भ्रष्टाचाराचे कुरण असलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांसह नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराबाबत खुलेआम चर्चा होत असली तरी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मार्च २०१२ पासून पाच वर्षांच्या कालावधीत फक्त सात लाचखोर नगरसेवकांविरुद्ध कारवाई करता आली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अपक्ष असलेल्या अनुक्रमे दोन नगरसेवकांचा समावेश आहे. या सातपैकी तिघांची निर्दोष सुटका झाली आहे, तर उर्वरित चार प्रकरणांत चौकशी सुरू आहे.

गोवंडीतील १३० क्रमांकाच्या प्रभागातील अपक्ष नगरसेवक शेख मोहम्मद सिराज शेख यांच्यावर २५ जुलै २०१२ मध्ये लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. मात्र लाचेच्या आरोपातून विशेष सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मालाड येथील ४४ क्रमांकाच्या प्रभागातील अपक्ष नगरसेवक सिरील डिसोझा यांच्यावर १० फेब्रुवारी २०१४ आणि ३१ ऑगस्ट २०१५ अशा दोन वेळा गुन्हे दाखल झाले. त्यांच्याविरुद्धचे दोन्ही खटले प्रलंबित आहेत. भाजपचे महंत चौबे (प्रभाग क्र. १७१- संगमनगर, वडाळा), अ‍ॅड. ज्ञानमूर्ती शर्मा (प्रभाग क्र. ४०- दिंडोशी) आणि राजश्री पालांडे (प्रभाग क्र. १४४- चेंबूर) या तिघांवर लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाले आहेत.

यापैकी महंत चौबे यांची निर्दोष सुटका झाली आहे, तर उर्वरित दोघांवरील खटले प्रलंबित आहेत. मनसेच्या सुरेश आवळे (प्रभाग क्र. १२६- रमाबाई नगर) आणि श्रद्धा पाटील (प्रभाग क्र. १८१- माहीम) यांच्यावरही लाचप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. यापैकी आवळे यांना सत्र न्यायालयाने दोषमुक्त  केले आहे. पाटील यांच्यावरील चौकशी प्रलंबित आहे.

याशिवाय माजी नगरसेवक मोहन लोकेगावकर यांच्यावर ऑगस्ट २०१२ मध्ये लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी अद्याप खटला प्रलंबित असल्याचे माहिती अधिकार कायद्यांतर्गत जितेंद्र घाडगे यांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय माजी नगरसेवक अलीजान सुलेमान शेख यांच्यासह विद्यमान नगरसेवक मोहसिन हैदर (प्रभाग क्र. ६१- गिल्बर्ट हिल, अंधेरी पश्चिम), ललिता अण्णामलई (प्रभाग क्र. १५५- जरीमरी, कुर्ला) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यमान नगरसेविका रुपाली रावराणे यांचे पती अजित रावराणे यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेबाबत उघड चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

  • लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मार्च २०१२ पासून पाच वर्षांच्या कालावधीत फक्त सात लाचखोर नगरसेवकांविरुद्ध कारवाई करता आली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अपक्ष असलेल्या अनुक्रमे दोन नगरसेवकांचा समावेश आहे.