Healthcare Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. करोना काळातील आव्हानांवर आपण यशस्वीरित्या मात केली आणि आत्मनिर्भर भारताचा पाया रचला, अशा शब्दात निर्मला सीतारमण यांनी करोना काळात केलेल्या कामांचा उल्लेख केला. अंतरिम अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत. गर्भशयाचा कर्करोगावर मात करण्यापासून ते आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढविण्यापर्यंतच्या अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
आरोग्य क्षेत्रासाठी अंतरिम अर्थसंकल्प २०२४ मध्ये असलेल्या घोषणा पुढीलप्रमाणे :
- गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी ९ ते १४ वयोगटातील मुलींचे लसीकरण करण्यासाठी सरकार यापुढे प्रोत्साहन देणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
- आयुष्मान भारत योजने अंतर्गत आता अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना आरोग्य कवच देण्यात येईल.
- विविध विभागाअतंर्गत सध्याच्या रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा वापर करून आणखी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची सरकारची योजना आहे. या कामासाठी एक समिती स्थापन केली जाईल, जी या विषयाचा आढावा घेऊन सरकारला शिफारस करेल.
- माता आणि बाल आरोग्याशी संबंधित सर्व सेवा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या योजना एकाच व्यापक कार्यक्रमाअंतर्गत आणल्या जातील.
- ‘सक्षम अंगणवाडी’ या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्राला आणखी सक्षम केले जाईल. बाळंतपणाची काळजी घेणे, पोषण आहाराचे वितरण करणे आणि यासंबंधी विकास करण्यासाठी ‘पोषण २.०’ अंतर्गत अधिक लक्ष दिले जाईल.
- लसीकरणाचे व्यवस्थापन आणि मिशन इंद्रधनुष्य आणखी गंभीरतेने राबविण्यासाठी नव्याने तयार केलेली ‘यू-विन’ (U-Win) यंत्रणा देशभर राबविली जाईल.