पाच वर्षांपूर्वीची आश्वासने सेनेच्या यंदाच्या जाहीरनाम्यात

शिवसेना-भाजप-रिपाइं युतीने पालिकेच्या मागील निवडणुकीत २४ तास पाणीपुरवठय़ापासून सफाई कामगारांना हक्काचे घर देण्यापर्यंत अनेक आश्वासने दिली. पण गेल्या पाच वर्षांमध्ये त्यापैकी अनेक आश्वासनांची पूर्तता होऊ शकलेली नाही. मुंबईकरांना कामे ‘करून दाखविण्या’चे युतीचे आश्वासन पोकळ ठरले असून आता युतीच्या जुन्या जाहीरनाम्यातील पूर्ण होऊ न शकलेल्या काही आश्वासनांची पुढील पाच वर्षांमध्ये पूर्तता करण्याचे आश्वासन शिवसेनेने आगामी पालिका निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. त्यामुळे युतीच्या ‘विसरनाम्या’ला शिवसेनेच्या जाहीरनाम्यात उजाळा दिल्याची चर्चा मुंबईकरांमध्ये सुरू झाली आहे.

[jwplayer k7pRwlU6]

शिवसेना-भाजप-रिपाइं युतीने २०१२ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर भाजपला दूर ठेवत शिवसेनेने सोमवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. शिवसेनेच्या या जाहीरनाम्यामध्ये मागील निवडणुकीत युतीने दिलेल्या आश्वासनांना पुन्हा एकदा उजाळा देण्यात आला आहे. युतीने दिलेल्या आश्वासनांची गेल्या पाच वर्षांमध्ये पूर्तता होऊ शकलेली नाही. त्यामुळे ही आश्वासने पुन्हा एकदा शिवसेनेने नवा मुलामा चढवून आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केली आहेत.

मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन युतीकडून सातत्याने देण्यात येत होते. या आश्वासनाची शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात पुन्हा री ओढली आहे. पालिकेच्या दोन-तीन विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग महापालिकेने सुरू केला आहे. पण मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईकरांची वर्षभर तहान भागविण्यासाठी पालिकेला सर्वस्वी पावसावरच अवलंबून राहावे लागते. मध्य वैतरणा प्रकल्पातून मुंबईला दरदिवशी ४५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी       उपलब्ध झाले असले तरी सध्याचा पाणीपुरवठा मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पुरेसा नाही. असे असताना पुन्हा एकदा शिवसेनेने चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे वचन मुंबईकरांना दिले आहे.

पालिकेच्या सेवेमध्ये अवघे आयुष्य काम केल्यानंतर सफाई कामगारांना सेवा निवासस्थान सोडावे लागते आणि घर घेण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांना मुंबईबाहेरची वाट धरावी लागते. त्यामुळे सफाई कामगारांना मुंबईत हक्काचे घर देण्याचे गाजर मागील निवडणुकीतही युतीने दाखविले होते. मात्र केवळ एका ठिकाणी मोजक्या कामगारांना घरे मिळाली. उर्वरित हजारो कामगार हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. असे असतानाही आता शिवसेनेने जाहीरनाम्यात सफाई कामगारांबरोबर पालिका कर्मचाऱ्यांसाठी ‘घरकुल योजने’ची घोषणा केली आहे.

सफाई कामगारांच्या आरोग्यासाठी युतीच्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणा लोणकढी थापा ठरल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये कचरा उपसणाऱ्या सफाई कामगारांना नियमितपणे हातमोजे मिळू शकलेले नाही. असे असताना आता शिवसेनेने सफाईची कामे सुरक्षितपणे करण्यासाठी अत्याधुनिक साहित्य देण्याची घोषणा केली आहे.

मुंबईकरांना चांगले रस्ते देण्याचे आश्वासन युतीने मागील निवडणुकीत दिले होते, पण गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबईकरांच्या नशिबी खड्डेमय आले. आता पुन्हा एकदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण करून खड्डय़ांचा प्रश्न निकालात काढण्याचे वचन शिवसेनेने दिले आहे. पावसाळ्यात जलमय होणाऱ्या सखल भागातील पाण्याचा निचरा जलदगतीने करता यावा यासाठी ब्रिमस्टोवॉड प्रकल्पांतर्गत मुंबईत आठ ठिकाणी उदंचन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामांचाही युतीने आपल्या वचननाम्यात उल्लेख केला होता. त्यापैकी मोगरा आणि माहुल उदंचन केंद्र अद्याप उभी राहू शकलेली नाहीत. ही उदंचन केंद्रे पुढील पाच वर्षांमध्ये उभारण्याचा निर्धार शिवसेनेने आपल्या वचननाम्यात व्यक्त केला आहे. मुंबईतील पर्यटनक्षेत्रांचा विकास, उद्यानांची पुनर्रचना, मैदानांची उभारणी, मलजल प्रक्रिया केंद्र, जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन आदी जुन्याच घोषणांना शिवसेनेने आगामी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्थान दिले आहे.

[jwplayer Iz0EPYRx]