* पोलिसांचा गोपनीय अहवाल * ‘भाजपची एकहाती सत्ता अशक्य’

‘छोटा भाऊ’ म्हणून मनसेने ‘मातोश्री’वर जाऊन मांडलेला प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला असला तरी, ही युती झाल्यास शिवसेनेला जास्त फायदा होईल, असा अंदाज मुंबई पोलिसांनी आपल्या सूत्रांकडून मिळवलेल्या माहितीच्या विश्लेषणातून वर्तवला आहे. मनसेसोबत आल्यास ही युती ११४ प्रभागांत विजयी होईल, असा अंदाज मुंबई पोलिसांतील सूत्रांनी वर्तवला आहे. मनसे मात्र १० ते १४ जागांपुरतीच मर्यादित राहिल, असेही हा अंदाज सांगतो.

२०१२च्या महापालिका निवडणुकीतील मतदान आणि सध्याची परिस्थिती याचा अभ्यास करून पोलिसांनी हा अंदाज वर्तवला आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीचा काडीमोड, त्यानंतर मनसेने युतीसाठी घेतलेला पुढाकार आणि शिवसेनेचा त्याला नकार या घडामोडींच्या आधीपासून मुंबई पोलिसांकडून सेना-मनसे युतीबाबत अंदाज घेण्यात येत होता. गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे २८ उमेदवार निवडून आले. त्यातल्या १९ मतदारसंघांमध्ये सेना दुसऱ्या क्रमांकावर होती. तर ५८ ठिकाणी मनसेने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यातल्या ३० ठिकाणी सेनेचा विजय झाला होता. मनसे ८७ ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यापैकी ४० ठिकाणी सेनेला विजय मिळाला. दुसरीकडे सेनेने विजय मिळवलेल्या ७५ प्रभागांपैकी मनसे ३०मध्ये दुसऱ्या तर ४०मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. या आकडेवारीचा अभ्यास केल्यास सेना-मनसे युतीला किमान ८० प्रभागांमध्ये हमखास विजय मिळू शकेल. तर ही युती अंदाजे ११४ च्या आसपास पोहोचू शकेल, असे समीकरण पोलिसांनी मांडले आहे.

गेल्या निवडणुकीत सेनेच्या १३५ उमेदवारांना एकूण साडेदहा लाखांहून अधिक मते पडली होती. भाजपच्या ६३ उमेदवारांना साडेचार लाखांहून अधिक, तर मनसेला ९.७७ लाख मते पडली होती. विधानसभा निवडणुकीत मनसेची मते निम्म्याहून कमी झाली. तर स्वतंत्र लढणाऱ्या भाजपची मते चौपटीने वाढली. असे असले तरी मुंबईतल्या भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, लालबाग-परळ, दादर-माहीम, जोगेश्वरी या मराठी एकगठ्ठा मते असलेल्या भागांमध्ये मनसेला सोबत घेतल्यास शिवसेनेला जास्त फायदा होणार आहे. त्याच वेळी भाजपच्या बालेकिल्यांमध्ये किंवा विद्यमान आमदार, नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्येही मतांचे विभाजन न होता एकगठ्ठा मते सेना-मनसे युतीच्या उमेदवाराला पडून करिश्मा घडू शकतो, असा अंदाज आहे.