महाविद्या ही संकल्पना तांत्रिक पंथात अत्यंत महत्त्वाची आहे. या संकल्पनेत देवींच्या अनेक रूपांपैकी दहा रूपांचे विशेष महत्त्व आहे. या दहा रूपांचे दश महाविद्या असे वर्णन केले जाते. ही सर्व दहा रूपे देवी पार्वतीचीच मानली जातात. कौल तंत्रात या देवीच्या दहा रूपांचे सविस्तर वर्णन आढळते. यात दहा देवींच्या उपासना पद्धतींचा विस्तृत समावेश आहे. या दहा महाविद्यांमध्ये तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धुमावती, बगला, मातंगिनी, कमलात्मिका आणि काली या देवींचा समावेश होतो. या दहा महाविद्यांच्या उत्पत्तीमागे सतीच्या कथेचा दाखला दिला जातो. दुर्गासप्तशती, वृहद्धर्म पुराणामध्ये दश महाविद्यांच्या उत्पत्तीच्या कथा सापडतात. नवरात्रीच्या निमित्ताने या दश महाविद्यांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.

तारा

तारेच्या उत्पत्तीचा संदर्भ रुद्रमालय या तंत्र ग्रंथाच्या १७ व्या अध्यायात सापडतो. ताराला निलासरवाई आणि उग्रतारा या नावाने देखील ओळखले जाते. ती गडद निळ्या रंगाची असते. तिचा डावा पाय प्रेताप्रमाणे पहुडलेल्या शिवाच्या छातीवर असतो. ती उंचीने लहान दाखवतात, तसेच ती व्याघ्रचर्म परिधान करते, ती चतुर्भुज असून तिला तरुण दर्शविण्यात येते. तिला तीन डोळे असतात, आणि तिने तिची जीभ तोंडाबाहेर काढलेली असते. तसेच ती स्मशानात उभी असते. तिच्या चेहऱ्यावर हास्य असते. ती तिच्यातच मग्न असून, तिच्या एका हातात निळे कमळ, तर इतर दोन हातात शस्त्रे असतात आणि तिसर्‍या हातात कवटीचे भांडे असून मौल्यवान अलंकारांनी ते सजलेली असते. तिच्या अंगावर साप आहेत. तिला ‘तारानी’ म्हणूनही ओळखले जाते. तिचा ध्यान मंत्र अनेक तांत्रिक ग्रंथांमध्ये आत्मा, संपत्ती, शिक्षण इत्यादींवर सामर्थ्य मिळविण्यासाठी आहे, असा संदर्भ आढळतो. जैन आणि बौद्ध पंथात देखील तिचा उल्लेख सापडतो.

आणखी वाचा : Sharadiy Navaratri 2023: दुर्गा पूजा इंग्रजांच्या काळात लोकप्रिय का झाली?

षोडशी

षोडशी तंत्रामध्ये षोडशीची ओळख त्रिपुरा सुंदरी म्हणून करण्यात आली आहे. तिला चार हात आहेत आणि तिच्या हातात बाण, धनुष्य, पाश, अंकुश ही आयुधे असतात. तिचा रंग लाल आहे, ही देवी अत्यंत सुंदर आणि तेजस्वी आहे. ती सूर्याच्या कक्षेत उभी असल्याचेही वर्णन तिच्या स्तुतीस्तोत्रांमध्ये आढळते. काही वेळेस तिच्या हातात ग्रंथ, जपमाळ दाखविण्यात येतात, तर दोन हात अभय आणि वरद मुद्रेत असतात. तिची परा आणि अपरा म्हणूनही पूजा केली जाते.

भुवनेश्वरी

भुवनेश्वरीचा रंग उगवत्या सूर्यासारखा आहे. तिने कपाळावर चंद्रकोर आणि डोक्यावर मुकुट धारण केला आहे. ती तीन डोळ्यांची आहे आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित असते. तिचे दोन हात अभय आणि वरद मुद्रेत असतात. ती मौल्यवान दागिन्यांनी सजलेली आहे. ती कमळाच्या सिंहासनावर विराजमान आहे. तिचे वर्णन अनुक्रमे लाल आणि निळ्या रंगात सौभाग्य भुवनेश्वरी आणि माया भुवनेश्वरी अशा दोन रूपात केलेले आहे. ती जगाची रक्षक आहे. तिचे तीन डोळे इच्छा, क्रिया आणि ज्ञानशक्ती दर्शवतात.

भैरवी

भैरवी किंवा त्रिपुरा भैरवी साधकांचे सर्व प्रकारचे संकट पुसून टाकते, भा हे अक्षर भरण किंवा देखरेखीचे प्रतीक आहे, रा म्हणजे रमण आणि वा वामनासाठी किंवा विनाश किंवा मुक्तीच्या मार्गाने जाणे किंवा मुक्त होणे यासाठी वापरले जाते. तिचे तेज हजार उगवत्या सूर्यांच्या तेजाशी साम्य दर्शवणारे आहे. तिचे तीन डोळे लाल कमळासारखे दिसतात आणि तिच्या रत्नजडित मुकुटात चंद्र चमकतो. तिचे वस्त्र लाल आहे. तिच्या गळ्यात मुंडमाळा आहे. तिचे स्तन रक्ताने माखलेले आहेत. तिच्या एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात पोथी आहे. ती बौद्ध तांत्रिक धर्मातील भैरवीशी नाते सांगते.

आणखी वाचा : Shardiya Navratri 2023: भारतातील शक्ती पूजेचा (देवी) सर्वात प्राचीन पुरावा कोणत्या शतकातील? 

छिन्नमस्ता

छिन्नमस्तेला त्रिगुणमयी म्हणून ओळखले जाते. ती अनेक सूर्यांच्या तेजाने झळाळते असे तिचे वर्णन केले जाते. तिचे केस विखुरलेले असतात आणि ती विविध प्रकारच्या सुगंधी फुलांनी सुशोभित असते. तिच्या उजव्या हातात तलवार आहे आणि तिच्या गळ्यात मुंडमाळा आहेत. ती निर्वस्त्र आणि भितीदायक दिसते, असे वर्णन धार्मिक ग्रंथांमधून येते. तिचा उजवा पाय समोर आहे तर डावा पाय थोडा मागे असतो. ती पवित्र धागा म्हणून नाग धारण करते. तिच्या शेजारी डाकिनी आणि शंकिनी सारख्या योगिनी असतात.

धूमावती

शत्रूंचा नाश करण्याच्या उद्देशाने धूमावती देवीचे आवाहन केले जाते. ती फिकट, थरथरणारी आणि रागावलेली दर्शवितात. ती उग्र आहे, तिची वस्त्रे अशुद्ध आहेत आणि तिचे केस मोकळे आहेत. ती विधवा असून तिला फक्त चार दात आहेत. ती ज्या रथावर स्वार होते त्या रथाच्या झेंड्यावर कावळा दाखवला जातो. ती उंच आणि वृद्ध आहे; ती कठोर दिसते. तिने एका हातात सूप धरले आहे. दुसरा हात वरद मुद्रेत आहे. ती नेहमीच भुकेलेली आणि तहानलेली, भयानक आणि भांडणारी असते.

बगलामुखी

श्री तत्वनिधिनुसार, बगलामुखी पिवळ्या रंगाची आणि तीन डोळ्यांची आहे. तिच्या चार हातात त्रिशूळ, पेला, गदा आणि शत्रूची कापलेली जीभ आहे. ती सुंदर स्त्रीच्या स्वरूपात असून विविध अलंकारांनी सुशोभित असते.

मातंगी

मातंगिनी ही राजवंशाची देवी आहे. ती राक्षसांना पराभूत करणारी, शांतता आणि समृद्धी स्थापित करणारी देवता आहे. मातंगिनी तंत्रात, तिचे वर्णन गडद करण्यात आले आहे, तिच्या मालेमध्ये पांढरी चंद्रकोर आहे. ती एका चमकदार रत्नजडित सिंहासनावर विराजमान आहे. तिच्या हातात फास, तलवार, ढाल आणि हत्तीदंत आहे. ती शिवप्रमाणे चंद्रकोर धारण करते. उच्छिस्ता मातंगिनी, राजा मातंगिनी, सुमुखी मातंगिनी, वस्य मातंगिनी आणि कर्ण मातंगिनी अशी मातंगिनीची विविध रूपे आहेत.

आणखी वाचा : ‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे नेमके काय? यापासून स्वत:ला कसे वाचवाल?

कमलात्मिका

कमलात्मिका महालक्ष्मीचा अवतार आहे, तिला श्री म्हणूनही ओळखले जाते. ती सोनेरी रंगाची आहे, चार पांढरे हत्ती त्यांच्या उंच सोंडेत सोन्याचे अमृताचे भांडे धरून तिला आंघोळ घालतात. तिने तिच्या वरच्या दोन हातात दोन कमळे धारण केली आहेत. तिने रत्नांनी चमकणारा मुकुट परिधान केलेला असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काली

काली ही देखील शिवावर स्वार झालेल दर्शवितात. ती स्मशानभूमीत असते. तिचा रंग काळा आहे, कारण ती सर्व रंगांची बीज अवस्था आहे आणि ती तमोगुणाचे प्रतिनिधित्व करते. लाखो चंद्रांचा प्रकाश एकत्र आल्याने आकर्षक दिसते, असे तिचे वर्णन ग्रंथकार करतात. तिचे रूप भयंकर असले तरी ती वरदान देणारी ती सौम्य आई आहे. तिने मुंडमाला परिधान केलेली आहे. ती शक्ती, बुद्धी, रिद्धी आणि सिद्धी यांचे मूर्त रूप आहे. तिला दक्षिणकाली, श्यामकली, हृदयकाली आणि रक्षाकाली या नावाने ओळखले जाते.