मुंबई, अहमदनगरचे महापौरपद खुले झाले असून ठाणे, पुणे, नागपूर, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगरमध्ये महिलाराज येणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौरपदांची आरक्षण सोडत आज मंत्रालयात काढण्यात आली. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी १६, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सात, अनुसूचित जातीसाठी तीन तर अनुसूचित जमातीसाठी एक याप्रमाणे आरक्षण काढण्यात आली असून २७ पैकी १४ महापालिकांमध्ये शहराचा प्रथम नागरिकाचा मान महिलांना मिळणार आहे.

राज्यातील १० महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, तर  काही महापालिकांच्या पुढील काळात निवडणुका होणार असून काही ठिकाणी विद्यमान महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपण्याच्या मार्गावर आहे; अशा २७ महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, मीरा भाईंदरच्या महापौर गीता जैन, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. त्यानुसार नाशिक महापालिकेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील तर अमरावतीचे महापौरपद अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव झाले आहे; तर पनवेल आणि नांदेड- वाघाळा महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असेल.

नागरिकांच्या मागास प्रवर्गातून नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद महानगरपालिकेत महापौर बसेल. याच प्रवर्गातील महिलांसाठी मीरा-भाईंदर, जळगांव, सांगली-मिरज-कुपवाड आणि चंद्रपूरचे महापौरपद आरक्षित झाले आहे.

लातूर, धुळे, मालेगांव, बृहन्मुंबई, भिवंडी-निजामपूर, अकोला, अहमदनगर, वसई-विरार अशा आठ शहरांचे महापौरपद खुले असून सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नागपूरचे महापौरपद आरक्षित झाले आहे.