मनसेप्रमुख राज ठाकरे महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी इच्छुक दिसत आहेत. राज ठाकरे यांचा युतीबद्दलचा निरोप घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मातोश्रीवर चर्चा केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांची मातोश्रीवर भेट झालेली नाही. मात्र शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसोबत बाळा नांदगावकरांची चर्चा झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना-मनसेची युती होणार का, या चर्चेला सुरुवात झाली आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी संध्याकाळी मातोश्रीवर शिवसेना खासदार अनिल देसाई, खासदार राहुल शेवाळे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली. बाळा नांदगावकरांनी राज ठाकरेंचा ‘निरोप’ शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना दिला. शिवसेनेच्या नेत्यांनी राज ठाकरेंचा निरोप उद्धव ठाकरेंना कळवला जाईल आणि त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे बाळा नांदगावकरांना सांगितले. मात्र अद्याप तरी ‘मातोश्री’वरुन मनसेला सकारात्मक किंवा नकारात्मक असा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही.

भाजपसोबतची युती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तोडल्यावर शिवसेना आणि मनसे महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येणार का, अशी चर्चा जोर धरु लागली होती. आता राज ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे बाळा नांदगावकर थेट मातोश्रीवर गेल्याने शिवसेना-मनसे एकत्र येणार का, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये कांटे की टक्कर होताना दिसते आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे केला आहे. मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरेंना टाळी देणार का, हे पाहणे महत्त्वपूर्ण असणार आहे.