Gold-Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. सोने आणि चांदीच्या दरात मागील काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. भारतीय बाजारात बुधवारी (०८ ऑक्टोबर) सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी सोन्याच्या किमतींनी ऐतिहासिक टप्पा गाठला. इतिहासात पहिल्यांदाच मौल्यवान धातूच्या वायदा भाव प्रति औंस ४,००० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज सकाळी कॉमेक्सवर सोन्याच्या वायद्यांचा भाव प्रति औंस ४,०४० डॉलर्स होता.

मौल्यवान धातूने स्पॉट ट्रेडिंगमध्ये ४,००२.५३ डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला तर अमेरिकन कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबरमध्ये सोन्याचा वायदा ०.५ टक्क्यांनी वाढून ४,०२५ प्रति औंस डॉलर झाला आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

भारतात सोने-चांदीचे दर काय?

जागतिक बाजारात सोने आणि चांदी ऐतिहासिक उच्चांकावर आहेत. तसेच भारतात बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति १० ग्रॅम १२२००० रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच चांदी प्रति किलोग्रॅम १,४६,००० रुपयांवर व्यवहार करत आहे. सोन्याचा भाव १२२००० लाखांवर पोहोचला असून सलग तिसऱ्या दिवशी दरात वाढ झाली आहे.

दरम्यान, जागतिक अनिश्चिततेच्या वाढत्या परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता शोधत असल्याने सोन्याच्या किमती प्रति औंस ४,००० डॉलर्सच्या पुढे गेल्या असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.