scorecardresearch

Budget 2022: “केवळ वेगवेगळे शब्दप्रयोग करुन जुन्याच योजनांचा..”; अर्थसंकल्पावर शिवसेनेची प्रतिक्रिया

निराशाजनक असलेला अर्थसंकल्प म्हणून याचा उल्लेख करावा लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Shiv Sena MP Vinayak Raut reaction to the budget 2022
(फोटो – PTI)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीचा अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहिले जाऊ शकते. मध्यमवर्गीय जनतेला या अर्थसंकल्पातून महागाई, करमाफी आणि बेरोजगारीबाबत मोठ्या घोषणांची अपेक्षा होती. मात्र महागाई आणि करमुक्तीबाबत कोणतीही मोठी घोषणा करण्यात आली नाही. देशातील रोजगाराबाबत ६० लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची आमची क्षमता असून १०० वर्षांसाठी पायाभूत सुविधा वाढवणार आहेत असे अर्थमंत्री म्हणाल्या. यानंतर या अर्थसंकल्पावर देशभरातून प्रतिक्रिया येत असून अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

“अत्यंत निराशाजनक असलेला अर्थसंकल्प म्हणून याचा उल्लेख करावा लागेल. सुदैवाने करोनानंतर भारतीयांनी १.३८ लाख कोटी रुपयांची जीएसटी रक्कम जमा केली आहे. इतकी रक्कम देऊन सुद्धा देशाच्या विकासाच्या अनुषंगाने ज्या योजना राबवण्यात यायला हव्या होत्या त्या अर्थसंकल्पामधून दिसून आल्या नाहीत. केवळ वेगवेगळे शब्द प्रयोग वापरून जुन्याच योजनांचा पुनरुच्चार केला गेला आहे. पण देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी  पंतप्रधान मोदींनी ठेवलेल्या उद्दिष्टांचा या अर्थसंकल्पामध्ये कोणताही उल्लेख नाही. नोकरदार वर्गाला करामध्ये सवलत मिळेल असे वाटत होते पण त्यातही काही मिळालेले नाही,” अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली.

Budget 2022 : अर्थमंत्र्यांची सेमी हायस्पीड ट्रेन्सची भेट; पुढील तीन वर्षांत धावणार ४०० नवीन वंदे भारत एक्सप्रेस

या अर्थसंकल्पावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “मोदी सरकारचं बजेट हे नेहमीच आभासी आणि फसवं असतं. त्यांच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नसतं. यंदाचं बजेटही तसंच आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. गरीबांचा किती गळा आवळतात आणि देशातील दोनचार श्रीमंत आणखी किती श्रीमंत होत जातात ते येत्या काळात पाहू,” असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

Budget 2022: ई-पासपोर्टची अर्थमंत्र्यांची घोषणा!; इलेक्ट्रॉनिक चीप असणाऱ्या पासपोर्टचे फायदे काय? जाणून घ्या

दरम्यान, “भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार,” असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व Budget 2022 ( Budget ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena mp vinayak raut reaction to the budget 2022 abn

ताज्या बातम्या