Budget 2022, Economic Survey 2022 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. आर्थिक सर्वेक्षणात, भारतीय अर्थव्यवस्था २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल असा अंदाज आहे. देशाचा आर्थिक सर्वेक्षण आर्थिक व्यवहार विभागाने तयार केले आहे.
करोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जात असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. २ ते ११ फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडण्यात आला आहे. १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.
Budget Session 2022, Economic Survey 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला २०२१-२२ आर्थिक सर्वेक्षण अहवाल
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण २०२१-२२ सादर केले. यानंतर लोकसभा १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तहकूब करण्यात आली. आता दुपारी ३:४५ वाजता, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेश्वरन पत्रकार परिषदेला संबोधित करतील ज्यामध्ये आर्थिक सर्वेक्षणाच्या मुख्य मुद्द्यांचे तपशील सांगितले जातील. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करतील.
सरकार एमएसएमई क्षेत्राला पतपुरवठा सुनिश्चित करत आहे. १३ लाखांहून अधिक एमएसएमई कंपन्यांनी सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे. छोट्या कंपन्यांना सरकारकडून मदत मिळत आहे खादी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर लोकप्रिय होत आहे. गेल्या एका वर्षात ३६००० किमी पेक्षा जास्त रस्ते बांधण्यात आले आहेत. स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशाच्या चैतन्याचे प्रतीक असलेली खादी पुन्हा एकदा लघु उद्योजकांसाठी आधार ठरत आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे २०१४ च्या तुलनेत देशात खादीची विक्री तीन पटीने वाढली आहे.
माझे सरकार देशाच्या सुरक्षेसाठी निर्धाराने काम करत आहे. सरकारच्या धोरणांमुळे संरक्षण क्षेत्रात विशेषतः संरक्षण उत्पादनात देशाचा स्वावलंबीपणा सातत्याने वाढत आहे. ८३ एलसीए तेजस लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत करार करण्यात आला आहे. आम्ही आमच्या शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता आणि नाजूक परिस्थिती पाहिली आहे. आम्ही आमच्या अनेक नागरिकांची आणि अनेक अफगाण हिंदू, शीख, अल्पसंख्याकांची काबूलमधून सुटका केली आहे, असे राष्ट्रपती म्हणाले
"सरकारने ६४ हजार कोटी रुपये खर्चून सुरू केलेले पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान हे एक प्रशंसनीय उदाहरण आहे. हे केवळ सध्याच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करेल असे नाही तर देशाला येणाऱ्या संकटांसाठी देखील तयार करेल.”
“सरकारच्या धोरणांमुळे आज भारत अशा देशांमध्ये आहे जिथे इंटरनेटची किंमत सर्वात कमी आहे, स्मार्ट फोनची किंमत देखील सर्वात कमी आहे. भारतातील तरुण पिढीला याचा मोठा फायदा होत आहे. सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे भारत पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे भारतातील लाखो तरुणांना रोजगारही मिळाला आहे,” असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.
तिहेरी तलाकला कायदेशीर गुन्हा घोषित करून सरकारने समाजाला या वाईट प्रथेपासून मुक्त करण्यास सुरुवात केली आहे. मुस्लिम महिलांनी केवळ मेहरामसोबत हज करण्याची मर्यादाही हटवण्यात आली. सरकारचे धोरणात्मक निर्णय आणि प्रोत्साहन यामुळे विविध पोलीस दलात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या २०१४ च्या तुलनेत दुपटीने वाढली आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
माझ्या सरकारची श्रद्धा अंत्योदयाच्या मूळ मंत्रावर आहे, ज्यात सामाजिक न्यायही असला पाहिजे, समानता असली पाहिजे, आदरही असला पाहिजे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत माझे सरकार सर्व गरिबांना दरमहा मोफत रेशन देत आहोत. माझ्या सरकारने जन धन-आधार-मोबाईल म्हणजेच जेएएम ट्रिनिटीला नागरिक सशक्तीकरणाशी ज्या प्रकारे जोडले आहे, त्याचा परिणामही आपण सतत पाहत आहोत. ४४ कोटींहून अधिक गरीब देशवासियांना बँकिंग प्रणालीशी जोडल्यामुळे, महामारीच्या काळात करोडो लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा झाली.
करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या जागतिक महामारीचे हे तिसरे वर्ष आहे. या काळात भारतातील लोकांची लोकशाही मूल्यांवरील श्रद्धा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा अधिक दृढ होत असल्याचे आपण पाहिले आहे, असे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.
कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात भारताच्या क्षमतेचा पुरावा लसीकरण कार्यक्रमात दिसून आला आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत १५० कोटींहून अधिक लसीचे डोस देण्याचा विक्रम आम्ही पार केला आहे. आज आपण जगातील सर्वात जास्त लसीचे डोस असलेल्या आघाडीच्या देशांपैकी एक आहोत, असे राष्ट्रपती म्हणाले
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण सुरू झाले आहे. यासोबतच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू झाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसद भवनात पोहोचल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली.
“या अधिवेशनात चर्चा, चर्चेचे मुद्दे आणि खुल्या विचारांची चर्चा ही जागतिक प्रभावासाठी महत्त्वाची संधी बनू शकते. मला आशा आहे की सर्व खासदार, राजकीय पक्ष खुल्या मनाने दर्जेदार चर्चा करतील आणि देशाला वेगवान विकासाच्या मार्गावर नेण्यास मदत करतील,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“सर्व राजकीय पक्षांनी खुल्या मनाने चांगली चर्चा करून देशाला प्रगतीकडे नेण्यास मदत करावी. निवडणुका त्यांच्या जागी आहेत, निवडणुका होतच राहतील. पण अर्थसंकल्प देशात वर्षभराची ब्लू प्रिंट तयार करतो. त्यामुळे यावर चर्चा होणे गरजेचे आहे,” असेही पंतप्रधान म्हणाले.
“आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. मी तुमचे आणि सर्व संसद सदस्यांचे या अधिवेशनात स्वागत करतो. आजच्या जागतिक परिस्थितीत भारतासाठी खूप संधी आहेत. हे अधिवेशन देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण कार्यक्रम, भारतात बनवलेल्या लसीकरणाबाबत लसीबद्दल जगामध्ये विश्वास निर्माण झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनापूर्वी सांगितले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सकाळी ११ वाजता संसदेत देशाचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. १ फेब्रुवारीला आगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री आगामी आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी देशाचे उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा मांडणार आहे. मंगळवारी, केंद्रीय मंत्रिमंडळ संसदेच्या कामकाजापूर्वी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देईल.
आर्थिक सर्वेक्षणापूर्वी सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी १-१ टक्क्यांनी वाढले आहेत. बाजार उघडताच सेन्सेक्स ७५० अंकांनी वाढून ५८,००० च्या जवळ आला आहे. तर निफ्टीमध्ये २०० अंकांच्या जबरदस्त वाढीनंतर, ट्रेडिंग १७३०१ वर उघडले आहे. आठ मिनिटांतच निफ्टीने १७३२७ चा उच्चांक गाठला होता
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी सर्वांनी खुल्या मनाने चर्चा करण्याचा सल्ला दिला