डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील शोषित-वंचित समाजाच्या उत्थानासाठी होणाऱ्या चळवळीचे एक प्रेरणास्रोत. भारतापासून हजारो मैल दूर युरोप खंडातील हंगेरी देशात दुर्लक्षित रोमा समुदायासाठी सुरू केलेल्या शाळेला डॉ. बाबासाहेबांचे नाव दिले आहे. यातून बाबासाहेबांची कार्यप्रेरणा जगात सर्वदूर पसरल्याचे लक्षात येते. मी स्विडनला उच्च शिक्षण घेत आहे. युरोप खंडातील देशांचे अभ्यासदौरे करताना अनेक ठिकाणी भारत-युरोप तुलनात्मक बाबी समजून घेता येत आहेत. नुकतीच हंगेरी देशातील डॉ. आंबेडकर विद्यालयाला भेट दिली. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होत या देशातल्या ‘रोमा’ समुदायाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शाळेची सुरुवात करण्यात आली.

हंगेरी देशातील रोमा समुदाय हा दलितांप्रमाणे मध्य आणि पूर्व युरोपातला अत्यंत दुर्लक्षित आणि शोषित समाज आहे. गरिबीने ग्रस्त असलेल्या या समाजाचा मूलभूत अधिकारांसाठी कायमच संघर्ष सुरू असतो. दैनंदिन जीवनात या समुदायाला अनेक भेदभावांना सामोरे जावे लागते. रोमा समुदायात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी असून आर्थिक-सामाजिक मागासलेपण मोठ्या प्रमाणात दिसून येते.

१५०० वर्षांपूर्वी भारतातून युरोपात स्थलांतर करणारा रोमा समाज

हंगेरी देशात शासनस्तरावर व्यवस्थांतर्गत संघर्षाचे चटके रोमा समुदायाला सहन करावे लागत आहेत. शैक्षणिक व्यवस्थेतही रोमा समुदायातील विद्यार्थ्यांना भेदभावाला सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रभावी प्रयत्न होत नसल्याने हे विद्यार्थी कामाच्या शोधात असतात. या समाजाची भारतातील दलितांशी तुलना केली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे रोमा समुदायाचे भारताशी ऐतिहासिक नाते असल्याचे सांगितले जाते. काही संशोधनात्मक अभ्यासामधून असे लक्षात आले आहे की, रोमा हा भारतातल्या दलित समाजाचाच भाग असून साधारण १५०० वर्षांपूर्वी भारतातून त्यांनी युरोपात स्थलांतर केले आहे.

दोन्ही समुदायाच्या अनुवांशिक विश्लेषणाच्या निष्कर्षातून असे समोर येते की, रोमा समाजाचे पूर्वज हे बहुदा वायव्य भारतातील दलित, आदिवासी समाजातील असावे ज्यांना पूर्वी ‘डोमा‘ म्हणून संबोधले जायचे. ‘डोमा’ या शब्दाचा संस्कृत भाषेतील अर्थ ‘दलित किंवा दलित समाजातील व्यक्ती’ असा होतो. याच ‘डोमा‘ शब्दाचा अपभ्रंश त्यांच्या स्थलांतरानंतर ’रोमा‘ असे झाल्याचे सांगितले जाते. स्थलांतरानंतर येथीस वंश श्रेष्ठत्वाच्या परंपरेनुसार आणि रंगावरून होणाऱ्या भेदभावांचा या समाजाला सामना करावा लागला. पुढे हा समाज तेथील समाज व्यवस्थेतला एक कनिष्ठ आणि शोषित घटक ठरला.

Dr Babasaheb Ambedkar School Hungary 3
हंगेरी देशातील डॉ. आंबेडकर विद्यालय

हंगेरीचे माजी खासदार असलेले टिबोर डेरडाक आणि रोमा समाजातील यानोस ओरसोस यांनी या शाळेची सुरुवात केली. त्यांनी या समाजाच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य वाहिले आहे. पॅरिस प्रवासादरम्यान बाबासाहेबांचे पुस्तक त्यांच्या हाती लागले आणि तेथूनच त्यांना डॉ. आंबेडकरांच्या संघर्षाची आणि त्यांच्या सामाजिक विचारांची ओळख झाली. पुढे रोमा आणि दलितांच्या संघर्षात साम्यता आहे हे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी एकंदरीतच डॉ. आंबेडकरांच्या जीवन प्रवासाने प्रभावित होऊन भारतात येण्याचा निर्णय घेतला.

Dr Babasaheb Ambedkar School Hungary 5
हंगेरी देशातील डॉ. आंबेडकर विद्यालय

भारतात येऊन टिबोर डेरडाक यांनी दलित चळवळीतल्या लोकांशी, विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्या आणि बाबासाहेबांवर सखोल अभ्यास करण्यास सुरुवात केली. आंबेडकरांनी दलित-अस्पृश्य समूदायाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हाच रोमा समाजासाठी प्रेरक ठरेल हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी हंगेरीला परतून ‘जय भीम नेटवर्क‘ या सामाजिक आणि शैक्षणिक संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. आज या शाळेच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार या समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रभाविपणे रुजवला जातोय. बाबासाहेबांबरोबरच बुद्धाचा विचारही त्यांच्यापर्यंत पोहचवला जातोय. शाळेच्या संस्थापकांनी स्वतः नागपुरला येऊन बुद्ध धम्माची दिक्षा घेतली.

Dr Babasaheb Ambedkar School Hungary
हंगेरी देशातील डॉ. आंबेडकर विद्यालय

हंगेरीतील ही शाळा नववी ते बारावी वर्गापर्यंत आहे. तेथे एकूण १०० विद्यार्थी शिकत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, कुठल्याही शोषित समाजाच्या प्रगतीसाठी एक आदर्श त्यांच्यासमोर असायला हवा. डॉ. आंबेडकर यांचा आदर्श आम्ही या शोषित समाजासमोर ठेवतो आहे. या शाळेत आंबेडकरांचा जीवन प्रवास आणि संघर्ष सांगणारी अनेक पुस्तके स्थानिक भाषेत अनुवादित करण्यात आली आहेत. इतकंच नाही, तर या पुस्तकांचा शालेय अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातविरोधी चळवळी आणि भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात.

Dr Babasaheb Ambedkar School Hungary 4
हंगेरी देशातील डॉ. आंबेडकर विद्यालय

शाळेत बाबासाहेबांचे अनेक चित्र आणि विचार लावलेले आहेत. येथील वर्गखोल्यांनाही एतिहासिक संदर्भ असलेल्या शहरांची नावे दिलेली आहेत. जसे की, नागपूर. येथे आंबेडकर जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिनही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यात भारतीय दुतावासाचाही सहभाग असतो. भारतीय दुतावासाने बाबासाहेबांचा अर्धपुतळा शाळेला भेट दिला आहे. हा मध्य यरोपातला पहिला आंबेडकरांचा पुतळा ठरला. भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि त्यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनीही शाळेच्या बांधकामासाठी आर्थिक रूपात सहकार्य केले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : “देव पुजाऱ्यांचा की भक्तांचा?”; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न का विचारला?

या शाळेच्या माध्यमातून होत असलेले काम प्रभावी आहे. परंतु त्याचवेळी तात्पुरती पोटाची खळगी भरण्यासाठी आणि जगण्याचा आधार म्हणून मिळेल त्या कामाला प्राधान्य देणाऱ्या समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून, त्याची गोडी निर्माण करणे एक आव्हानात्मक काम आहे. या विद्यालयात विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारे शुल्क आकारले जात नाही. दर्जेदार शिक्षण, जेवण, शैक्षणिक साहित्य, वसतिगृह या सारख्या सगळ्या सोयी त्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. बारावीनंतर विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठीही त्यांना मदत केली जाते. सध्या त्याचे प्रमाण कमी असले, तरी दरवर्षी टक्केवारी वाढताना दिसते ही सकारात्मक बाब आहे.

Dr Babasaheb Ambedkar School Hungary 6
हंगेरी देशातील डॉ. आंबेडकर विद्यालय

कायमच अन्यायाचे चटके सहन करत आणि भेदभावाला सामोरे जात हा समाज जगत आला आहे. पण आंबेडकर विद्यालयाने त्यांच्यात सन्मानपूर्वक जगण्याचे सामर्थ्य निर्माण केले आहे. बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन शिकणारे हे विद्यार्थी येणाऱ्या काळात रोमा समाजाच्या विकासाचे शिलेदार होतील.

ॲड. बोधी रामटेके

(लेखक हे युरोपीयन कमिशनची इरास्मस मुंडूस शिष्यवृत्तीधारक वकील आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईमेल: bodhiforpath@gmail.com