त्यांच्या मनोरंजनाच्या चौकटीत बसणारे चित्रपट बघतात. यात समाज म्हणून किंवा इंडस्ट्री म्हणून आपण कुठे मागे पडत नसतो तर एक कलाकार म्हणून हा समतोल राखायचा असतो याचा आपल्याला कुठेतरी विसर पडलेला असतो आणि मग यामुळेच नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार त्याबाबतीत अशी वक्तव्यं करतात.

चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ नट म्हणून आपली विचारधारा बाजूला ठेवून एखाद्या गोष्टीवर मत देणं हे नसीरुद्दीन यांच्याकडून अपेक्षित आहे. उठसूट कुणीतरी विचारलं म्हणून प्रत्येक चित्रपटावर मत देऊन त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं हसं करून घेऊ नये इतकीच माझी अपेक्षा आहे. या समीक्षणापेक्षा ऊत्तमोत्तम आणि वेगळ्या भूमिका कशा साकारता येतील याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यायला हवं कारण अभिनय हा त्यांचा पिंड आहे, समीक्षण नव्हे. एक कलाकार म्हणून एका कलाकृतीबद्दल मत मांडणं अन् एखाद्या गोष्टीत मुद्दाम खुसपट काढून त्याबद्दल वक्तव्य करणं यात बरंच अंतर आहे. नसीरुद्दीन यांना खरंच आजच्या चित्रपटांचा इतका तिटकारा असेल तर त्यांनी खुशाल लहानपणी पाहिले तसे दारा सिंह यांचे चित्रपट पहावे, पण अशी वक्तव्यं करू नये, तुमच्यासारख्या नटाला ते शोभत नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Blog about naseeruddin shah latest controversial statements on bollywood movies avn

First published on: 29-09-2023 at 18:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×