The Hunt – The Rajiv Gandhi Assassination Case Review : सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्म वर The Hunt – The Rajiv Gandhi Assassination Case ही सात भागांची वेब सीरिज आलेली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या तपासाची कहाणी सांगणारी ही वेब सीरिज तथ्यांशी प्रामाणिक असूनही उत्कंठावर्धक आणि मनोरंजक झालेली आहे.
राजीव गांधीच्या हत्येच्या दिवसापासून सुरू होणारी ही कथा हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या कॅमेऱ्याच्या आधारे गुन्हेगारांचा माग काढीत काढीत, LTTE या अतिरेकी संघटनेचा एकेक मोहरा ताब्यात घेत नव्वदाव्या दिवशी या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार असलेल्या शिवरासन आणि शुभा ह्यांच्या मृत्यूने संपते.
घटनेशी राखलेला सच्चेपणा हे या सिरीजचे वैशिष्ट आहे. अभिनेते न वाटता अस्सल तपास अधिकारी, राजकीय नेते अन् LTTE चे अतिरेकी वाटतील अशा अतिशय चपखल अभिनेत्यांची कास्टिंग हे या सिरीजचे दुसरे वैशिष्ट! नागेश कुकनूरचे संयत दिग्दर्शन आणि पटकथा अत्यंत नेटकी असल्याने इथे निवेदनाची गरज भासलेली नाहीये. त्यामुळे या सिनेमाची डॉक्युमेंट्री होण्याचा धोका टळलेला आहे.
यात कुणीही सुपरकॉप नाहीये. कुणाच्या व्यक्तिरेखेला उगाच अर्कचित्रात रंगवलेले नाहीये. कारण नसताना कॉन्स्पिरसी थियरी मांडलेली नाहीये. नाट्य वाढविण्यासाठी खोटे प्रसंग रचलेले नाहीयेत. सस्पेन्ससाठी ढॅनढॅन पार्श्वसंगीत वाजविलेलं नाहीये. कॅमेऱ्याचे चित्रविचित्र अँगल्स लावलेले नाहीयेत. यातील तपास अधिकारी, पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगार देखील हाडामांसाची माणसे आहेत. ज्या तपास अधिकाऱ्यांच्या भोवती ही कथा फिरते ते सगळेजण आपल्या व्यवस्थेच्या चौकटीत, राजकीय- सामाजिक दबाव झेलत, आंतर-विभागीय राजकारण पचवत, आपापली ड्युटी जमेल तितकी प्रामाणिकपणे बजावत आहेत.
अमित सियाल हा अभिनेता आपल्या आजवरच्या कर्तृत्वाला साजेसे काम करतोच आणि इतरही सर्वच कलाकारांनी एकदम उत्तम कामं केलेली आहेत. (आमचा मित्र अमोल देशमुख याने देखील बंगलोरच्या पोलिस आयुक्ताच्या छोटेखानी भूमिकेत ए-वन काम केलंय)
सिनेमातील आवडलेले दोन प्रसंग:
१) पंतप्रधान नरसिंह राव यांच्यातील तल्लख राजकारणी माणूस दाखविणाऱ्या एका प्रसंगात राव तपास अधिकाऱ्यांना सांगतात की, तुम्ही मुख्य संशयित म्हणून शिवरासनचे नाव प्रसिद्ध करून चूक केलेली आहे. उद्या तो तुम्हाला सापडला नाही तर तुमची आणि पर्यायाने देशाची बदनामी होईल. त्या ऐवजी तुम्ही श्रीलंकास्थित LTTE नेता प्रभाकर यांचे नाव घ्यायला हवे होते.
२) शिवरासन आणि शुभा यांचा मृत्यू झाल्यानंतर एक तपास अधिकारी म्हणतो की, या गुन्हेगारांकडून कुठलीही माहिती न मिळता त्यांचा अंत होण्यापेक्षा ते दोघेही पळून श्रीलंकेला गेले असते तरी बरे झाले असते. म्हणजे निदान त्यांना पकडून त्यांच्याकडून या हत्येमागील पूर्ण सत्य कधीतरी जाणून घेता येण्याची आशा तरी जिवंत राहिली असती.
राजीव गांधीच्या हत्याकांडावर आजवर आलेल्या सर्व सिनेमांपेक्षा ही वेब सीरिज खूपच उजवी आहे. जरूर पहा.