ठाण्यातील प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांची टीका
मुंबई, ठाण्यात कोणतीही निवडणुक आली की शिवसैनिकांनी मर मर मरायचे आणि भाजपने युतीमध्ये आयती पदे उपभोगायची अशी रितच होऊन बसली होती. गेली २५ वर्ष भाजपने ठाण्यात साधा प्रचारही केला नाही. शिवसैनिकांच्या मेहनतीच्या बळावर सत्ता आली की भाजपचे नगरसेवक महापालिकेत आयते उपमहापौरपद भुषवायला तयार असायचे. गेली २५ वर्षे आम्ही भाजप नावाचा हा नागोबा पोसला आणि हाच नाग आज आम्हाला फणा काढून डसू पहातो आहे, अशी टिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत केली. आता फणा कसा ठेचायचा हेदेखील आम्हाला चांगले ठावूक आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मासुंदा तलाव परिसरातील मुख्य रस्त्यावर शिवसेनेने निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत उद्धव बोलत होते. देशात आजही इंग्रजांनी तयार केलेली कायदे लागू असल्यामुळे आंदोलकांवर चोरी आणि दरोडय़ाचे गुन्हे दाखल होतात. अशाचप्रकारे गुन्हे शिवसैनिकांवर दाखल आहेत. माझा शिवसैनिक पप्पु कलानीसारखा गुंड नाही, असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगाविला. ठाण्यात भाजपचे हक्काचे मर्द सैनिक नसल्यामुळेच त्यांना गुंडापुंडांना गोळा करावे लागत आहे. भाजपला आता शिवरायांचे मावळे आणि झेंडे नको झाले आहेत. पण पप्पु कलानी मात्र यांना चालतो. गोपीनाथ मुंडे ज्या पप्पू कलानीचा उल्लेख रावण असा करायचे तोच रावण आता भाजपाला आपलासा वाटू लागला आहे. जागे असताना नव्हे तर झोपेतही खुर्चीत बसण्याचे स्वप्न भाजप शिवसेनेशिवाय पाहू शकली नसती. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा भाजपची ५६ इंचाची छाती कुठे गेली होती असा सवाल करताना १९९२ च्या दंगलीत भाजपच्या कार्यालयाला टाळे लागले होते असा टोला उद्धव यांनी लगाविला.
राज्यात नवी टोळी तयार करू नका..
भिवंडी शहरात काँग्रेस पदाधिकारी मनोज म्हात्रे यांची भाजपच्या उपाध्यक्षाने हत्या केली. सत्ताधारी पक्षाकडून हे कृत्य घडले आहे. म्हात्रे यांचे मारेकरी अजूनही मोकाट असून सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नाही, असा आरोप यावेळी उद्धव यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर आरोप करण्याआधी स्वत:च्या पक्षातील गुंडांना आवरावे. कलानी सारख्यांना सोबत घेतल्यावर असेच होणार आहे, असेही उद्घव ठाकरे म्हणाले.
गुंडांनी जयस्वाल यांच्याकडे वशीला लावला असेल
राज्याचे नगरविकास आणि गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रमुखांची निवड स्वत मुख्यमंत्री करत असतात. ठाणे महापालिकेत जयस्वाल यांच्यासारखा अधिकारी आपल्या मर्जीतला आहे असा दावा मुख्यमंत्री करत असतील तर येथे घोटाळे होताना जयस्वाल काय करत होते, असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. ठाण्यातले आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळ असल्याने एखादा गुंड त्यांच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी वशीला लावत असेल. म्हणून तर जयस्वाल यांना एवढय़ा रात्री मुख्यमंत्र्यांना फोन करावा लागला असावा, असा उपरोधीक टोलाही त्यांनी यावेळी लगाविला.