शिवसेनेला दादर, लालबागमध्ये स्वपक्षीयांकडून आव्हान

पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांनी पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बंडाचे निशाण फडकवले. बंडखोरीचा सर्वात मोठा धक्का सेनेला बसला असून दादर, लालबाग या सेनेच्या बालेकिल्ल्यांतूनही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात पक्षातील अन्य इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे, भाजपमध्ये विविध प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांची नाराजी, विरोधी घोषणाबाजीचे प्रकार घडले.

स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर सेनेतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला होता. मात्र उमेदवारी जाहीर होत असताना या उत्साहाची जागा बंडखोरीने घेतली. सेनेला हमखास यश मिळत असलेल्या मराठीबहुल दादर-प्रभादेवी-लालबाग या परिसरातच बंडाने जोर घेतला. माहीम येथील प्रभाग क्रमांक १९०मधून शिवसेनेकडून वैशाली पाटणकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या महिला शाखाप्रमुख रोहिता ठाकूर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. शाखेचे तोंडही न पाहिलेल्यांना उमेदवारी दिल्याची टीका त्यांनी केली. प्रभाग क्रमांक २०० येथूनही सेनेत बंडखोरी झाली असून महिला शाखाप्रमुख उर्मिला पांचाळ यांच्याविरोधात माजी शाखाप्रमुख अभिषेक सावंत यांच्या पत्नी अदिती सावंत उमेदवारी रिंगणात उतरल्या आहेत. प्रभाग क्रमांक २०१ मधून अश्विनी दरेकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी शाखाप्रमुख धनश्री प्रदीप पवार यांनी अपक्ष अर्ज भरला. प्रभादेवीमध्येही सेनेत बंडखोरी झाली असून पदाधिकारी महेश सावंत यांनी स्वतंत्रपणे अर्ज भरला आहे. आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान याला उमेदवारी मिळाल्याने महेश सावंत नाराज आहेत.  प्रभाग क्रमांक२०२ मध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक शिवसनिकांमध्ये नाराजी आहे.

पश्चिम उपनगरांमध्ये ओशिवरा येथेही सेनेत बंडाळी झाली. मागाठाणे येथे सेनेचे पदाधिकारी महेश िशदे यांनीही नाराज होऊन अपक्ष म्हणून अर्ज भरल्याची चर्चा होती. त्यापूर्वी गुरुवारी लालबागमधून नाना आंबोले, अणुशक्ती नगरमधून दिनेश पांचाळ आणि मुलुंडमधून प्रभाकर शिंदे यांनी सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने सेनेला फटका बसला आहे. विविध पक्षांमधील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना आवताण देऊन उमेदवारी दिलेल्या भाजपमध्येही कार्यकर्त्यांच्या कुरबुरी सुरू होत्या. झवेरी बाजार येथील २२१ क्रमांकाच्या प्रभागातून भाजपचे आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाशला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक जनक संघवी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. घाटकोपर पश्चिमेतील कार्यकर्त्यांनीही खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात राजीनामे दिल्याचे कळते.