मुंबईसह राज्यात भाजपने दणदणीत यश संपादन केले असून विकास, पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभार या मुद्दय़ावर भाजपची नौका या निवडणुकीतून पार झाली आहे. शिवसेनेने युती तोडूनही नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबवून आणि ‘िजकून येण्याची क्षमता’ हा एकच निकष ठेवून सर्वपक्षीयांना भाजपची दारे खुली करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावले टाकली. सर्व मंत्र्यांवर विभागवार जबाबदारी सोपवून सूत्रसंचालन केल्याने भाजपला विजयाचे ध्येय साध्य करता आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरपालिका निवडणुकीतील यशामुळे भाजपचा विश्वास दुणावलेला होता. त्यामुळे शिवसेनेने युती तोडूनही पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महापालिकेसाठी ‘पारदर्शी व भ्रष्टाचामुक्त’ कारभार हेच प्रचाराचे प्रमुख सूत्र ठरविले. मुंबईसाठी राज्य सरकारने मेट्रो रेल्वेसह हाती घेतलेले अनेक प्रकल्प, म्हाडा इमारती, मोडकळीस आलेल्या इमारती, यासह अनेक प्रश्नांवर घेतलेले महत्त्वाचे निर्णय हे ठामपणे मुंबईकरांसमोर मांडले. शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तुलनेने मर्यादित वैयक्तिक टीका केली. त्याऐवजी शक्यतो मुंबईसाठी असलेले स्वत:चे ‘व्हिजन’ मांडण्यावर भर दिला. ही त्यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली. नोटाबंदीचा फटका या निवडणुकीत बसू नये, भाजपचे पारंपरिक मतदार असलेले गुजराती आणि उत्तर भारतीयांची मतेही भाजपच्या पारडय़ात पडावीत, यासाठी खासदार मनोज तिवारी, स्वामी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांना मुंबईत उतरविले आणि अन्यही रचना केली. त्यामुळे भाजपला मुंबईत यश मिळाले.

राज्यात प्रचार करतानाही पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाबरोबरच विकासाच्या मुद्दय़ाचा वापर केला. वास्तविक कांदा, तूर, मूगडाळ आदींसह शेतीमालाचे कोसळलेले दर व अनेक मुद्दय़ांवर भाजपची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता आणि या मुद्दय़ांवर जनतेची नाराजी भाजपला भोवेल, अशी शक्यता होती. मात्र कृषी विमा, दुष्काळात दिलेली नुकसानभरपाई, जलयुक्त शिवारची कामे आणि अन्य अनेक योजनांचे लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी घेतलेल्या कष्टांमुळे भाजपला जिल्हा परिषदाही काबीज करता आल्या. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने फारशी अडचण आली नाही. परळीसारखा अपवाद वगळता मराठवाडय़ातही भाजपने चांगलीच मुसंडी मारत औरंगाबाद, जालना व अन्य ठिकाणी यश मिळविले. महापालिका निवडणुकांसाठी नाशिकमध्ये गिरीश महाजन, पुण्यात गिरीश बापट, कोल्हापूर-सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील, विदर्भात सुधीर मुनगंटीवार आदींवर जबाबदारी सोपविली होती.  मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यभरात अनेक सभा घेतल्या होत्या.

टीकेकडे दुर्लक्ष

उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी यांचे चिरंजीव ओमी कलानी सारख्यांशी केलेली सलगी, ठाण्यामध्ये अनेक वादग्रस्त नेत्यांना दिलेले पक्षप्रवेश यावर प्रसिद्धीमाध्यमातून बरीच टीका झाली. राज्यात अनेक ठिकाणी अशा नेत्यांना ‘ताकद’ पाहून भाजपात प्रवेश देण्यात आला. पण सर्व टीकेकडे दुर्लक्ष करून भाजपने घोडे पुढे दामटले आणि निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन केले. नियोजनबद्ध प्रचार मोहीम, संघशक्ती आणि योग्य ‘रसद पुरवठा’ या जोरावर भाजपने बाजी मारली.

 

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc election 017 results bjp ncp shiv sena mns congress party
First published on: 24-02-2017 at 02:10 IST