मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला उभे राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांना महापालिकेच्या प्रश्नांची किमान जाण असली पाहिजे या भूमिकेतून गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या इच्छुकांची परीक्षा घेण्यात आली होती. पुढेही अशाच प्रकारे परीक्षा घेतली जाईल, असे त्या वेळी सांगणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वेळी मात्र इच्छुक उमेदवारांची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज गुरुजींनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे मनसेच्या परीक्षार्थीमध्ये आनंदी आनंद निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेची स्थापना केली त्या वेळी ‘माझा पक्ष अन्य पक्षांपेक्षा वेगळा असेल’ अशी भूमिका राज यांनी मांडली होती.

२०१२ सालच्या महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना इच्छुकांची परीक्षा घेण्याची भूमिका राज यांनी घेतली होती. उमेदवारांना मुंबई शहराच्या प्रश्नांची, महापालिकेची तसेच पालिकेच्या कारभाराची माहिती किती आहे याचा आढावा घेऊन अभ्यासू नगरसेवक महापालिकेत निवडून यावेत यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. शेकडो इच्छुकांनी त्या वेळी लेखी परीक्षा दिली होती.  त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी परीक्षा घेण्याची गरज नसल्याचे तसेच पालिका निवडणुकीच्या वेळी इच्छुकांची परीक्षा घेतली जाईल, असे मनसेतर्फे सांगण्यात आले होते.

निवडणुकीची तयारी मनसेने सुरू केली असून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. इच्छुकांकडून ठाण्यात अर्जही घेण्यात आले असून मुंबई, ठाणे, पुण्यासह महापालिका निवडणुकीसाठी या वेळी परीक्षा न घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे.

याबाबत पक्षाचे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, ज्या वेळी परीक्षा घेतली त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. महापालिकेतील कामांची कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी जाणही आहे. त्यामुळे या वेळी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

पक्ष त्यावेळी नवीन होता. कार्यकर्त्यांच्या तयारीचा अंदाज घेणे आवश्यक होते. आता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या क्षमतेचा तसेच त्यांचा आवाका याची माहिती पक्षाकडे आहे.

नितीन सरदेसाई, मनसे नेते

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray cancel candidates exam
First published on: 17-01-2017 at 02:31 IST