Ap Per Hurun India Rich List Alakh Pandey Is Rich Than Shah Rukh Khan: एडटेक फर्म फिजिक्सवालाचे सह-संस्थापक अलख पांडे यांच्या एकूण संपत्तीत गेल्या वर्षी प्रचंड वाढ झाली आहे, ज्यामुळे त्यांना प्रतिष्ठित हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ मध्ये स्थान मिळाले आहे. फिजिक्सवालाचे दुसरे सह-संस्थापक असलेले प्रतीक माहेश्वरी यांचीही गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात संपत्ती वाढल्याचे पाहायला मिळाले असून, त्यांनाही श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, गेल्या वर्षी अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी यांच्या एकूण संपत्तीत प्रत्येकी २२३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

“फिजिक्सवालाचे अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी यांच्या संपत्तीत प्रत्येकी २२३% वाढ झाली आहे, त्यांची संपत्ती १४,५२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे”, असे हुरुनच्या निवेदनात म्हटले आहे.

शाहरुख खानपेक्षा श्रीमंत

फिजिक्सवालाचे सह-संस्थापक अलख पांडे यांची एकूण संपत्ती १४,५१० कोटी रुपये आहे, ज्यामुळे त्यांना हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५ मध्ये स्थान मिळाले आहे. त्यांची एकूण संपत्ती आता बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानपेक्षा जास्त आहे. शाहरुख खानची संपत्ती १२,४९० कोटी रुपये आहे.

गेल्या काही आर्थिक वर्षांत अलख पांडे यांची कंपनी फिजिक्सवाला तोट्यात असूनही त्यांची एकूण संपत्ती लक्षणीयरीत्या वाढली आहे.

फिजिक्सवालाने २०२५ या आर्थिक वर्षात २४३ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे, जो मागिल आर्थिक वर्षात १,१३१ कोटी रुपये होता, ज्यामुळे त्यांचा तोटा ७८ टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यांचे एकूण उत्पन्न २,८८६ कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षात १,९४० कोटी रुपये होते.

फिजिक्सवाला ही कंपनी जेईई, नीट, गेट आणि यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे कोर्सेस तसेच कौशल्यवृद्धीचे शिक्षण देते. हे सर्व कोर्सेस ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स जसे की, यूट्युब, वेबसाइट आणि अ‍ॅप्सबरोबर ऑफलाइन सेंटर्सवरही चालवले जातात.

कोण आहेत अलख पांडे?

अलख पांडे हे फिजिक्सवालाचे सहसंस्थापक आणि सीईओ आहेत. २०२० मध्ये, अलख पांडे यांनी विद्यार्थ्यांना कमी बजेटमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी फिजिक्सवालाची स्थापना केली होती. अलख पांडे फिजिक्स विषय शिकवतात आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. अलख पांडे हे मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आहेत. त्यांचे बालपण आर्थिक अडचणीत गेले. त्यांचे अभिनेता होण्याचे स्वप्न होते, परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आठवीत असल्यापासून कोचिंग देण्यास सुरुवात केली होती.