Marathi Natak Bhumika Review: टीव्ही सिरीयलमधे काम करणाऱ्या एका प्रथितयश नटाला, त्याच्या अभिनयाचा कस लागेल अशा ऐतिहासिक व्यक्तिरेखेची वैचारिक भूमिका मिळते. आयुष्यभर वाट पाहत असलेल्या या संधीचं सोनं करण्याच्या हेतूने तो नट नव्या भूमिकेचा मुळाबरहुकूम अभ्यास करू लागतो. त्यातून त्याला ते व्यक्तिमत्व आकळू लागते. त्या व्यक्तिमत्वाची मनोभूमिका आणि विचार त्याला पटू लागतात. केवळ कॅमेऱ्यासमोरच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यात देखील तो नट, ती महामानवाची भूमिका आपल्या परीने जगू लागतो. त्याच्या विचारांना धार अन आचरणात एक प्रकारचा ठामपणा येऊ लागतो. त्याच्या वर्तनातील या बदलाचा त्याच्या व्यावसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर कसा परिणाम होतो. केवळ आपलं अभिनय-सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी स्वीकारलेली एखादी भूमिका त्या नटाचं (आणि त्याच्या निकटवर्तीयांचं) आयुष्य कसं समृद्ध करते ह्यावर प्रकाश टाकणारे क्षितीज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “भूमिका” हे नाटक नुकतेच पाहिले. लेखक, दिग्दर्शक, सर्वच कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांची कामगिरी चंद्रकांत कुलकर्णीच्या नाट्य-लौकिकाला साजेशी जोरदार झालेली आहे.

वरवर पाहता, हे विवेक (सचिन खेडेकर) आणि उल्का (समिधा गुरु) हे जोडपे व कुहू (जाई खांडेकर) ही त्यांची कॉलेजवयीन मुलगी या त्रिकोणी कुटुंबाचं ड्रॉईंगरूम ड्रामा प्रकारचं नाटक वाटत असलं तरी या नाटकाचे आशयसूत्र आपल्या नजरेला दिसते त्यापेक्षा कितीतरी घट्ट आहे.

विवेकच्या आचार-विचारातील या स्थित्यंतराची जोवर त्याच्या कुटुंबाला झळ पोहोचत नाही. तोवर त्याचं कुटुंब सुशेगात असतं. मात्र जेव्हा त्यांची मोलकरीण शांताबाईच्या मुलीला आरक्षणामुळे मेडिकलला ऍडमिशन मिळते आणि विवेक-उल्काच्या मुलीला जास्त मार्क्स असूनही ऍडमिशन मिळत नाही. अशा बिकट प्रसंगी देखील विवेक आरक्षणाचे समर्थन करतो. तेव्हा त्या कुटुंबात संघर्षाची ठिणगी पडते.

नाटकात या तिघांच्या व्यतिरिक्त परिस्थितीचे चटके भोगलेला, भवतालाची जाण आणि उत्तम अभ्यास असलेला, सोमनाथ (सुयश झुंझुरके) हा धडपड्या, मनस्वी लेखक आहे. पुराणवादी मानसिकतेचे असलेले गुंड्यामामा (अतुल महाजन) आहेत आणि परिस्थितीशी समझोता केलेली, आपल्या मुलाबाळांना मिळत असलेल्या संधी केवळ बाबासाहेबांमुळेच मिळत असल्याबद्दल कृतज्ञभाव जपणारी शांताबाई (जयश्री जगताप) ही मोलकरीण आहे. परंतु रूढार्थाने या नाटकात कुणीही नायक किंवा खलनायक नाहीये.

अशा संवेदनशील विषयावर नाटक लिहिणे आणि सादर करणे ही तारेवरची कसरत, कुठल्याही दिशेने तोल जाऊ न देता लेखक, दिग्दर्शक आणि सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तमरित्या निभावली आहे.

या नाटकातील वाद-विवाद आणि संवाद हे मास्टरपीस आहेत. “आरक्षण हा एकलव्याला परत मिळालेला अंगठा आहे”, “ना मला उजवं व्हायचं आहे, ना डावं! ना मला राजकारणात जायचं आहे, ना चळवळीत, मला माणूस असल्याचं भान यायला लागलं आहे”, “माझ्यातला द्वेषभाव गळून पडतोय ते तुला खटकतं. कारण ते तुझ्या सोयीचं नाही म्हणून!” असे कित्येक संवाद हे निव्वळ टाळ्याखाऊ नसून त्यामागील अभ्यास आणि सच्चा भाव अनुभवाअंती अगदी आतून आल्याचे जाणवून देणारे आहेत. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे, “हे अस्वस्थ वर्तमानाचे खोदकाम आहे. प्रेक्षकांच्या मतांना विवेकावर घासण्याचं काम हे नाटक करतं.”

भाषा, प्रांत, धर्म, जात यांच्या हत्यारांना धार लावून देणारी दुकाने वाढत चालली असताना, टोकदार झालेल्या अस्मितांच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही बाजूंना समतोल विचार करायला लावणाऱ्या या नाटकाचे येणे महत्वाचे आहे. या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग व्हावेत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि विशेषतः संस्कारक्षम पिढीपर्यंत हा विचार पोहोचावा हीच सदिच्छा!

ताजा कलम : आपण बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात नाटक पाहायला बसलेलो असतो. आपल्या उजवीकडे बसलेली व्यक्ती एका विशिष्ट डायलॉगला टाळ्या वाजवते तेव्हा डावीकडील व्यक्ती कपाळावर आठ्या आणून बसलेली असते. डावीकडे बसलेली व्यक्ती एका विशिष्ट डायलॉगला टाळ्या वाजवते तेव्हा उजवीकडील व्यक्ती अस्वस्थ झालेली दिसते. आपण अशा काळाच्या कात्रीत, ही दरी कधी बुजेल या चिंतेत, हाताची नखं कुरतडत अस्वस्थपणे बसलेलो असतो!