Anand Mahindra Said He Downloaded Arattai App With Pride: उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक्सवर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये झोहोच्या नवीन चॅट आणि कॉलिंग अ‍ॅप, अरत्ताई अ‍ॅपला पाठिंबा दर्शवला आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले की, त्यांनी “अभिमानाने” अरत्ताई अ‍ॅप डाउनलोड केले आहे. भारतीय अ‍ॅप वापरण्यास सुरुवात केल्याने आनंद महिंद्रा यांचे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

आनंद महिंद्रा यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “आज अभिमानाने @Arattai App डाउनलोड केले.” आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टवर अ‍ॅपच्या अधिकृत हँडलवरून त्वरित प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी आनंद महिंद्रा यांचे आभार मानले व प्लॅटफॉर्मवर स्वागत केले.

अरत्ताई अ‍ॅपची मूळ कंपनी झोहोचे सीईओ श्रीधर वेम्बू यांनीही आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी आमच्या टेनकासी ऑफिसमध्ये अरत्ताई टीमबरोबर एका बैठकीत होतो, अ‍ॅपमध्ये सुधारणा करण्याचे काम करत होतो आणि एका टीम सदस्याने तुमची पोस्ट दाखवली. धन्यवाद @anandmahindra.”

त्यांनी पुढे सांगितले की, आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टमुळे टीमला खूप प्रेरणा मिळाली, ज्यामुळे त्यांना प्रकल्पाबद्दल नवीन उत्साह आणि उद्देश मिळाला.

दोन दिग्गज उद्योजकांमधील हा संवाद इथेच संपला नाही. आनंद महिंद्रांनीही श्रीधर वेम्बू यांच्या पोस्टला उत्तर दिले. आनंद महिंद्रांनी अरत्ताईच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की, ते त्यांचा अरत्ताईसाठी ‘चिअर’ करत आहेत.

जागतिक चॅट प्लॅटफॉर्मला भारतीय पर्याय म्हणून अरत्ताईला पाठिंबा देण्याच्या आनंद महिंद्रांच्या या निर्णयाचे सोशल मीडिया युजर्सनी कौतुक केले. “जर सर्व प्रमुख कंपन्या अरत्ताईकडे वळल्या तर भारतीय सोशल मीडिया अ‍ॅप्सना मोठी चालना मिळेल”, असे एका युजरने लिहिले.

दुसऱ्या युजरने टिप्पणी केली की, “हे पाहिल्यानंतर मी अ‍ॅप डाउनलोड केले. ते खूप आशादायक दिसते.”

अलिकडच्या आकडेवारीनुसार, अरत्ताईने आता अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर ७.५ दशलक्ष डाउनलोड्सचा आकडा ओलांडला आहे, ज्यामुळे भारतीयांची स्वदेशी अ‍ॅपमध्ये वाढती आवड दिसून येत आहे.