Central Government Cabinet Decision : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देशात आणखी चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याआधी देशातील विविध शहरात ६ सेमीकंडक्टर प्रकल्प आधीच मंजूर आहेत. त्यानंतर आज पुन्हा आणखी चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
आज मंजुरी देण्यात आलेले हे नवीन सेमीकंडक्टर प्रकल्प ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पंजाबमध्ये असणार आहेत. या प्रकल्पामध्ये तब्बल ४,६०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक होणार आहे. या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच या निर्णयांमुळे देशातील सेमीकंडक्टर इकोसिस्टम आणखी मजबूत होईल. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयासंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती सांगितली. आज देण्यात आलेल्या मंजुरीमध्ये SiCSem, कॉन्टिनेंटल डिव्हाइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CDIL), 3D ग्लास सोल्युशन्स आणि अॅडव्हान्स्ड सिस्टम इन पॅकेज (ASIP) या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. आता सेमीकंडक्टर प्रकल्पांची संख्या १० झाली आहे. या माध्यमातून सहा राज्यात तब्बल १.६० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
तसेच हे सर्व प्रकल्प आत्मनिर्भर भारत अभियानासाठी एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल. त्यामुळे अतिरिक्त अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील. दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.