CRED Loss In 7 Years: क्रेडचे संस्थापक कुणाल शाह यांनी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या लिंक्डइन पोस्टला उत्तर दिले आहे, ज्यामध्ये दशकाहून अधिक काळ आर्थिक तोटा असूनही त्यांच्या उद्योजकीय प्रवासाच्या उत्सवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. डेलॉइटचे वरिष्ठ सल्लागार आदर्श समलोपनन यांनी लिहिलेल्या या पोस्टमध्ये असे नमूद केले आहे की, शाह यांच्या फ्रीचार्ज आणि क्रेड या उपक्रमांना एकत्रितपणे ५,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला असून, एकाही वर्षी नफा झालेला नाही.
या पोस्टला उत्तर देताना शाह यांनी उद्योजकतेबद्दल व्यापक दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले, “अगदी बरोबर. आपण अशा हजारो उद्योजकांचे कौतुक केले पाहिजे, ज्यांनी बाह्य भांडवलाशिवाय खूप फायदेशीर कंपन्या निर्माण केल्या आहेत.” ते पुढे म्हणाले की, “जीवनात जोखीम घेणाऱ्या आणि उद्योजक असणाऱ्या प्रत्येकाचे आपण कौतुक केले पाहिजे, कारण एआय च्या जगात, नोकरी शोधणारा असणे अधिक धोकादायक ठरणार आहे. आपल्याला अधिक रोजगार निर्माण करणाऱ्यांची आवश्यकता आहे.”
लिंक्डइन पोस्टमध्ये असे नमूद केले आहे की, २०१० मध्ये शाह यांनी स्थापन केलेल्या फ्रीचार्जने २०१५ पर्यंत ३५ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता, परंतु कॅशबॅक ऑफरमुळे २६९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. स्नॅपडीलने ही कंपनी २,८०० कोटी रुपयांना विकत घेतली होती, परंतु नंतर ती अॅक्सिस बँकेला फक्त ३७० कोटी रुपयांना विकली गेली, जी तिच्या पूर्वीच्या मूल्यांकनाच्या फक्त १४% होती.
२०१८ मध्ये सुरू झालेल्या शाह यांच्या दुसऱ्या उपक्रम, क्रेडने सात वर्षांत ४,४९३ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे, परंतु याच कालावधीत त्यांना ५,२१५ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे.
या पोस्टमुळे लिंक्डइन युजर्समध्ये स्टार्टअप इकोसिस्टममध्ये यशाच्या व्याख्येवर वाद सुरू झाला. काहींनी नफा न होता निधी आणि मूल्यांकनांवर लक्ष केंद्रित करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर काहींनी नोकऱ्या निर्माण करणाऱ्या आणि उद्योजकांच्या जोखीम घेण्याच्या वृत्तीचे समर्थन केले.
यावेळी कुणाल शाह यांच्यासारख्या दीर्घकाळ तोट्यात असलेल्या उद्योजकांना अजूनही कसे साजरे केले जाते, याबद्दल आदर्श समलोपनन यांच्या चिंतेचे अनेक युजर्सनी समर्थन केले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, स्टार्टअप्सनी शाश्वत नफा न दाखवता गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवावा का?
फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या जागतिक स्तरावर यशस्वी झालेल्या अनेक स्टार्टअप्सना नफा मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे लागली, असे सांगून अनेक युजर्सनी कुणाल शाह यांचे समर्थन केले. त्यांनी असा युक्तिवाद केला की, नवोपक्रम आणि दीर्घकालीन परिणाम नफ्याइतकेच महत्त्वाचे आहेत.