‘मित्र’पक्षाच्या खेळीने आठवले गटात अस्वस्थता

मुंबईत रिपब्लिकन पक्षाला हाताशी धरून आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले असलेल्या नायगाव, माटुंगा, धारावी, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, कांदिवली, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द इत्यादी भागांत मुसंडी मारण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यामुळे खुद्द रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचे मुंबईतील झोपटपट्टय़ांच्या भागात वर्चस्व आहे. १९९२ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करून रिपब्लिकन पक्षाचे बारा नगरसेवक याच विभागातून निवडून आले होते. त्यांनतरच्या निवडणुकांमध्येही कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी तर कधी डाव्या पक्षांशी आघाडी करून दोन-तीन नगरसेवक निवडून आणण्यात पक्षाला यश मिळाले आहे. यापूर्वी आठवले यांच्याशी हातमिळवणी केल्याने त्याचा काँग्रेस व राष्ट्रवादीलाही फायदा झाला होता.

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीपासून मात्र आठवले यांनी शिवसेना व भाजपशी युती केली. त्यामुळे चेंबूर, रमाबाईनगर, गोंवडी, मानखुर्द, मुलुंड इत्यादी भागात पहिल्यांदाच निळ्या झेंडय़ाबरोबर भगवे झेंडेही निर्धास्तपणे फडकताना दिसले. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाला त्याचा अजिबात फायदा झाला नाही, मात्र आठवलेंमुळे भाजप व शिवसेनेला राजकीय लाभ मिळाला.

या वेळी रिपाइंने भाजपबरोबर युती केली. मात्र त्या आधीपासूनच रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असणाऱ्या भागातील प्रभागांमधून निवडणूक लढविण्याची भाजपने तयारी केली होती. त्यानुसार युतीच्या निर्णयाची वाट न बघता, भाजपच्या उमेदवारांनी अर्जही दाखल केले. या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी बैठक झाली व भाजपने रिपाइंला २५ जागा देण्याचे जाहीर केले. मात्र त्यांतील रमाबाईनगर, कामराजनगर, लालडोंगर, नायगाव, दामूनगर या भागांतील सहा जागा भाजपच्या उमेदवारांनीच अडवून ठेवल्या आहेत. अन्य भागांतील जागाही भाजपनेच घेतल्याने रिपब्लिकन कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. रिपब्लिकन पक्षाला हाताशी धरून आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले असलेल्या भागात मुसंडी मारण्याची भाजपची ही रणनीती असल्याची चर्चा आहे. भाजपच्या या खेळीने आठवले गटाचे नेते आणि कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत. तर आठवलेप्रणीत रिपाइं व भाजप युतीच्या विरोधात अन्य रिपब्लिकन गटांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.