धवल कुलकर्णी
‘स्वच्छतागृहातून आल्यावर हात धुवा’, ‘उघड्यावर शौचास जाऊ नका’, ‘प्रत्येक घरांमध्ये संडास हवा’, ‘स्वच्छ भारत अभियान’. अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर पडल्या असतील किंवा आपण वाचल्या असतील. मात्र महाराष्ट्रात दोन हजार वर्षांपूर्वी राहणाऱ्या लोकांनाही स्वच्छतेचं वेड होतं असं सांगितलं तर कदाचित ही पुरातन संस्कृती आपल्याला काहीतरी सांगू पाहते हे अनेकांना जाणवेल.
तेर मुंबईपासून ४५० किलोमीटर दूर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातले एक गाव. एकेकाळची सातवाहन कालीन पुरातन व्यापारी पेठ. भारतातून परदेशात म्हणजे रोमसारख्या साम्राज्यासोबत चालणारा व्यापार हा तेर मार्गे होत असे. हे प्राचीन नगर चिनी प्रवासी ह्युएन त्सांग त्यांच्या लेखनातही आढळते. नगरी इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात ते इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत पूर्व सातवाहन, सातवाहन, उत्तर सातवाहन ते वाकाटकांच्या कालखंडापर्यंत वसली होती. तर खऱ्या अर्थाने उन्नतीच्या शिखरावर पोहोचले ते सातवाहनाच्या काळात पण नंतर बदललेले शुष्क हवामान व दुष्काळ यामुळे ही प्राचीन संस्कृती हळूहळू लयाला गेली.
तेर या गावाला महाराष्ट्र शासनाच्या वस्तुसंग्रहालय व पुरातत्व खात्याच्या संचालनालयाच्या रामलिंग अप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना एक विटांच्या बांधकामाचा आड सापडला. त्याच्याजवळ एक शोष्खड्डा म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचं झालं तर soak pit सुद्धा आढळला.
“हा शोष्खड्डा फार इंटरेस्टिंग आहे. याचा वापर कदाचित त्या काळात संडास किंवा मोरी च्या सांडपाण्याच्या निचऱ्याची साठी होत असावा. असाच एक शोष्खड्डा २०१४-१५ च्या दरम्यान तेरमध्ये झालेल्या उत्खननांमध्ये सापडला होता” अशी माहिती वस्तुसंग्रहालयाचे असिस्टंट क्युरेटर अमोल गोटे यांनी दिली. या विटांच्या अडात अजूनही उत्खनन सुरू आहे आणि त्याचा तळ सापडणे बाकी आहे. काळया गाळाच्या मातीच्या खालच्या बाजूला सापडलेला या आडामध्ये मणी, भाजलेल्या मातीच्या सुपारीच्या आकारातले मणी, शिंपल्यातून बनवलेले मणी, मातीच्या भांड्यांचे अवशेष आणि काही प्राण्यांची हाडे सापडली आहेत. पाण्यासाठी वापर होत असलेल्या या विहिरीचा नंतरच्या काळामध्ये नको त्या गोष्टी टाकण्यासाठी उपयोग झाला असावा.
हा शोष्खड्डा एक्सपोज करून ठेवण्यात आला आहे. सिंधू संस्कृती मधल्या या पुरातन शहरांमध्ये जसे की मोहेंजोदारो अशाच प्रकारच्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध होती. नवलाची गोष्ट अशी की पेअरमधली प्राचीन संस्कृती स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असली तरी आजची त्याची अवस्था नाही चिरा नाही पणती अशी आहे.
तेरला दहा टेकड्या होत्या ज्यांच्याखाली उत्खनन केल्यावर बरेच पुरातत्वीय अवशेष सापडले असते. दुर्दैवाने यातल्या तीन टेकड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. कारण, अनेक मंडळींनी ही माती काढून त्याचा उपयोग बांधकाम आणि वीट भट्टी यांच्यासाठी केला आहे. काहींनी त्याचा खत म्हणून वापर केला. तेरमध्ये उत्खनन केलेल्या एका पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते यामुळे अनेक अनमोल असे ऐवज, उदाहरणार्थ भांडी, दागिने, खेळणी व बाहुल्या एक तर नष्ट झाले असतील किंवा त्यांची विक्री झाली असेल. समाज या महत्त्वाच्या ऐवजला कदाचित कायमस्वरूपी मुकला असेल हे वेगळे सांगायला नको.
आज तेरला एकूण सात टेकड्या शिल्लक आहेत. कोट, बैराग, कैकाडी, मुलानी, महार, रेणुका आणि चहुत्रे. यापैकी फक्त रेणुका कोट व बैराग येथे उत्खनन झाले आहे. अन्य ठिकाणी नाही. उत्खनन मोरेश्वर दीक्षित, शा. बा देव व माया पाटील यांच्यासारख्या तज्ज्ञांनी केलं आहे. इथे उत्खनन केलेले काही पुरातत्त्व शास्त्रज्ञ सांगतात की बरेचदा या टेकड्यांवर सकाळी काही मंडळी प्रातर्विधी पण करतात. म्हणजेच जी समज दोन हजार वर्षांपूर्वी इथे वास्तव्य करणाऱ्या लोकांमध्ये होती त्याचा अभाव आता जाणवतो हे वेगळे सांगायला नको.
त्यामुळे या टेकड्यांची अवस्था आज फार भयंकर आहे. त्यांचे संरक्षण करून मातीचे उत्खनन रोखण्यासाठी पावले उचलणे प्रचंड गरजेचे आहे. वेळेला प्राचीन काळातला हा शोष्खड्डा आपल्या आपल्या पूर्वजांच्या स्वच्छतेवर च्या प्रेमाबाबत बरंच काही सांगतो. त्याच्यातून आपण धडा घेतला तर खूप बरे होईल…