– योगेश मेहेंदळे
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडतंय त्याला तोड नाही. एकूण मिळून चार पक्ष त्यातले किमान दोन किंवा कमाल तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. त्यासाठी जी काही धडपड चाललीय ती बघता हे पाच वर्षांच्या सत्तेसाठी चाललेले प्रयत्न नसून अब्जाधीश वडिलांच्या पश्चात त्यांच्या संपत्तीसाठी वारसदारांमध्ये चाललेली रस्सीखेच असं स्वरूप आलंय. ज्या पित्याच्या जीवावर हा खेळ चाललाय त्या मतदाराला हेच समजेनासं झालंय की आपण कुणी सत्ता ओरपायची यासाठी मतदान केलं की आपले सतत होणारे हाल कमी व्हावेत म्हणून प्रतिनिधी नेमण्यासाठी मतदान केलं.
लहान भाऊ की मोठा भाऊ, उदय होणारे राजे की मावळते राजे, मीच मुख्यमंत्री की तू नक्की नाही मुख्यमंत्री, शतप्रतिशत की शत अधिक क्षत क्षत, पाऊस पावला की पाऊस कोपला या आणि यासारख्या सवाल जबाबांमुळे रोज सकाळी उठल्यावर प्रश्न पडतो की हे स्वप्न तर नव्हतं ना? मत देणं हे कर्तव्य असेल तर त्या मताचा आदर राखणं हे कर्तव्य का नसावं? पण मतदानाच्या दिवसानंतर काडीचीही किंमत नसलेल्या मतदाराला हे विचारण्याची देखील सोय नाहीये. त्याच्या नशिबी फक्त बोटाला शाई लावण्यासाठी वाट बघणं आहे.
इसापनीतीत एक गोष्ट आहे. दोन बैलांची झुंज सुरू असते. शेताच्या बांधावरून बेडकांची पिल्लं मजा घेत असतात. त्या पिल्लांची आई येते नी सांगते, अरे बाळांनो चला इथून लांब चला. मुलं हट्ट धरतात नाही आम्हाला झुंज बघायचीय. कुठला बैल जिंकणार यावर आम्ही पैज लावलीय. अनेक पावसाळे बघितलेली आई म्हणते. अरे बैलांच्या झुंजीत कुठलाही बैल जिंकला तरी पायाखाली चिरडून बळी आपलाच जातो! सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली बैलांची झुंजही अशीच आहे. शिवाय इथं बैलांच्या पार्ट्याही फिक्स नाहीत. एकाच भावकीतले बैल झुंजतायत. समोरच्या पार्टीतले बैल एकमेकांना बळ देतायत. कधी कधी तर बैलांना हेच कळत नाहीये आपला प्रतिस्पर्धी कोण आहे? नी आपल्या बाजुचा कोण आहे. आपला म्हणून अंग घासायला जावं तर कधी शिंग मारील याचा भरवसा नाही. बरं झुंजीचा निकाल सांगणारे पंच तटस्थ आहेत याचीही शाश्वती नाही कारण त्यांचाही बैल झुंजीच्या रिंगणात आहे, त्यामुळे त्याला झुकतं माप मिळणार नाही याची हमी नाही. जो बैल स्थानिक पातळीवर चित खातोय त्याचा मालक देशपातळीवरील स्पर्धांच्या आयोजनाचा प्रमुख आहे, तो तिथं कसा वागेल याचा काही नेम नाही. झुंजीचे धडे शिकवणाऱ्या कुठल्याही बुकात नसलेल्या या परिस्थितीमध्ये कुठला बैल विजेतेपदाचा मुकुट मिरवेल हे सांगता येणं कठीण तितकंच मिळालेला मुकुट त्याच्या मस्तकावर किती काळ टिकेल हे सांगता येणंही कठीण.
असं सांगतात की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. सध्याचा पोरखेळ असाच सुरू राहिला तर शहाण्या माणसानं मतदान केंद्राची पायरी चढू नये अशी म्हण रूढ होणं अशक्य नाही. आयपीएलमध्ये खेळाडुंचा लिलाव करून संघ बनवले जातात, या निवडणुकीत एका संघानं बोली लावून दुसऱ्या संघांचे खेळाडू पळवले, दुसरी तिसरीतली मुलं तू खोटा तूच खोटारडा करत कट्टी घेतात हे ही आपण बघितलं, रस्त्यातल्या मारामारीत बाजुला उभा असलेला हात साफ करून पावर दाखवतो हे ही बघितलं, तो मी नव्हेच चा खेळ तर प्रभाकर पंतांना हेवा वाटेल इतक्या कसदार अभिनयानं झालेला आपण बघतोय, रात्रीसच काय दिवस-रात्र चाललेले खेळ आपण बघतोय, सुईच्या अग्रावर मावेल या महाभारताच्या दाखल्यापासून ते अफझलखानाच्या कोथळ्यापर्यंतची उजळणी तर इतक्यांदा झालीय की इतिहासाचं पुस्तक न वाचता वृत्तपत्र वाचून किंवा वृत्तवाहिन्या बघून पोरं गेली तरी पास होतील. बाणांच्या शय्येवर धारातीर्थी पडलेल्या पितामह भीष्मांची अवस्था दिलेल्या मुदतीनंतर फॅक्स पोचण्याइतपत अशी झालेलीही आपण बघितली.
ही सगळी लक्षणं राजकारणाचं गजकरण झाल्याची आहेत. हे असं अवघड दुखणं आहे की जे पटकन बरं होत नाही, दीर्घकाळ खाज सुटत राहते. आशा एकच आहे निदान चुकीचं ठरण्याची!