Mohandas Pai On Government Failure On Ending Corruption: चेन्नईतील कस्टम अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याचा आरोप करत तामिळनाडूस्थित विंटरॅक इंकने आयात आणि निर्यात ऑपरेशन्स थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, बंदरांवरील भ्रष्टाचार संपवण्यात अपयशी ठरल्याबद्दल अरिन कॅपिटलचे अध्यक्ष आणि इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली आहे.

“मॅडम सीतारमण, हे स्वीकारार्ह नाही. तुम्ही आपल्या बंदरांमधील पद्धतशीरपणे चालणारा भ्रष्टाचार संपवण्यात अपयशी ठरला आहात. कृपया हे थांबवा. तुम्ही आमच्या अर्थमंत्री आहात आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त शासनाचे आश्वासन दिले होते”, असे मोहनदास पै यांनी विंटरॅक इंकची एक्स पोस्ट रिपोस्ट करताना म्हटले आहे.

मोहनदास पै यांनी पुढे, सरकार तथाकथित “कर दहशतवाद” रोखण्यात निष्क्रिय ठरल्याचा आरोप केला आणि यासाठी सरकारच्याच अर्थसंकल्पीय आकडेवारीचा दाखला दिला आहे. ते म्हणाले, “तुम्ही कर दहशतवाद थांबवण्यात अपयशी ठरलात. कृपया तुम्हीच तुमच्या मागील अर्थसंकल्पात सादर केलेली आकडेवारी एकदा पाहा. आशा आहे ती तुम्ही पाहिली असेल.”

यावेळी मोहनदास पै यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना टॅग करत म्हटले, “@FinMinIndia कृपया लक्ष द्या, ३० लाख कोटी रुपयांची रक्कम करविवादांमध्ये अडकलेली आहे, त्यापैकी केवळ १५ लाख कोटी रुपयेच वसूल होण्यासारखे असल्याचे सांगितले जात आहे. यातील ८०% पेक्षा जास्त रक्कम गेल्या ५ वर्षांतच जमा झाली आहे!”

विंटरॅक इंकने १ ऑक्टोबरपासून भारतातील सर्व आयात आणि निर्यात ऑपरेशन्स बंद करण्याची घोषणा केली होती. एका निवेदनात, कंपनीने “गेल्या ४५ दिवसांत चेन्नई कस्टम्समधील अधिकाऱ्यांकडून वारंवार आणि अन्याय्य छळ” हे त्यांच्या निर्णयाचे कारण असल्याचे नमूद केले होते.

“या वर्षाच्या सुरुवातीला, जेव्हा आम्ही लाचखोरीची प्रकरणे उघड केली, तेव्हा आम्हाला सूडाच्या कारवाईचा सामना करावा लागला ज्यामुळे आमच्या व्यवसाय करण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाला.आमच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही, सततच्या दबावामुळे कामकाज सुरू ठेवणे अशक्य झाले आहे”, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनासह केलेल्या एक्स पोस्टमध्ये कंपनीने पुढे म्हटले आहे की, “गेल्या ४५ दिवसांपासून, चेन्नई कस्टम अधिकाऱ्यांनी आम्हाला सतत त्रास दिला आहे. या वर्षी दोनदा त्यांच्या लाचखोरीच्या पद्धती उघड केल्यानंतर, त्यांनी आम्हाला त्रास दिला, ज्यामुळे आमचे कामकाज प्रभावीपणे बिघडले आणि भारतातील आमचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला. या कठीण काळात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही मनापासून आभार मानतो.”